मी केराबाई बोलतेय... माणदेशी रेडिओवर तुमचं स्वागत आहे!

  • राहुल रणसुभे
  • बीबीसी प्रतिनिधी
व्हीडिओ कॅप्शन,

पाहा व्हीडिओ : केराबाईंच्या आवाजावर अख्खा माणदेश फिदा

माणदेशी तरंग वाहिनीवर जेव्हा नमस्कार, 'दिडवागवाडी माझे गाव, केराबाई सरगर माझे नाव' असे शब्द कानावर पडतात तेव्हा प्रत्येक माणदेशी व्यक्तीचं लक्ष रेडिओकडे जातं.

साताऱ्यापासून 85 किलोमीटरवर असलेल्या म्हसवडमध्ये केराबाई सरगर यांचा आवाज आणि नावही प्रसिद्ध आहे. माणदेशी फाऊंडेशनच्या मार्फत सुरू करण्यात आलेल्या माणदेशी तरंग 90.4 या कम्युनिटी रेडिओवर त्या 1998पासून लोकगीतांचे कार्यक्रम सादर करतात.

गाण्याच्या आवडीबद्दल केराबाई म्हणाल्या की, "लहानपणापासून माझं गाणं सुरू आहे. माझी आई जात्यावर दळताना ओव्या म्हणायची. आईच्या आणि आजीच्या ओव्या ऐकत ऐकत मलाही गाण्याचा छंद लागला."

रेडिओ केंद्रावर गाण्याची आवड कशी निर्माण झाली याबद्दल बोलताना त्यांनी एक जुनी आठवण सांगितली. "आमच्या घरी एक मोठा रेडिओ होता. तो पुण्यातून आणला होता. त्याच्यावर मी सकाळ संध्याकाळ गाणी ऐकायचे. तो ऐकायला लागल्यावर, आपणही पुणे केंद्रावर जावं असं सारखं माझ्या मनात येऊ लागलं," केराबाई सांगत होत्या.

अशी झाली पूर्ण इच्छा!

आपल्या रेडिओच्या आवडीबद्दल त्यांनी मोठ्या मुलाला सांगितले.

त्याचं म्हसवडमध्ये रोज येणं जाणं आहे. म्हसवडला त्याने माणदेशी तरंग वाहिनी रेडिओ केंद्र सुरू झाल्याचा बोर्ड वाचला होता. त्यानं केराबाईंना या रेडिओ केंद्रावर नेतो असं सांगितलं. केराबाई म्हणाल्या, "मी त्याला लगेच रेडिओ केंद्रावर नेण्यासाठी सांगितले. मलाही उत्सुकता होतीच."

रेडिओ केंद्रातील तो दिवस

"मी आणि मुलगा रेडिओ केंद्रावर आलो. तिथल्या सरांनी विचारलं का आलात? तेव्हा त्यांची आणि माझी ओळख नव्हती. त्यांना मी सांगितलं की, मी गाणं म्हणण्यासाठी आले आहे.

फोटो कॅप्शन,

केराबाई आणि त्यांचं कुटुंब

तेव्हा त्यांनी आम्हाला बसायला सांगितले आणि त्यांनी मला गाणं म्हणण्याची संधी दिली. तेव्हापासून मी गाणं म्हणते."

गावकऱ्यांची उत्सुकता

केराबाई रेडिओवर गातात हे गावकऱ्यांना माहिती नव्हतं. तेव्हाचा एक किस्सा केराबाईंनी सांगितला. त्या म्हणाल्या, "इथे म्हसवडच्या जवळ चारा छावणी आहे. तिथे त्यांनी रेडिओ लावला होता.

फोटो कॅप्शन,

माणदेशी तरंग रेडिओ स्टेशनमध्ये केराबाई

तेव्हा मी म्हसवडमध्ये गाणी म्हणालेली तिथे लागायची. तेव्हा लोक मला विचारायचे तु इथे आहेस आणि तिकडे गाणे कसे काय लागतात. त्यांना तेव्हा काही माहिती नव्हतं. अजूनही अनेकांना रेडिओ केंद्राबाबत माहिती नाहीये."

घरच्यांच्या माना अभिमानाने उंचावल्या

केराबाईंच्या या प्रवासात त्यांच्या घरच्यांची फार मोलाची साथ मिळाली आहे. केराबाई शिकलेल्या नाहीत. त्यांचे पती, मुले, नातू त्यांना पुस्तकातील गाणी, कविता वाचून दाखवतात. त्या ऐकून त्या पाठ करतात.

फोटो कॅप्शन,

केराबाईंचे पती ज्ञानदेव सरगर

त्यांचे पती ज्ञानदेव सरगर सांगतात, "मी ग्रंथ वाचायचो, ती ऐकायला थांबायची. एखादा अध्याय मी वाचला की, त्या अनुषंगाने ती जात्यावरचं गाणं तयार करायची. आता गावकरी म्हणतात, तुम्ही ग्रंथ वाचत बसलात आणि म्हातारी बघा कुठं जाऊन पोहोचली." हे सांगत असताना त्यांचा आनंद गगनात मावत नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)