सोशल - 'थोड्याच दिवसांत हे मंत्रालयाची जम्बो सर्कस करतील'

मंत्रालय

फोटो स्रोत, Mantralaye

गेल्या काही दिवसांमध्ये मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न झाल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. मंत्रालयात वारंवार होणारे असे प्रयत्न रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मंत्रालयात युद्धपातळीवर जाळ्या बसवण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे.

त्या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीनं वाचकांना विचारलं होतं की "मंत्रालयात आत्महत्या रोखण्यासाठी शासनानं जाळ्या लावल्या आहेत. याविषयी तुमचं मत काय?"

वाचकांनी यावर भरभरून प्रतिक्रिया पाठवल्या आहेत, त्यातल्याच या काही निवडक प्रतिक्रिया.

जाळ्या लावण्यापेक्षा फडणवीस सरकारनं लोकांच्या समस्या सोडवाव्यात. मौन बाळगून बसण्याऐवजी शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नावर नीट त्यांना समजतील अशी उत्तरे द्यावीत आणि त्यांचं समाधान करावं तरच आत्महत्या थांबतील, असं मत तुषार व्हनकाटे यांनी व्यक्तं केली आहे.

तर, "या जाळ्या बचावसाठी नसून तीनदा हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर आता मुख्यमंत्रीच कोसळतील म्हणून लावण्यात आल्या आहे," अशी प्रतिक्रिया अक्षय साळवी यांनी दिली आहे.

फोटो स्रोत, Facebook

मंत्रालयात जाळ्या लावून तुम्ही तुमच्या नाकर्तेपणाचा बिगुल वाजवला आहे, असं मत संदेश बच्छाव यांनी व्यक्त केलं आहे.

साजीद मुल्ला यांनी उपरोधक प्रतिक्रिया देत फडणवीस सरकारवर टीक केली आहे. ते म्हणतात, "फडणवीसांचं कौतुक करावं तेवढं थोडच आहे, कारण शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी असला जालीम उपाय बहुतेक कुणी केला नसेल."

फोटो स्रोत, Facebook

"अधिकाऱ्यांच्या विचारांनाच जाळं लावण्याची गरज आहे, कारण तिथंच खूप धुळ साचली आहे," असं मत मानसी बोरवणकर यांनी व्यक्त केलं आहे.

तर कृष्णा सोनारवडकर यांनी "हे थोड्या दिवसांत मंत्रालयाची जम्बो सर्कस करतील" असं म्हटलं आहे.

सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सुटणे महत्त्वाचे आहे, मंत्रालयाला जाळ्या लावून प्रश्न सुटणार आहेत का? असा सवाल राजेंद्र गधारी यांनी विचारला आहे.

फोटो स्रोत, Facebook

"आत्महत्या करा पण मंत्रालयात नको" असं फडणवीस सरकारचं म्हणणे दिसतंय, अशी प्रतिक्रिया अजय वाडके यांनी दिली आहे.

तर "सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा योग्य निर्णय आहे. पण राज्यातल्या प्रत्येक नागरिकाचा त्या मंत्रालयावर हक्क आहे. आपल्या न्याय मागण्यासाठी आलेल्या नागरिकाला योग्य आणि वेळेत न्याय दिला तर त्याला आत्महत्येचं पाऊल उचलावं लागणार नाही आणि त्यामुळे लोकप्रितिनिधिंची उरलीसुरली अब्रू वाचेल," असं मत दीपक चौगले यांनी व्यक्त केलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)