सोशल : 'मोहनराव! गरज आहे… बघा किती स्वयंसेवक येतात तुमच्याबरोबर काठी घेऊन?'

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत Image copyright Getty Images

'सैनिकांना देशसेवेसाठी तयार करण्यासाठी 6 ते 7 महिने लागतात. मात्र देशाला गरज पडली तर तीन दिवसात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक सज्ज होतील,' असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केल्याचं सोमवारी प्रसारमाध्यमांमध्ये छापून आलं.

मोहन भागवतांच्या या विधानाबाबत तुम्हाला काय वाटतं असा प्रश्न बीबीसी मराठीच्या वाचकांना विचारला होता.

त्यावर अनेक वाचकांनी त्यांची मतं व्यक्त केली आहेत. या प्रतिक्रियांचा हा गोषवारा...

लाठी आणि गोळ्या यातला फरक मोहन भागवतांना कळला नाही. 'कडी निंदा' आणि 'प्रत्यक्ष लढाई' यात खूप फरक असतो, असं मत शाहू जवांजळ यांनी व्यक्त केलं आहे.

माणिक भवार म्हणतात, "मोहनराव! गरज आहे… जा सीमेवर काठी घेऊन, बघा तुमच्याबरोबर किती स्वयंसेवक येतात? तुमची हिम्मत कशी होते सैनिकांबरोबर तुलना करण्याची?

दुर्गेश जगताप यांनी, "लागेल ती मदत करेन, इथपर्यंत सगळं ठिक होतं, पण हे जरा जास्तच होतय नाही का?," असं म्हटलं आहे.

Image copyright Facebook

महेश जनराव म्हणतात, "काका स्टेजवर उभं राहायला पण झेड प्लस सुरक्षा लागते तुम्हाला, एवढे बिनकामाचे स्वयंसेवक तुमचे. जाऊद्या ना कशाला उगाच स्वतःचं हसू करून घेता."

मोहन भागवतांच्या वक्तव्यांशी मी सहमत आहे, कारण जसं लोखंड लोखंडाला कापतं तसाच अतिरेकी दुसऱ्या अतिरेक्यांना मारू शकतो, अशी उपरोधिक प्रतिक्रिया दिनेश शेख यांनी दिली आहे.

वक्तव्याचा विपर्यास

दरम्यान, सरसंघचालक मोहन भागवतांच्या भारतीय सैन्याबाबतच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं दिलं आहे.

संघाने दिलेल्या स्पष्टीकरणात, भारतीय सैन्याला सर्वसामान्य भारतीयांना युद्धसज्ज करायचे असतील तर सहा महिने लागतील. मात्र, भारतीय सैन्य संघ स्वयंसेवकांना तीन दिवसांत युद्धसज्ज करू शकेल. कारण स्वयंसेवक शिस्तबद्ध असतात, असं भागवतांनी म्हटल्याचं स्पष्ट केलं आहे. मोहन भागवतांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचं संघानं म्हटलं आहे.

संघाचं हे स्पष्टीकरण प्रसिद्ध केल्यानंतर, गौरव पवार यांनी, "स्वयंसेवकांची सेना बनवायला 7-8 महिने लागतील, त्यासाठी 3-4 दिवसात स्वयंसेवक सज्ज होतील, आपण पारिवारिक संघटन आहोत, असही त्यांनी स्पष्ट केलं," असल्याचं म्हटलं आहे.

Image copyright Facebook

संघाचं स्वातंत्र्ययुध्दातलं योगदान पाहिलं तर त्यांना देशाबद्दल किती प्रेम आहे हे कळेल, असं मत यशवंत देशमुख यांनी मांडलं आहे.

तर, पूनम खेडकर म्हणतात, "आम्हाला मूर्ख समजलात का? देशाची सेना सक्षम आहे, मग यांच्या डोक्यात हा पोरकट विचार आला तरी कसा? यांचं सरकार आहे म्हणून यांना जबरदस्त वाचा फुटली आहे तीन वर्षांत!"

निशांत भोईनल्लू यांनी हा सेफ गेम असल्याचं म्हटलं आहे. संघ यु-टन घेणार आणि शहा त्यांना सोयीस्कर असेल तेच बोलणार, असं म्हटलं आहे.

तर अखिल धबर्डे यांनी हे सगळे एकाच माळेचे मणी... असल्याचं म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)