ग्राउंड रिपोर्ट : अयोध्येत रामराज्य रथयात्रेचा कार्यक्रम फ्लॉप का ठरला?

राम राज्य रथ यात्रेतील रथाची प्रतिकृती Image copyright SAMIRATMAJ MISHRA
प्रतिमा मथळा रामराज्य रथयात्रेतील रथ अयोध्येच्या प्रस्तावित राममंदिरासारखा बनवण्यात आला होता.

अयोध्येच्या रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादावर एकीकडे सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून दुसरीकडे हिंदू आणि मुस्लीम पक्षांमध्ये न्यायालयाबाहेर तडजोडीचे प्रयत्न सूरू आहेत.

पण या सर्व धामधुमीत 13 फेब्रुवारीला अयोध्येहून काही हिंदू संघटनांच्या एका 'रामराज्य रथयात्रे'ला सुरुवात झाली. ही रथयात्रा 41 दिवसांचा प्रवास करून राम नवमीला तामिळनाडूस्थित रामेश्वरमला पोहोचणार आहे.

या यात्रेतला मुख्य रथाला हिंदू संघटनांनी राम मंदिराच्या मॉडेलचं स्वरूप दिलं आहे. अयोध्येच्या प्रस्तावित राम मंदिराच्या प्रतिकृतीप्रमाणे हा रथ सजवण्यात आला आहे.

अयोध्या ते रामेश्वरमपर्यंतची ही रथयात्रा जरी केवळ एक शुद्ध धार्मिक कार्यक्रम वाटत असली तरी त्यातील रथाचा आकार हा प्रस्तावित राम मंदिराच्या आकारासारखा असेल. मग आयोजकांमध्ये काही हिंदू स्वंयसेवी संघटना आणि भारतीय जनता पक्षाच्या लोकांचा समावेश असेल तर त्याचा राजकीय अर्थही निघणारच, हे स्पष्टच आहे.

हेच नव्हे तर यात्रा रवाना होण्यापूर्वी तिथल्या भाषणांची भाषा आणि उत्साह हेच सांगत होता की उपस्थित लोकांना काय हवं आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा राम मंदिरासाठीच्या साहित्याची राखणदारी करताना एक पोलीस (संग्रहित)

बजरंग दलाचे अध्यक्ष प्रकाश शर्मा घोषणा करत होते की, "बाबरचा जन्म इथं झालेला नाही. बाबरला मानणाऱ्या लोकांसाठी या देशात कुठलंही स्थान नाही."

पूर्ण भाषणात प्रकाश शर्मा हेच सांगत होते की, "मोदीच्या कार्यकाळात सगळ्या जगात भारताचाच डंका वाजत आहे. मध्य पूर्वच्या देशांमध्ये वंदे मातरम आणि भारत मातेचा जयजयकार केला जात आहे. मोदी आणि योगी यांच्या युगात आता वातावरण असं आहे की, राम मंदिर तयार होणारच."

विश्व हिंदू परिषदेनं स्पष्ट केलं आहे की या रथयात्रेला आपला पाठिंबा आहे पण या यात्रेचे आम्ही संयोजक नाही.

मग रथयात्रेचं आयोजक कोण?

या रथयात्रेचं आयोजन दक्षिण भारतातील एक स्वंयसेवी संस्था 'रामदास मिशन युनिवर्सल सोसायटी'ने केलं आहे. पण यात्रेला हिरवा झेंडा दाखवण्याचं काम विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री चंपत राय यांनी केलं आहे.

Image copyright SAMIRATMAJ MISHRA
प्रतिमा मथळा रथ यात्रेच्या कार्यक्रमाला झालेली गर्दी

कार्यक्रमाचं सूत्रसंचलन विश्व हिंदू परिषदेचे प्रदेश प्रवक्ता शरद शर्मा करत होते. व्यासपीठावर साधू-संत आणि हिंदू संघटनांच्या नेत्यांशिवाय अयोध्येचे भाजपचे खासदार लल्लू सिंह पण उपस्थित होते.

या यात्रेला भाजपाचा पाठिंबा आहे किंवा नाही, या प्रश्नावर खासदार लल्लू सिंह यांनी स्पष्ट उत्तर देणं टाळलं. त्यांच म्हणणं होतं, "राष्ट्रवादाला पाठिंबा आणि त्याच्या विकासासाठी जोही कार्यक्रम राबविला जाईल, त्यात भाजप सहभागी होईल. समाजात राष्ट्रीय विचारधारेचा प्रभाव कसा वाढेल, हे पाहणं भारतीय जनता पक्षाचं काम आहे आणि ते तेच करत आहेत."

