सनी लिओनी करतेय वांग्याच्या पिकाची राखण!

सनी लियोनी

फोटो स्रोत, SUNNYLEONE/fACEBOOK

फोटो कॅप्शन,

पण सनी लिओनी कशी वाचवणार कुणाचं शेत?

"माळ्याच्या मळ्यामंदी कोण गं उभी? राखण करते मी रावजी," हे गाणं आपण अनेकदा ऐकलं असेल. पण असा 'रावजी' म्हणून आवाज देणारी चक्क सनी लिओनी असेल तर?

आंध्र प्रदेशच्या एका शेतकऱ्यानं हा विचार चक्क प्रत्यक्षात साकारलाय... जवळपास!

म्हणजे खुद्द सनी लिओनी सदेह तर नाही पण लाईफसाईज पोस्टरमधून ती खरंच त्याच्या शेताची राखण करत आहे.

नेल्लोर जिल्ह्यातल्या बांदाकिंदिपल्ली गावचे चेंचू रेड्डी सध्या आपल्या या भारी शक्कलीनं सोशल मीडियावर चर्चेत आहेत. पण त्यांनी हे पोस्टर लावलं तरी का?

आपल्या पिकांना वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी त्यांनी हे पोस्टर लावलं आहे, असं त्यांनी सांगितलं.

फोटो कॅप्शन,

चेंचू रेड्डी यांनी सनी लिओनीचं पोस्टर शेतात लावलं आहे.

रेड्डी आपल्या 10 एकराच्या शेतात रेड्डी वांगी, कोबी, मिर्ची आणि भेंडीसारख्या भाज्या पिकवतात. रेड्डी सांगतात, "शेतात या वर्षी चांगलं पीक उगवलं आहे, आणि शेत रस्त्यालगत असल्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्यांचं लक्ष त्यांच्या पिकांकडे जातं, त्यामुळे शेतीचं नुकसान होतं."

म्हणून रेड्डी यांनी त्यांच्या शेताबाहेर सनी लिओनीचं हे पोस्टर लावलं आहे. आणि त्यावर लिहिलं आहे - 'मला बघून रडू नका!'

दक्षिण भारतातल्या प्रथा

बीबीसीशी बोलताना चेंचू रेड्डी यांनी सांगितलं की, त्यांचा हा फॉर्म्युला काम करत आहे, कारण लोकांच्या वाईट नजरा आता त्यांच्या पिकांवर पडत नाहीयेत.

दक्षिण भारतात प्रचलित मान्यतेनुसार घराबाहेर एखादी भीतीदायक मूर्ती किंवा मुखवटा लावला की घरावर वाईट नजर पडत नाही.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

पक्ष्यांना आणि प्राण्यांना शेतातून दूर सारण्यासाठी बुजगावणं लावणं तर प्रचलित आहे.

अनेक लोकांना असं वाटतं की हा नियम शेत आणि उत्तम पिकांवरही लागू होतो. लोकांच्या वाईट नजरांमुळे पिकं खराब होतात, कारण काही लोकांना कुणाचं चांगलं झालेलं बघवत नाही.

तर काही लोकं पक्षी आणि जनावरांपासून आपल्या पिकांना वाचवण्यासाठी असे उपाय करतात.

चेंचू रेड्डी सांगतात, की त्यांनी फक्त या पद्धतीत थोडा बदल केला, आणि त्यांच्यासाठी हे काम करत आहे.

'...मग या शेतकऱ्यांवर खटला दाखल करा'

पण या प्रकाराने अंधश्रद्धा वाढेल, अशी भीती व्यक्त करत गोगिनेनी बाबू नावाच्या एका शेतकऱ्यानं रेड्डींच्या पोस्टरबाजीवर आक्षेप घेतला आहे. "ही सगळी अंधश्रद्धा आहे, लोकांच्या नजरेमुळे कधी कुणाचं नुकसान होऊ शकतं का?"

फोटो स्रोत, FACEBOOK / BABU GOGINENI

फोटो कॅप्शन,

गोगिनेनी बाबू

"लोकांच्या वाईट नजरांमुळे जर खरोखरच कुणाचं नुकसान होत असेल, तर उद्या सनी लिओनीचं काही बरंवाईट झालं तर त्यासाठी या शेतकऱ्याला जबाबदार धरणार का? मग त्याच्यावर खटला दाखल करणार का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

या पोस्टरमुळे शेतात काम करणाