शेअर बाजारात घसरण कशामुळे? गुंतवणुकदारांनी काय करावं?

  • ऋजुता लुकतुके
  • बीबीसी मराठी
BSE

फोटो स्रोत, Getty Images / INDRANIL MUKHERJEE

फोटो कॅप्शन,

बाँबे स्टॉक एक्सचेंज

9600000000000 हा आकडा वाचता येतो? तो आहे 9.6 लाख कोटी. मागच्या आठवड्यात शेअर बाजार पडला तेव्हा भारतीय गुंतवणुकदारांचं पहिल्या तीन दिवसात इतक्या रुपयांचं नुकसान झालं.

निर्देशांकांच्या भाषेत बोलायचं झालं तर सेन्सेक्समध्ये 1274 अंशांची घसरण झाली आणि त्याने 33,482 हा नीच्चांक गेल्या आठवड्यात दाखवला. निफ्टीसाठी निच्चांकी पातळी 10,295ची होती. हे आकडे तुम्हाला घाबरवण्यासाठी देत नाहीये. तर इथून पुढचा निर्देशांकांचा मार्ग कसा असेल याचा आढावा घेण्याचा प्रयत्न इथे करणार आहोत.

बजेटनंतर घसरणीला सुरुवात

अनेकदा शेअर बाजार निर्देशांकांची दिशा मोठ्या आर्थिक घडामोडी ठरवत असतात. केंद्रीय बजेट ही तर वर्षातली सगळ्यात मोठी अर्थविषयक घटना.

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी १ फेब्रुवारीला बजेट सादर केलं. दुसऱ्या दिवशीपासून घसरणीला सुरुवात झाली. बजेटमुळेच ही घसरण झाली का?

अर्थतज्ज्ञ अभिजित फडणीस यांच्याकडून या घसरणीचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला.

''या बजेटमध्ये सरकारने शेअर बाजारासाठी सकारात्मक अशी कुठलीही घोषणा केली नाही. लिस्टेड कंपन्यांचे कर कमी झाले नाहीत. त्यामुळे कॉर्पोरेट क्षेत्रासाठी बजेटकडून थेट फायदा कुठलाही झाला नाही. उलट गुंतवणुकदारांसाठी दीर्घकालीन भांडवली नफा म्हणजेच लाँग टर्म कॅपिटल गेन आणला आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांची अशी नकारात्मक प्रतिक्रिया पहायला मिळते आहे," असं डॉ. फडणीस यांनी घसरणीचं पहिलं कारण स्पष्ट केलं.

जागतिक बाजारातील घसरण

भारतात या घडामोडी घडत असताना भारताबाहेर खासकरुन अमेरिकेतले शेअर बाजारही दणक्यात कोसळत आहेत. त्याचाही परिणाम निफ्टी आणि सेन्सेक्सवर झाला आहे.

डॉ. फडणीस यांच्या मते, "अमेरिकेत रोजगार निर्मिती चांगली झाली आहे. त्यामुळे महागाई वाढण्याची भीती आहे. अशावेळी कर्ज पुरवठा कमी करण्यासाठी अमेरिकन फेडरल बँक व्याज दर वाढवेल, अशी भीती अमेरिकन गुंतवणूकदारांना होती. त्यामुळे अमेरिकन बाजारही मागच्या आठवड्यात कोसळले. त्याचेच पडसाद भारतीय बाजारावरही पडले."

भारतीय बाजाराची गेल्या आठवड्यात पीछेहाट झाली, तेव्हा परकीय गुंतवणुकदार संस्थांनी 1263.57 कोटी रुपये आपल्या बाजारातून काढून घेतले आहेत.

किती काळ चालेल घसरण?

गुंतवणुकदारांच्या डीमॅट खात्यांच्या व्यावस्थापनासाठी आपल्याकडे सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड अर्थात सीडीएसएल नावाची संस्था आहे. या संस्थेचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर ठाकूर यांच्या मते ही घसरण जास्तीत जास्त तीन महिने राहील.

