ब्रेकअप के बाद : प्रेमभंगानंतर काही लोक यशस्वी का होतात?

ब्रेकअप Image copyright RyanKing999

एके सकाळी अनिकेत आणि प्रियाचं (नावं बदलली आहेत) ब्रेकअप झालं. प्रियानं अचानक घेतलेल्या या निर्णयाने अनिकेत सैरभर झाला. त्याच्यासाठी तीच तर सर्वकाही होती, फक्त प्रियाच त्याचं विश्व होती. मग तिने असं काय केलं असावं?

पुढे अनिकेतने स्वतःला सावरलं, त्यात त्याला बराच वेळ लागला. पण त्याने नवीन मार्ग शोधला आणि स्वतःचं करिअर वेगळ्या वाटेनं घडवून दाखवलं.

ब्रेकअप आणि त्यातून होणाऱ्या हार्टब्रेकनंतर अनेक जण नैराश्यात जातात. बरेच जण व्यसन आणि निरर्थक रिलेशनशिपमध्ये अडकतात, आणि काही तर स्वतःला संपवण्याचाही विचार करतात.

पण या उलट काही जण ब्रेकअपनंतर स्वतःला यशस्वी करून दाखवण्याची मनाशी गाठ बांधून घेतात. अशी अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला दिसतील.

अनिकेत म्हणतो, "खरं तरं ब्रेकअपनंतर त्रास फार झाला. पण मी परिस्थिती स्वीकारली. त्या आघाताने स्वतःला शोधण्याची एक संधी मिळाली. तिच्या निर्णयाचा मी आदर करतो, आजही तिच्याबद्दल माझ्या मनात चांगल्या भावना आहेत."

पण हे नेमक घडतं कसं? काय आहे यामागची सायकॉलॉजी?

नाकारलं गेल्याची भावना

प्रेमभंगानंतर यश मिळवणारे बरेच लोक आहेत, असं कोल्हापूरच्या काउन्सिलर डॉ. कल्याणी कुलकर्णी सांगतात. बीबीसी मराठीशी बोलताना त्या म्हणाल्या, "ब्रेकअप म्हणजे असतं तरी काय? ते एक प्रकारचे रिजेक्शन असतं, तुम्हाला कोणीतरी नाकारलं असतं. ही रिजेक्शनची भावना मोठी असते. चुकीच्या पद्धतीने वागवलं गेल्याबद्दल मनात संतापाची भावना तयार झालेली असते. प्रेम आणि तिरस्कार एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात."

Image copyright PeopleImages

ज्या कारणांमुळे आपण नाकारले गेलो आहोत त्या गोष्टींपासून दूर करून स्वतःला सिद्ध करण्याच्या मागे यातूनच अनेकजण लागतात, असं डॉ. कुलकर्णी सांगतात. "ज्या कारणाने आपल्याला नाकारलं गेलं ते संपवण्याचा प्रयत्न सुरू होतो."

अनेक जण या रिजेक्शननंतर स्वतःच्या प्रगती करण्यामागे लागतात आणि त्यातून अनेकांचं करिअर उजळून निघतं.

इतिहासातही या संदर्भातील दाखले दिसून येतात. महाकवी कालिदास यांच्या संदर्भातली कथा प्रसिद्ध आहेत. त्यांचा विवाह राजकुमारी विद्योत्तमाशी झाला होता. पण कालिदास हे अशिक्षित असल्याने त्यांना घरातून हाकलून दिलं होतं आणि पंडित बनल्याशिवाय घरी येऊ नका असं सांगितलं होत. कालिदासांनी अभिज्ञानशाकुंतलम् सारख्या कितीतरी महान रचना नंतरच्या काळात केल्या आहेत.

उर्जेचा सकारात्मक वापर

"प्रेमात असताना मेंदूमध्ये काही हार्मोन्सची पातळी वाढलेली असते. त्यातून एक प्रकारची मानसिक ऊर्जा निर्माण झालेली असते, आणि प्रेमभंगानंतर तीच ऊर्जा कुठेतरी वळवता आली पाहिजे. काही जणांनाच हे शक्य होतं," असं डॉ. कुलकर्णी सांगतात.

होतं असं की, प्रेमात असताना मानसिकदृष्ट्या तेवढाच अँगल विकसित झालेला असतो. अगदी दुसरे लोक काय सांगत आहेत, हे डोक्यात रजिस्टरसुद्धा होत नसतं. अविचाराने निर्णय घेण्याची वर्तणूकसुद्धा वाढलेली दिसून येते. कारण अशा स्थितीमध्ये दुसरं काही सुचतच नसतं.

