रेड लाईट एरियात कधी प्रेम बहरू शकतं का?

  • सिंधुवासिनी
  • बीबीसी हिंदी
प्रातिनिधीक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

"तुम्हाला माहिती आहे ना आज व्हॅलेंटाईन डे आहे? प्रेमाचा दिवस... मला म्हणायचंय प्रेम साजरा करण्याचा दिवस...?" मी थोडं बिचकत बिचकतच एका सडपातळ महिलेला विचारलं.

रस्त्याच्या कडेलाच एका दगडावर थकलेल्या अवस्थेत ती महिला बसलेली होती. खोलवर आत गेलेले डोळे आणि डोळ्याखालची काळी वर्तुळं.

तिचा चेहरा बरंच काही सांगत होता. ती कदाचीत काहीतरी चावत होती. प्रश्न ऐकल्यानंतर तिथंच बाजूला एका कोपऱ्यात थुंकत म्हणाली, "हो माहिती आहे. व्हॅलेंटाईन्स डे आहे. मगं काय?"

"तुम्ही कोणावर प्रेम करतात का? म्हणजे तुमच्या जीवनात असं कुणीतरी ज्याच्यावर तुम्ही..."

अजून प्रश्न पूर्णही झाला नव्हता की त्या मध्येच वाक्य तोडत म्हणाल्या. "आमच्यासारख्या वेश्यांवर कोण प्रेम करणार मॅडम? कुणी प्रेम करत असतं तर इथं बसलो असतो का?"

एवढं बोलून त्यांनी मला बसायचा इशारा केला. मी तिथंच त्यांच्या बाजूला जमिनीवर बसून त्यांच्याशी गप्पा सुरू केल्या.

रस्त्याच्या कडेला एका अरुंद जागेत काही महिला थोड्या-थोड्या अंतारवर बसल्या होत्या. गल्ली आणि मुख्य रस्ता यांच्या तोंडावर जी काही थोडीशी मोकळी जागा होती, तिथून पायी चालणारे ये-जा करत होते.

मी दिल्लीतल्या जीबी रोडवर असलेल्या अशा परिसरात उभी होती, जिथं महिला देहविक्री करून दोन वेळेच्या जेवणाची सोय करत असतात.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

प्रातिनिधीक छायाचित्र

इथं येण्यापूर्वी मला 'जरा संभाळून' आणि 'सतर्क' राहण्याचे सल्ले देण्यात आले होते. मी पण माझ्याकडून पूर्ण सतर्कता बाळगत होती.

मला जाणून घ्यायचं होतं, की ज्या महिलांकडे लोक फक्त सेक्ससाठी येतात त्यांच्या जीवनात प्रेम किंवा प्रेमाची भावना यासारखं काही असतं की नाही? 'व्हॅलेंटाईन्स डे'चा उल्लेख त्यांच्या डोळ्यांमध्ये चमक आणतो की नाही?

याच प्रश्नांनी मला या गल्ल्यांकडे ओढलं. मी विचार केला होता की, मी अशा जागेवर जात आहे, जिथं रंग-बेरंगी पडदे लावलेले असतील, चमचमणारे दिवे असतील. जसं हिंदी सिनेमांमध्ये दाखवतात तसं. पण तिथं तर असं काहीच दिसलं नाही.

तो एक गर्दीचा परिसर होता. जिथं नजरेच्या टप्प्यात एक पोलीस स्टेशन, हनुमान मंदिर आणि काही लहान-मोठी दुकानं होती. थोडीशी विचारपूस केल्यावर एकानं गल्लीकडे बोट केलं. जिथं एक मजबूत बांध्याची महिला कमरेवर हात ठेऊन उभी होती.

चेहऱ्यावर जेवढं हास्य ठेवता येईल तेवढं ठेवत मी त्यांना भेटली. जसं की माझी आणि त्यांची फार आधीपासून ओळख असावी. त्यांच्याशी चर्चा केल्यावर त्यांनी इतर महिलांची भेट घडवून देण्याचं मान्य केलं.

