पैशाची गोष्ट : बँकेच्या सेवांसाठी तुम्ही मोजता किती पैसे?

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
आपली बँक विविध सेवांसाठी वसूल करत असते पैसे. कुठल्या सेवेसाठी किती पैसे ते बघूया.

एक जुनी म्हण आहे, 'तुम्हाला पैसे हवे असतील तर एकतर बँक लुटा नाहीतर तुमची स्वत:ची बँक उघडा.' यातला गंमतीचा भाग सोडून देऊया. पण, त्याचवेळी या म्हणीचा आणखी एक कांगोरा आहे तो समजून घेण्याचा इथं प्रयत्न करुया.

बँकिंग सेवा

आपली सगळ्यांची बँक खाती असतात. राष्ट्रीयीकृत बँका किंवा खाजगी बँकांमधून आपण आपले पैसे सुरक्षित ठेवतो.

अनेकदा गुंतवणूकही त्यातून करतो. अलीकडे ATM आणि काँप्युटर क्रांतीनंतर बँकेचे व्यवहारही खूप सोपे आणि अनेकदा घरबसल्या करता येत आहेत.

ATMमधून आपले आपण पैसे काढणं, खात्यात किती पैसे शिल्लक आहेत ते तपासणं, संगणकाच्या सहाय्याने आपल्या खात्यातून दुसऱ्याच्या खात्यावर पैसे पाठवळं, डेबिट कार्डांच्या मदतीने आर्थिक व्यवहार करणं. या आणि अशा अनेक सेवा आपली बँक आपल्याला देत असते.

पण, आपल्यातील किती जणांना माहीत आहे की या सेवांसाठी आपल्या बँकेला आपण फीच्या स्वरुपात पैसेही देत असतो.

सरकारही सेवा कराच्या रूपाने आपल्याकडून या सेवांसाठी पैसे घेते.

प्रतिमा मथळा कुठली सेवा, किती पैसे?

कुठली सेवा, किती पैसे?

ATMचे व्यवहार किंवा डिजिटल मनी यासाठी बँक आपल्याला डेबिट कार्ड देत असते. कुठलाही आर्थिक व्यवहार तुमच्या खात्यातून झाला तर त्याचा मेसेज तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येतो.

या सुविधा आपल्यासाठी आहेत खूप फायद्याच्या. पण, त्यासाठी बँक तुमच्याच खात्यातून पैसे वसूल करत असते.

अनेकदा आपल्याला खात्यातले पैसे तपासून बघितले तर शिल्लक पैशाचा मेळ बसत नाही. खर्च झालेली रक्कम कशासाठी हेही कळत नाही.

अशावेळी हमखास आपण एखाद्या अशा सेवेसाठी पैसे मोजलेले असतात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे या सेवांसाठी प्रत्येक बँकेची फी आणि नियम वेगवेगळे आहेत.

ATM व्यवहार

ATMमधून पैसे काढणे आणि जमा करणे यासाठी पूर्वी मर्यादा नव्हती. तुम्ही मनाप्रमाणे हे व्यवहार करु शकत होता.

पण अलीकडे तुम्ही दर महिन्याला काही ठराविक व्यवहार मोफत करू शकता.

त्यानंतर तुम्हाला या सेवेसाठी बँकेला पैसे द्यावे लागतील. किती रुपयांचा व्यवहार एका दिवसात किंवा महिन्यात तुम्हाला करता येईल हे ही बँकेनुरूप ठरतं.

प्रतिमा मथळा डेबिट कार्ड वापरासाठी लागते फी

डेबिट कार्ड फी

ATM आणि डिजिटल व्यवहारांसाठी बँक तुम्हाला डेबिट कार्ड देते. त्यातून तुमची मोठी सोय होते. पण, हे कार्डही मोफत नाही.

तर तुम्ही दर वर्षाला त्यासाठी फी मोजत असता. फक्त काही बँका काही ठराविक खात्यांसाठी हे कार्ड मोफत देतात.

ऑनलाईन ट्रान्सफर

बँकेच्या ऑनलाईन व्यवहारांचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे घरबसल्या एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे जमा करता येणं.

NEFT (नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर) किंवा RTGS (रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट) या माध्यमातून आपण हे व्यवहार करतो.

या सेवेसाठी रिझर्व्ह बँकेनंच हस्तांतरण फी ठरवून दिली आहे.

रक्कम किती आहे त्यावरुन अडीच रुपयांपासून ते ५० रुपयांपर्यंत ही फी ठरते आणि लगेच तुमच्या खात्यातून ती वजा केली जाते.

