प्रेम याच वयात का होतं?
- मोहसीन मुल्ला
- बीबीसी मराठी

फोटो स्रोत, Facebook/Nagraj Manjule
सैराट चित्रपटातलं प्रेमही याच वयातलं असल्याचं दाखवलं आहे.
'तू समोर येताच मनाचं फुलपाखरू होतं. दिवसभर कितीही काम लागलं तरी तुला भेटायचं आहे, तू दिसणार आहेस, या एका कल्पनेनंच मन मोहरून जातं. तुझं आयुष्यात असणं म्हणजे जणू जगच जिंकल्यासारखं वाटतं. तहानभूक आणि झोप हरपते, फक्त तुझाच विचार सुरू असतो.'
प्रेमात पडलेल्या प्रत्येकाची थोड्याफार फरकाने हीच अवस्था असते. पण हे सर्व हृदयाचे खेळ आहेत, असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते चूक आहे. कारण त्यामागे आहे ती केमिस्ट्री. मेंदूमधील विविध हार्मोन्सची केमिस्ट्री हे सर्व घडवून आणत असते. प्रेमाची केमिस्ट्री म्हणा हवं तर.
प्रेमात असताना मनात जो काही भावनांचा खेळ आणि कल्लोळ सुरू असतो, त्याचं मूळ मेंदूतल्या विविध हार्मोन्समध्ये असतं.
कोल्हापुरातल्या मनोविकारतज्ज्ञ डॉ. कविता शहा बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाल्या, "प्रेम ही अगदी नैसर्गिक भावना आहे, ती मानवी गरज असते. सहवासातून एखादी व्यक्ती आवडू लागते. त्यातून प्रेम होते."
प्रेमात असताना मेंदूत डोपामाईन, नॉरअॅड्रेनालिन आणि ऑक्सिटोसिन अशा हार्मोन्सची पातळी वाढलेली असते. त्यातून उत्साही वाटणं, अधिक फ्रेश वाटणं, असे मनाचे खेळ सुरू असतात. प्रेमाच्या वेगवेगळ्या पातळ्यांवर हे हार्मोन्स त्यांचीत्यांची भूमिका बजावत असतात.
लैंगिक आकर्षण

फोटो स्रोत, GoodLifeStudio
"सर्वसाधारणपणे 15 ते 18 या वयात विरुद्धलिंगी व्यक्तींबद्दलचं आकर्षण फार जास्त वाढलेलं असतं. हे आकर्षण शारीरिक पातळीवरच असतं," असं कोल्हापुरातले ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ डॉ. पी. एम. चौगुले यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.
याला जबाबदार सेक्स हार्मोन्स म्हणजे टेस्टेस्टिरॉन आणि इस्ट्रोजेन होय. जाणून घ्या की आपण किस का करतो?
जग जिंकल्याची भावना
प्रेमातील महत्त्वाचा टप्पा असतो आकर्षणाचा. यात भूमिका बजावतात डोपामाईन आणि नॉरअड्रेलानालिन हे दोन हार्मोन. मेंदूतील हायपोथॅलमसमध्ये हे दोन हार्मोन निर्माण होतात.
जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटत असतं, त्यावेळी हे दोन्ही हार्मोन मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेले असतात. प्रेमात पडल्यानंतर नेहमी उत्साही वाटणं, बऱ्याच वेळा आपल्याच तंद्रीत असणं, अतिउत्साह या सगळ्या भावनांच्या मागे हेच हार्मोन असतात.

फोटो स्रोत, svetikd
प्रेमात असलेल्यांच्या मनात जग जिंकल्याची भावना निर्माण झालेली असते.
डोपामाईन हे हार्मोन मेंदूमधील रिवॉर्ड पाथवेशी संबंधित आहे. म्हणूनच प्रेमात आहोत म्हणजे जणू काही आपण जग जिंकलं आहे, अशी भावना मनात निर्माण झालेली असते, अशी माहिती डॉ. शहा यांनी दिली.
म्हणजेच काय तर प्रेम हे एकप्रकारचे रिवॉर्डच असतं, असं तुम्ही म्हणू शकता.
जोडीदाराबद्दल ऑब्सेसिव्ह का वाटते?
सिरोटोनिन तर मूड हार्मोन म्हणून सुपरिचित आहे. प्रेमाची उत्क्रांती कशी झाली, यावर बीबीसी अर्थवर The Sinister Reason Why People in Love हा लेख उपलब्ध आहे. यात असं म्हटलं आहे की प्रेमात असताना सिरोटोनिनची पातळी कमी झालेली असते.