'जब तक है बोटी, मिलती रहेगी रोटी'

अशारीतीनं माझी भेट 'त्या' सडपातळ महिलेशी झाली ज्यांचा उल्लेख मी वर केला आहे. कर्नाटकातल्या या महिलेचं म्हणणं होतं की, त्यांनी प्रेम-वगैरे गोष्टी कचऱ्याच्या कुंडीत फेकून दिल्या आहेत.

आपल्या चेहऱ्याकडे इशारा करत त्या म्हणाल्या, "जब तक है बोटी, मिलती रहेगी रोटी. आमच्याकडे सगळेजण एखाद्या तासासाठी येतात. एंजॉय करण्यासाठी. बस! किस्सा खत्म."

फोटो कॅप्शन,

याच गल्लीत ग्राहकांची प्रतिक्षा करतात महिला

कोलकताची निशा मागील 12 वर्षांपासून या धंद्यात आहे. त्या म्हणाल्या, "तसं तर पुरुष मंडळी इथं मोठमोठ्या गप्पा मारतात. पण कुणाची एवढी औकात नाही की आमच्याशी प्रेम करण्याची हिंमत दाखवतील. कुणात एवढा दम नाही की इथून ते आम्हाला त्यांच्या घरी घेऊन जातील."

गेल्या 12 वर्षांत त्यांनी इथं कुणालच प्रेमात पडताना नाही पाहिलं का? याचं उत्तर देताना त्या म्हणाल्या, "बघीतलं ना! लोक येतात. प्रेमाच्या आणाभाका घेतात. लग्न करतात. मुलबाळही होतं. पण काही वर्षांनी तेच सोडून निघून जातात."

'प्रेम पण केलं आणि लग्नही...'

36 वर्षांच्या रिमा यांची कथाही काहीशी अशीच आहे. त्या म्हणतात, "तुम्ही विचारलं म्हणून सांगते. मी प्रेमात पडले होते. माझ्याच एका ग्राहकाच्या. आम्ही लग्न केलं आणि मला तीन मुलंही झाली."

रिमाला वाटलं की लग्नानंतर त्यांच जीवन बदलेल. पण ते आणखीणच बिकट झालं. त्या आठवूण सांगतात, "तो दिवसरात्र दारू प्यायचा. ड्रग्जच्या नशेत राहायचा. मला मारझोड करत होता. हे सगळं तर मी सहनं करत होते, पण नंतर त्यानं मुलांवरही हात उचलायला सुरुवात केली."

शेवटी रिमा यांनी या जाचाला कंटाळून नवऱ्यापासून वेगळं व्हायचा निर्णय घेतला आणि जिथून कायमचं बाहेर काढण्याचं वचन दिलं गेलं होतं, त्याच कुंटणखान्यात त्या परतल्या.

आमचं बोलण सुरुच होतं की एका महिलेने मला वरच्या मजल्यावरील खोल्यांमध्ये जायला सांगितलं.

ती म्हणाली, "मॅडम तुम्ही वरच्या खोलीत जा. तिथं खूपसाऱ्या मुली तुम्हाला भेटतील. तुम्हाला पाहून लोकं इथं गर्दी करत आहे. हे चांगल वाटत नाही. "

बंद, काळोख्याखोल्यांमध्ये

एक क्षण विचार केल्यानंतर मी वरच्या मजल्यावर जाणारी उंचचउंच शिडी चढायला लागले. दुसऱ्या मजल्यावर पोहचताच अचानक अंधार झाला.

मी घाबरून ओरडलेच. इथं तर फारच अंधार आहे! खालून कुणीतरी जोरात ओरडून उत्तर दिलं, "मोबाइलची बॅटरी सुरू करा आणि पुढं जा."

हिंमत करून मी मोबाइलची बॅटरी ऑन केली आणि चौथ्या मजल्यावर पोहचले. तिथं पोहचल्यानंतर मला जवळपास 11-12 मुलींच्या घोळक्यानं गराडा घातला.

फोटो कॅप्शन,

अशा खोल्यांमध्ये सेक्स वर्कर्स राहतात.

