#5मोठ्याबातम्या : पंजाब नॅशनल बँकेत 11 हजार कोटींचा महाघोटाळा

पंजाब नॅशनल बँक, घोटाळा. Image copyright Getty Images/INDRANIL MUKHERJEE
प्रतिमा मथळा पंजाब नॅशनल बँकेत घोटाळा झाल्याचं उघडकीस आलं आहे.

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया -

1. पंजाब नॅशनल बँकेत कोट्यवधींचा घोटाळा

पंजाब नॅशनल बँकेच्या (PNB) मुंबईतल्या काही शाखांमध्ये 11,360 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचं उघड झालं आहे. सकाळ ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

नियमानुसार ही बाब बँकेनं राष्ट्रीय शेअर बाजार तसंच मुंबई शेअर बाजाराला कळवल्यानंतर बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली. त्याचे पडसाद शेअर बाजारात उमटून PNB च्या समभागासह शेअर बाजाराच्या निर्देशांकात घसरण झाली.

हिरे व्यापारी नीरव मोदी याने बँकेच्या अधिकाऱ्यांच्या साह्याने हा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. त्यात काही बड्या सराफांचे लागेबांधे असून त्यात आणखी काही बँकांचा समावेश असण्याची शक्यता आहे.

परदेशातील देणी चुकती करण्याच्या उद्देशाने सराफा व्यावसायिकांनी नियमबाह्यपणे दक्षिण मुंबईतील PNBच्या शाखेतून अल्प मुदतीची कर्ज घेतली. बँकेच्या कर्मचाऱ्यांनीच मोदी यांना बनावट हमीपत्रं दिली. 2011 पासून हा प्रकार सुरू असल्याचं तपासात उघड झालं.

बँकेच्या तक्रारीनुसार CBIने नीरव मोदीसह सात जणांवर गुन्हा नोंदवला. केंद्र सरकारनं PNBला 5,473 कोटी रुपयांची भांडवली मदत केली होती. बँकेला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या सरकारच्या मनसुब्यांना याने धक्का बसला आहे.

2. गारपीटग्रस्तांना तुटपुंजी मदत

विदर्भ आणि मराठवाड्यातल्या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारनं प्रती हेक्टरी 18 हजार रुपयांपर्यंत मदत जाहीर केली आहे. पण ती मदत तुटपुंजी असल्याचा आरोप विरोधकांनी केल्याचं वृत्त लोकमतने प्रसिद्ध केलं आहे.

Image copyright BBC/Amey Pathak
प्रतिमा मथळा गारपिटीने महाराष्ट्राला तडाखा दिला आहे.

गारपिटीमुळे चार दिवसात साधारण एक लाख 90 हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झालं आहे. सुमारे 1800 गावांना गारपिटीचा तडाखा बसला आहे. केंद्र सरकारकडे 200 कोटी रुपयांच्या मदतीसाठी विनंती करणार असल्याचं कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सांगितलं.

तर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हेक्टरी किमान 50 हजार रुपये देण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.

3. कृपाशंकर सिंह यांची मुक्तता

मिळकतीपेक्षा जास्त संपत्ती बाळगल्याप्रकरणीच्या खटल्यातून काँग्रेसचे नेते आणि माजी राज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांची मुक्तता करण्यात आली आहे.

कोणत्याही लोकनेत्याविरोधात खटला चालवण्यासाठी सक्षम प्राधिकरणाची परवानगी आवश्यक असते. मात्र या प्रकरणात अशी परवानगी घेण्यात आलेली नाही. यामुळे कृपाशंकर सिंह यांच्या विरोधात खटला चालवताच येणार नसल्याचं एसीबी कोर्टात सांगण्यात आलं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा कृपाशंकर सिंह

आरोपपत्रानुसार कृपाशंकर यांच्याविरोधात कोणतेही सबळ पुरावे सादर करण्यात तपास यंत्रणा अयशस्वी ठरली. यामुळे लाचलुचपत विभागामार्फत दाखल करण्यात आलेल्या खटल्यातून कृपाशंकर यांना दिलासा मिळाला आहे.

4. एक्स्प्रेसवेच्या विस्तारासाठी 8000 झाडं तोडणार

मुंबई आणि पुण्याला जोडणाऱ्या एक्स्प्रेसवेच्या विस्ताराकरता आठ हजार झाडं तोडावी लागणार आहेत. त्या मोबदल्यात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) जालना जिल्ह्यात 80 हेक्टर जागेवर वृक्षारोपण करणार असल्याची बातमी महाराष्ट्र टाइम्सने दिली आहे.

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो 3 प्रकल्पासाठी झाडं तोडण्यावरून सध्या बराच वाद सुरू आहे. मुंबई-पुणे महामार्गावर खोपाली ते खंडाळा या घाटमार्गात नव्या मार्गिकेसह मुंबई पुणे एक्स्प्रेसवे आणि राष्ट्रीय महामार्गाचे आवश्यकतेनुसार रुंदीकरण करण्यात येणार आहे.

प्रचंड वाहतूक आणि अधूनमधून कोसळणाऱ्या दरडींमुळे या मार्गावर अनेकदा वाहतूककोंडी होत असते. ही कोंडी फोडण्यासाठी राज्य सरकारनं नियुक्त केलेल्या सल्लागार कंपनीनं 1995 मध्ये घाटमार्गाला पर्याय सुचवला होता.

त्यानुसार एक्स्प्रेसवेचं रुंदीकरण आणि घाटमार्गात बोगद्याचं काम हाती घेण्यात आलं.

5. फुलेंवरील चित्रपट

स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे जोतिबा फुले यांचं जीवनकार्य राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यासाठी त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या निर्मितीसाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी मान्यता देण्यात आली, असं वृत्त महाराष्ट्र टाइम्सने दिलं आहे.

Image copyright Government of Maharashtra
प्रतिमा मथळा जोतिबा फुले यांचे छायाचित्र महात्मा फुले समग्र वाड्मयातून

फुले यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट मराठी, हिंदी आणि इंग्रजीतून तयार होणार असून, व्यावसायिक संस्थेकडून चित्रपटाची निर्मिती होईल. निर्मितासाठी वर्षभराचा कालावधी देण्यात येणार असून, त्याकरता ई-निविदा मागवून संस्थेची निवड करण्यात येईल.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)