Image copyright Google
प्रतिमा मथळा पैसे ट्रान्सफर करायलाही पडतात पैसे

SMS सुविधा

तुम्ही बँकेचा कुठलाही व्यवहार पूर्ण केला की तुम्हाला एक बँकेचा एसएमएस येतो.

किती रुपयांचा व्यवहार झाला, त्यासाठी किती फी लागली आणि आता खात्यात किती रक्कम शिल्लक आहे, असा मजकूर त्यात असतो.

या सेवेसाठी बँक साधारणपणे तिमाही फी तुमच्याकडून घेत असते.

बँक स्टेटमेंट

तुमच्या खात्याचा आर्थिक लेखाजोखा म्हणजे हे स्टेटमेंट. स्टेटमेंटची अतिरिक्त प्रत हवी असेल तर तुम्हाला खिसा हलका करावा लागतो.

काही वेळा पुरावा किंवा आर्थिक दाखला म्हणूनही हा दस्तावेज महत्त्वाचा असतो. तो बँकेकडून सहीशिक्क्यानिशी हवा असेल तर तुम्हाला पैसे द्यावे लागतात.

Image copyright Google
प्रतिमा मथळा बँक सेवांसाठी किती पैसे घेते हे नीट तपासून बघा

अॅव्हरेज मिनिमम बॅलन्स

याला सरासरी किमान राशी असंही म्हणतात. तुम्हाला तुमच्या खातं उघडताना ठरलेल्या नियमांप्रमाणे काही ठरावीक रक्कम दर महिन्याला किंवा तिमाहीला खात्यात ठेवावीच लागते.

ही रक्कम कमी भरली तर बँक त्यासाठी तुम्हाला पेनल्टी लावते. अर्थात, त्यासाठी खात्याचा प्रकारही (बचत, रिकरिंग, करन्ट इ.) महत्त्वाचा ठरतो.

खातं उघडतानाच बँकेकडून मिनिमन बॅलन्स समजून घ्यावा लागतो. काही बँकांसाठी तो दर महिन्याला तर काही बँकांसाठी तो दर तीन महिन्यांनी मोजला जातो.

काही बँक खाती झिरो बॅलन्स म्हणजेच शून्य रक्कम खात्यात असली तरी चालणारी असतात.

पूर्ण न झालेला ECS व्यवहार

ECS म्हणजे इलेक्रॉनिक क्लिअरिंग सिस्टिम. तुम्ही बँकेला पूर्वसूचना देऊन पुढच्या तारखेला पैसे खात्यातून वळवण्याचे निर्देश यात देऊ शकता.

महिन्याच्या ठरावीक तारखेला वीज बिल देण्याची सोय असो किंवा एखाद्या तारखेला आयुर्विम्याचा प्रिमिअम भरायचा असतो, ECS मार्फत तुमची बँक तुमच्यासाठी हे करते.

पण त्या तारखेला खात्यातच तेवढे पैसे नसतील तर त्याचा दंड बँक तुमच्याकडून वसूल करते.

Image copyright Google
प्रतिमा मथळा तुम्हाला नको असलेल्या बँक सेवा त्वरित बंद करा

चेकबुकसाठी पैसे

साधारण सगळ्याच बँका पहिलं चेकबुक किंवा वर्षभरातून काही ठरावीक चेक तुम्हाला मोफत देतात. पण, त्यानंतर चेकबुकसाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतात.

तुमच्या बँक खात्याच्या प्रकारावर हे पैसे ठरतात.

याशिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेले आर्थिक व्यवहार, पेट्रोलसाठी लागणारा सरचार्ज असे कितीतरी व्यवहार आहेत ज्यासाठी आपण पैसे मोजत असतो.

शिवाय बँक कुठली आणि खात्याचा प्रकार कुठला यावर ही फी ठरत असते. प्रत्येक बँकेची फी आणि ती घेण्याचा प्रकार वेगवेगळा असतो.

पण, या सगळ्या फीची माहिती बँकेच्या वेबसाईटवर देणं बँकेसाठी बंधनकारक आहे. त्यामुळे आपलं खातं आणि त्यानुसार विविध सेवांसाठी लागणारी फी याचा नीट आणि वेळोवेळी आढावा घेणं महत्त्वाचं आहे.

ज्या सेवांचा फारसा वापर आपण करत नाही त्या वेळेत बंद करणं, चेकबुकचा कमीतकमी वापर करणं आणि आर्थिक शिस्त स्वत:ला लावणं हा उपाय नक्कीच करता येईल.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)