व्हॅलेंटाईन डे स्पेशल : 'टिंडर'च्या काळात कसं कराल सुरक्षित डेटिंग?

'अॅप'डेट Image copyright Getty Images

आज व्हॅलेंटाइन्स डे! गेल्या पाच-सहा दिवसांपासून प्रेमी युगुलांनी रोज डे, चॉकलेट डे, टेडी डे साजरा करून आपला 'व्हॅलेंटाइन व्हीक' साजरा करायला सुरुवात केली आहेच. पण ज्यांच्या आयुष्यात अजूनही जोडीदार नाही, त्यांचं काय?

इंटरनेटच्या महाजालात आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती शोधणं तसं नवं नाही. फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साईटवरही डेटिंगचे अनेक प्रयत्न झाले खरे; पण ते फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणं किंवा फोटो लाईक करण्यापुरतं फार फार तर चॅटिंगपर्यंत मर्यादित राहिलं.

त्यात आता फेसबुकवर फक्त तरुणच नव्हे तर आजी-आजोबा, आई-बाबांसकट अख्खं गाव असतं. अशात कोणाला रिक्वेस्ट पाठवून त्याच्याशी गप्पा मारणं फारच कठीण!

पण काळजी नको! आजच्या स्मार्टफोनच्या दुनियेत 'डेट करणं' हे एक क्लिक करण्याएवढं सोपं झालेलं आहे. त्यासाठीही 'अॅप'मार्केटमध्ये अनेक पर्याय आता उपलब्ध आहेत.

हे अॅप कोणते, आणि ते कसे वापरायचे हे आजवर अनेकांना वापरून कळलं आहेच. पण ते वापरताना कोणती खबरदारी घ्यायची, हे जाणणंही महत्त्वाचं. कारण अॅपच्या पडद्याआडून डेटिंग करणारी प्रेमळ व्यक्ती प्रत्यक्षात भेटल्यावर भलतीच अवघड निघाली तर...? काही गोष्टींची खबरदारी घेतली नाही तर, पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते.

कोणत्या या डेटिंग अॅप्स?

ऑनलाइन डेटिंग अॅपबद्दल कोणाला विचारलं तर टिंडर (Tinder), ट्रूली मॅडली (TrulyMadly), वू (Woo) , ओकेक्यूपीड (okcupid), हॅपन (happn), अशी अॅपची यादीच मिळेल.

इतकंच नव्हे तर LGBTQ समुदायासाठीही एक Grindr नावाचं अॅपही आहे. म्हणजे सर्वसमावेशक अशा इंटरनेटवर सर्वांची इच्छा पूर्ण होते.

प्रोफाइल तयार करताना...

यांपैकी कुठलंही अ‍ॅप डाऊनलोड केलं की प्रथम प्रोफाइल फोटो आणि काही बेसिक माहिती देऊन आपलं प्रोफाइल तयार करायचं. बेसिक माहिती म्हणजे तुमच्याविषयीचे काही प्रश्न विचारले जातील, तुमच्याबद्दल चार ओळी, आवडीनिवडी, तुम्ही काय करता, वगैरेवगैरे.

शिवाय, तुमचं प्रोफाईल पिक्चर एकदम आकर्षक आणि तुमच्या परीनं परफेक्ट असायला हवं!

Image copyright Getty Images

थोडक्यात, आपण वधू-वर सूचक मंडळाच्या वेबसाईट्सवर आपला बायोडेटा भरतो ना हे थोडं तसंच, पण इथे मोजकीच माहिती द्या, बरं का!

एकदा का तुमचं प्रोफाइल तयार झालं की, त्यानंतर फिल्टर वापरून तुम्ही तुमच्या 'पोटेंशियल पार्टनर'चं प्रोफाइल सर्च करू शकता. दोघांनी एकमेकांना लाइक केलं की चॅटिंगचा पर्याय अॅक्टिव्हेट होतो. त्यापुढे ही ऑनलाइन भेट ऑफलाइन न्यायची की नाही, हे ज्याच्या-त्याच्यावर अवलंबून असतं.

