केरळातली सैराट जोडी : रोशन म्हणतो प्रियाच माझी आवडती हिरोईन

रोशन आणि प्रिया
फोटो कॅप्शन,

रोशन आणि प्रिया

प्रेमात पडायला काही ठराविक दिवस लागत नाही. तरीही 14 फेब्रुवारी आपल्याकडे प्रेमाचा राष्ट्रीय सण असल्यासारखा साजरा केला जातो. त्याच मुहूर्तावर केरळची सैराट जोडी प्रिया प्रकाश आणि रोशन अब्दुल रहूफ यांना 'नॅशनल क्रश ऑफ इंडिया' असं म्हटलं जात आहे.

एका मल्याळी गाण्यातील काही क्षणांचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उमर लुलू यांनी दिग्दर्शित केलेला ओरु अदार लव्ह हा सिनेमा अजून रिलीज झाला नाही.

प्रियाने डोळ्यांनी केलेली अदा तमाम तरुणांना वेड लावत आहे. प्रिया आणि रोशनची ती अदाकारी लोक फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअॅप घाऊक प्रमाणात शेअर करत आहेत.

'मानिक्य मलरया पुवी' हे गाणं मल्याळी साहित्यातील मपिल्ला पट्टूचा प्रकार आहे. केरळच्या मलबार भागातील मुस्लिम लग्नामध्ये गायल जायचं. पण कालांतरानं ते केरळचं लोकगीत झालं. या गाण्याला शान रहमान यांनी संगीत दिलं आहे.

प्रियाला डोळा मारणारा रोशन

या गाण्यामध्ये दिसणाऱ्या मुलाचं नाव रोशन अब्दुल रहूफ आहे. विशेष म्हणजे रोशन आणि प्रिया दोघंही नवोदित कलाकार आहेत.

सोशल मीडियावर रोशनबाबत वेगवेगळ्या चर्चा चालू आहेत. बीबीसीने थेट रोशनशी बातचीत केली.

"मला एवढी प्रसिद्धी मिळेल याची कधी कल्पनाही केली नव्हती. मला कळत नाही की मी काय बोलू. मी खूप खूश आहे," असं रोशन म्हणाला.

सध्या तो केरळमधल्या त्रिशूर जिल्ह्यातील गुरुवयूर इथे राहतो. 18 वर्षांचा रोशन सध्या BCAच्या पहिल्या वर्षात शिकत आहे.

या सिनेमासाठी त्यानं ऑडिशन दिलं होतं. त्याचा हा पहिलाच अभिनय आहे.

त्या गाण्यानं प्रियाला रोशनहून जास्त प्रसिद्धी मिळाली आहे. यावर तो म्हणाला, "असं काहीच नाही, ती माझी हिरोईन असल्यानं मी खूप आनंदी आहे."

याअगोदर अभिनय तो शिकला नव्हता. मग एवढे चांगले हावभाव कसे करू शकला? "मी अगोदर रिअॅलिटी शोमध्ये काम केलं होतं. त्याची या ठिकाणी मदत झाली."

बॉलीवुडमध्ये जाणार का?

यानंतर बॉलीवुडमध्ये जाणार का, असं विचारल्यावर रोशन म्हणाला, "आता काही माहीत नाही. पुढचं कुणाला माहीत आहे?"

प्रत्यक्षात कधी असा रोमान्स केला आहे का? "नाही नाही. कधीच नाही. प्रत्यक्षात मी एवढा रोमँटिक नाही..."

रोशनला बॉलिवूड सिनेमांचा वेडा आहे. शाहरुख खान त्याला खूप आवडतो. अभिनेत्री कोणती आवडते, असं विचारल्यावर तो चटकन, "प्रिया!" असं म्हणाला.

रोशनचे वडील कतार इथल्या एका स्पेअर पार्ट कंपनीमध्ये काम करतात. घरामध्ये आई, बहीण आणि दोन भाऊ आहेत.

त्यांच्यापैकी कुणीही सिनेमामध्ये काम करत नाही. त्यामुळे मित्रमंडळी आणि नातेवाइकांना अप्रूप असल्याचं त्यानं सांगितल.

प्रत्यक्षात कशी दिसते प्रिया?

प्रिया सध्या केरळच्या त्रिशूर इथल्या विमला कॉलेजमध्ये शिकतेय. या सिनेमामध्ये तिनं शाळेतल्या मुलीची भूमिका साकारली आहे. तसंच ती क्लासिकल डान्सरही आहे.

सोशल मीडियावर या 'सैराट'

केरळ किंवा महाराष्टातच नव्हे तर संपूर्ण देशभरात प्रियाची चर्चा होत आहे. यूट्यूब इंडियानेही याची दखल घेत आज एक ट्वीट केलं आहे.

काहींना तर प्रिया 'नॅशनल क्रश ऑफ इंडिया' वाटत आहे.

फक्त प्रियाच्याच नजरेने सोशल मीडियावर खळबळ उडलीये असं नाही. रोशन राहूफ याने देखील मुलींच्या हृदयाच्या ठोके चुकवले आहेत.

सौरभ पाटील हे मात्र इतर मल्याळी गाण्यांचे चाहते असल्याचं दिसतं.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)