"आताची मंदी ही स्वाभाविक मंदी आहे. म्हणजे एखाद्या मोठ्या रॅलीनंतर आलेली मंदी आहे. फायदा खूप मिळाला असेल तर गुंतवणुकदार कधीतरी शेअर विकून मोकळा होणार आणि नफा कमावून बाहेर पडणार. या तत्त्वावर आलेली ही मंदी आहे, " असं ठाकूर यांनी मंदीविषयी मत सांगितलं.

गुंतवणुकदारांनी काय करावं?

भारतीय बाजारांबद्दल त्यांना आणखी एक गोष्ट सकारात्मक दिसत आहे. "2015 पूर्वी भारतीय शेअर बाजारांमध्ये परदेशी गुंतवणुकदार आणि देशी गुंतवणुकदार यांचं प्रमाण 65:35 असं होतं. म्हणजे परदेशी गुंतवणुकदारांची संख्या दुप्पटीनं जास्त होती. ते प्रमाण आता तीन वर्षांत बरोबर उलटं झालं आहे. देशात म्युच्युअल फंडांच्या माध्यामातून शेअर बाजारात होणारी गुंतवणूक वाढते आहे. अशावेळी गुंतवणुकदारांनी जागतिक मंदीला घाबरण्याचं कारण नाही," असं ठाकूर यांना वाटतं.

फोटो स्रोत, INDRANIL MUKHERJEE/ Getty images

कंपन्यांचे नवे तिमाही निकाल मार्च नंतर येतील, तेव्हा शेअर बाजाराला सुधारणा करण्याची आणखी एक संधी मिळू शकेल. म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून आपली गुंतवणूक सुरूच ठेवा असा सल्ला त्यांनी दिला आहे. ज्यांची थेट गुंतवणूक आहे, त्यांनीही घाबरुन न जाण्याचं आवाहन केलं जात आहे.

नवीन गुंतवणूक करावी का?

मागच्या वर्षभरात शेअर बाजाराने भारतीय गुंतवणुकदारांना २० टक्क्यांच्या वर परतावा दिला आहे. त्याच आशेनं नवीन गुंतवणुकदारही शेअर बाजाराकडे वळत आहेत. ही घसरण नवीन गुंतवणुकदारांची काळजी वाढवणारी आहे.

पण, अशांसाठी अर्थतज्ज्ञ डॉ. फडणीस यांनी सबुरीचा सल्ला दिला आहे. "दीर्घकालीन गुंतवणुकदारांनी (ज्यांची गुंतवणूक वर्षभरापेक्षा जास्त कालावधीसाठी आहे) घाबरण्याची काहीच गरज नाही. शेअर बाजार यातून सावरेल. सध्याचा बाजार हा 'सेल ऑन रॅली' म्हणजे आपला शेअर वाढला असेल तर थोडीफार नफावसुली करण्याचा आहे," असं डॉ. फडणीस यांचं मत आहे.

खरेदीची ही वेळ आहे?

ज्यांना नवीन गुंतवणूक करायची आहे त्यांनी कुठली सावधगिरी बाळगली पाहिजे? शेअर बाजारात टायमिंग महत्त्वाचं असं आपण नेहमी ऐकतो. म्हणजे उतार-चढाव तर होतच असतात. केव्हा खरेदी करायची आणि केव्हा विक्री हे समजणं महत्त्वाचं असतं.

वरील प्रश्नाचा एक उपप्रश्न असा आहे की बाजाराने तळ गाठला आहे का? तळ गाठला असेल तर शेअरची कमी दरात खरेदी शक्य होईल.

फोटो स्रोत, INDRANIL MUKHERJEE/Getty images

डॉ. अभिजीत फडणीस यांच्या मते शेअर खरेदीची घाई इतक्यात करु नये. 'बाजार आणखी काही काळ निदान मार्च महिन्यापर्यंत पडू शकतो. निफ्टीची खरेदीची पातळी ९८०० ते ९९०० अशी आहे.'

(DISCLAMER - शेअर बाजारातील गुंतवणूकीत जोखीम आहे. गुंतवणूकदारांनी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच गुंतवणूक करावी.)

( या लेखातील मतं ही तज्ज्ञांची वैयक्तिक मतं आहेत.)

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)