Image copyright Getty Images

त्यापैकी काही अॅप्स कशा वापरायच्या? जाणून घेऊया...

टिंडर

डेटिंग अॅपच्या मार्केटचा टिंडर राजा आहे. या अॅपमध्ये दोघांचंही प्रोफाईल मॅच झालं की 'राईट स्वाईप' केलं की चॅटिंग करता येतं. पण त्यासाठी तुमच्या फेसबुक अकाउंटवरून लॉग-इन करावं लागतं.

त्यानंतर हे अॅप तुमच्या आसपास अर्थातच टिंडरवर असणाऱ्या लोकांचं प्रोफाईल दाखवतो. तुम्हाला जे प्रोफाईल आवडेल त्यावर 'राईट स्वाईप' करा, जे आवडलं नाही त्याला 'लेफ्ट स्वाईप' करा. ज्याला राईट स्वाईप केलंय, त्यानंही राईट स्वाईप करून तुमच्यात इंटरेस्ट दाखवला, मग त्याच्याशी काय गप्पा सुरू!

ट्रुली मॅडली

एकमेकांसारखीच आवड-निवड असलेल्या दोन अनोळखी व्यक्तींची भेट घालून देणारं हे अॅप आहे. विशेष म्हणजे, या अॅपमध्ये मोबाईल नंबर शेअर करण्याची गरज नाही. त्यामुळे मुलींसाठी हे अॅप खूपच सुरक्षित आहे. जी व्यक्ती आवडेल तिच्यापर्यंत तुमच्या भावना पोहोचवण्यासाठी त्यांनी काही विशेष स्टिकर्ससुद्धा तयार केलेत.

Image copyright Getty Images

वू

Woo हे डेटिंग अॅप यूजर्सना त्यांच्या लाइफस्टाईल आणि इंटरेस्टच्या आधारावर मॅचिंग प्रोफाइल दाखवतं. या अॅपवर वेरिफाइड प्रोफाइलचीही सुविधा आहे, म्हणजे फेक प्रोफइलचा विषयच संपला. शिवाय, या अॅपमध्येही स्वाइप करो...चॅट करोची सिस्टीम आहे, बरं का!

Image copyright Getty Images

याची काळजी घ्या...

  • ऑथेन्टिफिकेशनच्या नावाखाली तुमचं प्रोफाइल अनेकदा फेसबुक किंवा इतर सोशल नेटवर्किंग साइटशी जोडलं जातं. अनेक अॅप थेट तुमच्या सोशल नेटवर्किंगशी कनेक्ट होत असल्यानं तुमची कोणकोणती माहिती वापरली जाणार आहे हे एकदा तपासून पाहावं.
  • तुम्हाला गरजेची वाटेल तेवढीच माहिती समोरच्या व्यक्तीला द्यावी. यामध्ये पालकांचा कुठल्याही प्रकारे सहभाग नसल्यानं संपूर्ण जबाबदारी आपली आहे, हे पक्कं लक्षात ठेवावं.
  • आपण ज्याच्याशी बोलत आहोत ते फेक प्रोफाइल असल्याची जराही शंका आल्यास तर पुढंच पाऊल टाकण्यापूर्वी शंभरवेळा विचार करा.
Image copyright Getty Images
  • अशा अॅप्लिकेशन्सवरून सर्च सुरू करताना अॅप्लिकेशनचं रेटिंग आणि युजर रिव्ह्यू तपासूनच मग लॉग इन करायचं की नाही याचा निर्णय घ्यावा.
  • जोडीदार शोधताना फसवणूक झाल्याच्या अनेक केसेस पोलिसांकडे येत असतात. पण मुळात आपली फसवणूक होईपर्यंत हा विषय वाढूच न देणं हे आजच्या 'स्मार्ट' पिढीला कळायला हवं.
  • आर्थिक बाबींविषयी माहिती, खासगी फोटो शेअर करणं टाळलं पाहिजे.
  • डेटिंग अॅप्सवरुन भेटण्याचं ठरवलंच तर एखाद्या सार्वजनिक ठिकाणीच भेटावं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)