फोटो स्रोत, Tijana87
अॅटॅचमेंटमागे मुख्य कारण असते ते म्हणजे ऑक्सिटोसिन
विशेष म्हणजे Obsessive Compulsive Disorder या मानसिक आजारात सिरोटोनिनची पातळी कमी झालेली असते. त्यामुळे प्रेमात पडलेल्या पर्श्याला आर्चीचं इतकं 'येड लागतं', म्हणूनच मग तीही त्याच्याप्रती अशी ऑब्सेसिव्ह होते.
झोप का उडते, भूक गायब का होते?
प्रेमात असताना झोप उडणं, भूक न लागणं, हे अनुभव काही नवीन नाहीत. सतत डोक्यात आपल्या जोडीदाराचाच विचार असतो. डोपामाईन आणि नॉरअड्रेनालिन या हार्मोन्समुळे हे घडतं असतं.
अटॅचमेंटचं कारण
लाँगटर्म रिलेशनशिपमध्ये काळाच्या ओघात एक अटॅचमेंट तयार होतं. यात मोठा वाटा असतो तो ऑक्सिटोसिनचा. ऑक्सिटोसिनला काहीवेळा Cuddle Hormone असंही म्हटलं जातं. लैंगिक आणि शारीरिक आकर्षण हे रोमँटिक रिलेशनशिपशी संबंधित आहेत.

फोटो स्रोत, PeopleImages
लैंगिक आकर्षणात टेस्टेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन हे हार्मोन महत्त्वाची भूमिका बजावतात.
पण एखाद्या व्यक्तीबद्दल शरीरसंबंध, स्तनपान, प्रसूती अशावेळी ऑक्सिटोसिन मोठ्याप्रमाणावर निर्माण होतं. अटॅचमेंट, जवळची मैत्री, मुलं आणि पालक यांच्यातलं नातं अशा भावनांशी संबंधित हार्मोन म्हणजे ऑक्सिटोसिन होय.
ही झाली प्रेमात असतानाची स्थिती. या उलट ब्रेकअप झाला तर काय होतं?
ब्रेकअप विड्रॉवल सिम्पटम्ससारखं!
विड्रावल सिम्पटम्स हा शब्द तुम्ही ऐकला असेल. एखाद्या औषधाची किंवा नशेची मेंदूला सवय झालेली असते, ती अचानक बंद झाली तर अस्वस्थ वाटणे, निद्रानाश अशा तक्रारी सुरू होतात. यालाच विड्रॉल सिम्प्टम्स म्हणतात.
होत असं की प्रेमात असताना मेंदूत डोपामाईन, नॉरअड्रेनालिन, ऑक्सिटोसिन अशा हार्मोनची पातळी वाढलेली असते. पण ब्रेकअपनंतर या सगळ्याच हार्मोनची पातळी खालवते. त्यातून विड्रॉल सिम्पटम्सारखीच परिस्थिती निर्माण होते, अशी माहिती डॉ. शहा यांनी दिली.

फोटो स्रोत, praetorianphoto
ब्रेकअपनंतर अनेकांना नैराश्येचा सामना करावा लागतो.
त्यामुळेचे ब्रेकअपनंतरची मानसिक अवस्था पूर्णपणे बिघडून गेलेली असते. अनेकांना नैराश्येचा सामना करावा लागतो.
ब्रेकअप झाल्यानंतर सर्वच हरवलं आहे, असं वाटू लागतं आणि असहाय्य झाल्याची भावना निर्माण होते.
सारं जग संपलं आहे, असं वाटू लागतं, असं डॉ. शहा म्हणाल्या. सर्वसाधारणपणे आपले व्यक्तिमत्त्व कसं आहे, यावर आपली ब्रेकअपवरची प्रतिक्रिया ठरलेली असते, असं त्या म्हणाल्या.
पाहा व्हीडिओ: कोणकोणत्या देशात आहे व्हॅलेंटाइन डे वर बंदी?
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)