काहींनी जीन्स टीशर्ट घातले होते. काहींनी साडी तर काहीजणी फक्त स्पॅगेटी आणि टॉवेलमध्येच होत्या.

"तुम्ही फोनमध्ये काही रेकॉर्ड तर करत नाही ना? तुम्ही कुठं कॅमेरा तर लपवलेला नाही ना? फोटो तर नाही काढला?" अशा एकामागून एक प्रश्नांचा भडीमार झाला. मी मान डोलवतच नाही म्हणत वातावरणाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला.

तिथं अनेक लहान कोंदट खोल्या होत्या. त्यातल्या काही खोल्यांमध्ये पुरुषही होते. एक व्यक्ती लक्ष्मी आणि गणपतीच्या फोटोला अगरबत्ती ओवाळत होता आणि एकजण कपात चहा ओतत होता.

कुंटणखान्यात भारत

तिथं कुणीतरी राजस्थानचं होतं तर कुणी पश्चिम बंगालमधून आलेलं होतं. एक मुलगी मध्यप्रदेशमधून आलेली तर एक कर्नाटकातून आलेली. मला त्या छोट्या खोल्यांमध्ये एक लहानसा भारत दृष्टीस पडला. त्या साऱ्या मुलीही मला माझ्यासारख्याच वाटत होत्या.

फोटो स्रोत, Getty Images

हा सगळा विचार करत असतानाच मला एक मुलगी तिच्या बोटातल्या अंगठीकडे टक लाऊन बघत असलेली मी पाहिलं. मी तिला लगेचच विचारलं ती कुणावर प्रेम करते का? तीच्या जीवनातही कुणी 'स्पेशल' आहे का?

ती हसून म्हणाली, "आता तर कुणी प्रेमाच्या गोष्टी जरी करत असला तर त्याच्यावर विश्वास नाही ठेवणार. पैसे दे, थोड्यावेळ राहा आणि इथून फूट. पण प्रेमाच्या गप्पा नको मारूस."

ती बोलतच राहीली. "एक होता जो माझ्याशी प्रेमाच्या गोष्टी करायचा. पण मग प्रेमाच्या नावानं माझ्याकडून पैसे लूबाडायला लागला. असं कुठं प्रेम असत का? असं कुणी प्रेम करत असतं का?"

बाजूलाच उभ्या असलेल्या एका मुलीनं सांगितलं, "मला एक मुलगा आहे. मी त्याच्यावरच प्रेम करते. तशी तर मी सलमान खानवर पण प्रेम करते. त्याचा नविन सिनेमा येतोय का?"

'तुमचा प्रश्नच चुकीचा आहे'

इतकं सांगत असतानाच ती जोरजोरात ओरडू लागली, "वर! वर!! वर!!" मी घाबरून इकडं-तिकडं बघायला लागले. ती जोरात हसली आणि म्हणाली, "काही नाही हो मॅडम. एक कस्टमर दिसत होता. त्याला वरती बोलावत होती. हेच आमचं जीवन आहे. तुम्ही आम्हाला प्रश्नच चुकीचा विचारला."

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

प्रातिनिधीक छायाचित्र

आता मात्र कोपऱ्यात गेल्या काही वेळेपासून आमच्या गोष्टी ऐकत शांतपणे उभ्या असलेल्या मुलीशी मी बोलू इच्छित होते. मी तिच्याकडे वळाली तर ती मागे सरकली आणि म्हणाली, "बाथरूम रिकाम झालं आहे. मी आंघोळीला चालले. महाशिवरात्रीचा उपवास आहे माझा," एवढं म्हणून ती निघूनही गेली.

गप्पा मारता-मारता बराच वेळ झाला होता. मी जड अंतकरणानं शिडी उतरायला लागली. एवढ्या साऱ्या महिलांमध्ये मला कुणी असं नाही भेटलं जिच्या जीवनात प्रेम होतं.

हाच विचार करत मी गर्दीनं ओसांडून वाहत असलेल्या रस्त्यावर परत आले. जवळच्याच दुकानात गाण वाजतं होतं. "बन जा तू मेरी राणी, तेनू महल दवा दूंगा..."

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)