मग ब्रेकअपनंतर काय करावं?

सर्वप्रथम, ब्रेकअप मनात ठेऊ नका! डॉ. कुलकर्णी सांगतात की, अशा वेळेत तुमच्या जवळचे लोक, जे तुम्हाला समजून घेऊ शकतात, त्यांच्याशी तुमच्या भावना शेअर करा. "मनातल्या मनात कुढत बसल्याने फारच त्रास होतो. यातून काही जण मार्ग काढतात आणि एक नवी दृष्टी, एक इनसाईट विकसित करतात. ते फार महत्त्वाचं असतं."

Image copyright hadynyah

पूर्वीची परिस्थिती वाईट होती. अशा परिस्थितीतून स्वतःच बाहेर यावं लागायचं. ना फोन्स होते, ना कुठले काऊन्सिलर.

आता मात्र परिस्थिती बदलली आहे. आता तंत्रज्ञानामुळे मित्रांशी, जवळच्यांशी जमेल तेव्हा आणि तसं मन मोकळं करणं शक्य झालं आहे. काऊन्सिलर आणि मनोविकारतज्ज्ञ यांच्या मार्गदर्शनाचा चांगला फायदा होऊ शकतो.

"बिघडलेल्या मनःस्थितीत अवेअरनेस, इनसाईट, मानसिक व्यवस्थापन आणि तणावाचा कसा सामना करावा, ही माईंड टूल्स अवगत करता येणं आवश्यक असते," असं डॉ. कुलकर्णी म्हणाल्या.

व्यवसायात अपयशी होण्यासारखंच?

कोल्हापुरातील मनोविकारतज्ज्ञ डॉ. कविता शहा यांनी यावर विषयावर वेगळा विचार मांडला आहे. "मुळात जर पाहिलं तर हा विषय व्यक्तिमत्त्वाशी संबंधित आहे. ब्रेकअपसारख्या घटनांना संबंधित व्यक्ती त्याच्या व्यक्तिमत्त्वानुसार सामोरं जाते," असं त्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

"ब्रेकअप हा मोठा वैयक्तिक डाऊनफॉल असतो. त्याचा सामना करण्याची क्षमता प्रत्येकाची वेगळी असते. त्यामुळे ब्रेकअपमुळं लोक यशस्वी होतात, असं समीकरण चुकीचं आहे. यात मूळ वाटा असतो तो व्यक्तिमत्त्वाचा," असं त्या म्हणाल्या.

"एखाद्या व्यवसायात अपयश आल्यानंतर पुन्हा नव्या जोमानं उभं राहण्यासारखंच आहे हे."

निगेटिव्ह सेल्फ इमेज

जे ब्रेकअपमधून गेले आहेत, त्यांच्यात निगेटिव्ह सेल्फ इमेजची समस्या बऱ्याच वेळा दिसून येते, असं डॉ. कुलकर्णी यांनी सांगितलं.

अशा व्यक्तींमध्ये स्वतःच्या शरीराबद्दल, रंगाबद्दल, वजनाबद्दल, शिक्षणाबद्दल आणि आर्थिकस्थितीबद्दल न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. यातूनही अनेक जण नंतर बाहेर पडतात, असं त्यांनी सांगितलं.

एखादं सादरीकरण करताना, व्यासपीठावर बोलताना आपण कुठं तरी कमी पडू, हे performance pressure किंवा अशी भीती या व्यक्तींच्या मनात असते, असं त्या म्हणाल्या.

अंतर्मनात काय सुरू असतं?

डॉ. कुलकर्णींच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक व्यक्तीची एक आदर्श प्रतिमा असते आणि एक खरंखुरं व्यक्तिमत्व असतं. समाजात वावरताना आपण ती आयडियल इमेज परिधान करून वावरत असतो, त्या मागची खरी व्यक्ती वेगळीच असते.

Image copyright Sam Edwards

ब्रेकअपनंतर जे यशस्वी होतात, ते बऱ्याच वेळा ही इमेज विसरून गेलेले असतात आणि स्वतःच्या कामात गुंतून गेलेले असतात. पण अंतर्मनात काय सुरू असतं?

"अंतर्मनात मात्र एक भावना कायम असते ती म्हणजे 'ती किंवा तो' एक दिवस परत आपल्या आयुष्यात येईल," असं डॉ. कुलकर्णी म्हणाल्या. "अगदीच खरं सांगायचं तर प्रत्येक यशामागं एक ब्रेकअप, एक रिजेक्शन असतंच असतं."

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)