मुख्यमंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड : फडणवीसांविरोधात सगळ्यांत जास्त गुन्हे

  • श्रीकांत बंगाळे
  • बीबीसी मराठी
देवेंद्र फडणवीस

'असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स' या संस्थेच्या अहवालानुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात सर्वाधिक 22 गुन्हे दाखल आहेत. यातील 3 गुन्हे गंभीर स्वरूपाचे आहेत, ज्यामध्ये हल्ला करण्यास प्रवृत्त करणे आणि धारदार शस्त्रानं जखमी करणे या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.

देशातल्या 20 मुख्यमंत्र्यांचा गुन्हेगारी रेकॉर्ड स्वच्छ असून 11 मुख्यमंत्र्यांच्या विरोधात गुन्हे दाखल असल्याचं अहवालात म्हटलं आहे. शिवाय यातल्या 8 मुख्यमंत्र्यांविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे गंभीर स्वरूपाचे आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या गुन्ह्यांबद्दल भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी बीबीसीला सांगितलं, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात नोंदवण्यात आलेले गुन्हे जुने आहेत. शिवाय मुख्यमंत्र्यांनी निवडणूक लढवण्यापूर्वी या सर्व गुन्ह्यांची निवडणूक आयोगाला माहिती दिली आहे. सध्या या गुन्ह्यांवर कायदेशीर प्रक्रिया सुरू असून मुख्यमंत्र्यांनी यापासून पळ काढलेला नाही."

फडणवीसांखालोखाल केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्यावर 11 खटले दाखल आहेत. त्याखालोखाल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात 10 गुन्हे दाखल आहेत.

काँग्रेसचे श्रीमंत मुख्यमंत्री

या अहवालानुसार काँग्रेस पक्षाचे 5 तर भारतीय जनता पक्षाचे 11 मुख्यमंत्री कोट्यधीश असल्याचं समोर आलं आहे.

फोटो कॅप्शन,

'असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स' या संस्थेने भारतातल्या 31 मुख्यमंत्र्यांची संपत्ती, शिक्षण आणि पोलीस रेकॉर्डचा लेखाजोखा सादर केलाय.

'नॅशनल इलेक्शन वॉच' आणि 'असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स' या संस्थांनी मिळून देशातल्या 31 (29 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेश) मुख्यमंत्र्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांचं विश्लेषण केलं आहे.

यासाठी या 31 मुख्यमंत्र्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीला प्रमाणभूत मानण्यात आलं आहे.

या अहवालामुळे देशातल्या मुख्यमंत्र्यांची संपत्ती, शिक्षण, वय आणि त्यांच्यावरील गुन्ह्यांची माहिती समोर आली आहे.

देशातल्या 31 मुख्यमंत्र्यांपैकी 25 म्हणजेच 81 टक्के मुख्यमंत्री कोट्यधीश असल्याचे हा अहवाल स्पष्ट करतो.

देशात पाच राज्यांत काँग्रेसची सत्ता आहे. या पाचही राज्यांचे मुख्यमंत्री कोट्यधीश आहेत. उल्लेखनीय म्हणजे, देशातल्या पहिल्या 10 श्रीमंत मुख्यमंत्र्यांमध्ये काँग्रेसच्या या पाचही मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग काँग्रेसचे सर्वांत श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. त्यांची संपत्ती 48 कोटी रुपये आहे.

त्यानंतर मेघालयचे मुख्यमंत्री डॉ. मुकुल संगमा (14 कोटी), कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (13 कोटी), पुदुचेरीचे मुख्यमंत्री नारायणसामी (9 कोटी) आणि मिझोरामचे मुख्यमंत्री लाल ठाणहावला (9 कोटी), हे काँग्रेसचे श्रीमंत मुख्यमंत्री आहेत.

काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या श्रीमंतीबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बीबीसीला सांगितलं की "निवडणूक प्रतिज्ञापत्र सादर करताना काँग्रेस पक्षाचे उमेदवार उत्पन्नाबद्दल सविस्तर माहिती देतात. उत्पन्नावर करही भरतात. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचं उत्पन्न जगजाहीर असतं. उत्पनाबद्दल काहीच लपवलं जात नाही."

भारतीय जनता पक्ष 14 राज्यांत सत्तेत आहे. भाजपच्या या 14 मुख्यमंत्र्यांपैकी 11 कोट्यधीश आहेत.

अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू हे भाजपचे सर्वांत श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत मुख्यमंत्री असलेल्या खांडू यांची संपत्ती 129 कोटी रुपये इतकी आहे.

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू देशातले सर्वांत श्रीमंत मुख्यमंत्री आहेत, तर त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार हे सर्वांत कमी श्रीमंत मुख्यमंत्री आहेत.

नायडू यांच्याकडे 177 कोटी तर माणिक सरकार यांच्याकडे 26 लाखांची संपत्ती आहे.

तीनच महिला मुख्यमंत्री

देशाच्या एकूण लोकसंख्येचा विचार केल्यास जवळपास अर्धी लोकसंख्या ही महिलांची आहे. असं असलं तरी आजघडीला देशात केवळ तीनच महिला मुख्यमंत्री आहेत, असं हा अहवाल सांगतो.

फोटो कॅप्शन,

राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे

यामध्ये राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे, जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या महिला मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे.

किती शिकलेत मुख्यमंत्री?

ADRच्या अहवालानुसार, देशातले 12 मुख्यमंत्री पदवीधारक, 10 मुख्यमंत्री ग्रॅज्युएट प्रोफेशनल, 5 मुख्यमंत्री पोस्ट-ग्रॅज्युएट आणि तीन मुख्यमंत्री बारावी पास आहेत.

सिक्कीमचे मुख्यमंत्री पी. के चामलिंग हे देशातील सर्वाधिक शिकलेले मुख्यमंत्री आहेत. त्यांनी पीएचडीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)