दक्षिण भारतीयांचा समावेश

खरंतर आधी चर्चा होती की मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी या यात्रेला हिरवी झंडी दाखवतील. पण योगी हे त्रिपुरात होते. अखेर अयोध्येतून निघालेल्या या रामराज्य रथयात्रेला संतांनीच भगवे झेंडे दाखवून रवानगी केली.

Image copyright AFP/GETTY IMAGES
प्रतिमा मथळा रथयात्रेत सहभागी लोक

पण यात सगळ्यांत आश्चर्यकारक गोष्टी ही होती की, स्थानिक मंडळी अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच उपस्थित होती. हजारो लोकांची क्षमता असलेल्या कारसेवकपूरम परिसरात अगदी काहीशेच लोकं उपस्थित होती.

त्यातही बहुतांश लोक दक्षिण भारतीय होते. यात्रेच्या आयोजकांपैकी एक असलेले केरळचे रहिवासी सुरेश यांनी सांगितलं की, "केरळ आणि कर्नाटकहून इथे 50 भाविक आले असून ते यात्रेसोबतच चालणार आहेत."

त्यांच्यामते ही रथयात्रा उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांतून जवळपास सात हजार किलोमीटरचं अंतर कापणार आहे.

25 लाखांचा रथ

फैजाबादचे युवा पत्रकार अभिषेक सावंत यांच म्हणणं आहे की, "मागील अनेक दिवसांपासून प्रचार-प्रसार करूनही लोकांनी कशी काय पाठ फिरवली, ही आश्चर्याची गोष्ट आहे. जवळपास 25 लाख रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या रथाला पाहण्यातही लोकांना रस दिसत नाही, जेव्हा की मागील दोन दिवसांपासून हा रथ इथं उभा आहे."

Image copyright AFP/GETTY IMAGES
प्रतिमा मथळा संग्रहित छायाचित्र

स्थानिकांशी याबाबतीत बोलल्यावर कळलं की त्यांना या कार्यक्रमाची माहिती होती पण तिथं जाऊन रथ पाहण्यात कुणालाही फारसा रस नव्हता.

हेच नव्हे तर, अयोध्येच्या रस्त्यांवरून रथयात्रेनिमित्त निघालेल्या शोभायात्रे दरम्यानही फारसे लोकं त्यात सहभागी झाले नसल्याचं चित्र पहायला मिळालं.

भाजपच्या 'ऑफ दि रिकॉर्ड' असणाऱ्या हिंदू संघटनांचा जोरदार पाठिंबा असतानाही भाजपचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी (खासदार आणि महापौर वगळता) तिथं दिसले नाही. तसेच हिंदू संघटनांशी जोडल्या गेलेलेही तिथं दिसले नाही. लोकांसाठी ही कोड्यात टाकणारी बाब होती.

'...मंदिर तर नाही झालं'

"लोकांपेक्षा जास्त इथं मीडियावालेच दिसत आहेत," असं लखनऊहून आलेले एक पत्रकार चेष्टेत म्हणाले. या कार्यक्रमाकडे लोकांनी पाठ का फिरवली, या प्रश्नालाही स्थानिक लोक जास्त महत्त्व देताना नाही दिसले.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा 6 एप्रील 2004ला लालकृष्ण आडवाणी पूजा करण्यासाठी अयोध्येत आले होते.

हनुमानगढीजवळ उभ्या असलेल्या काही लोकांना याविषयी विचारलं तेव्हा एका दुकानदारानं फार मजेशीर उत्तर दिलं.

"अयोध्येत गेल्या 20-25 वर्षांपासून आम्ही हेच सगळ पाहत आलोय. मंदिर तर अजूनपर्यंत झालं नाही. कुठं निवडणुका होणार असल्या तर अयोध्येत मंदिर बनवण्याच्या शपथा घेण्यासाठी आणि देण्यासाठी लोक इथं पोहचतात. त्यानंतर पुन्हा ते गायब होतात."

28 वर्षांपूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी पण अयोध्येत राम मंदिर निर्माण करण्याच्या उद्देशानं रथ यात्रा काढली होती. मंदिर तर झालं नाही पण हो बाबरी मशीद मात्र पाडल्या गेली.

आता हे प्रकरण कोर्टात आहे. अशात रथयात्रा मंदिर निर्माणाचा मार्ग कसा प्रशस्त करेल, हे सांगणं जरा अवघडच आहे.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)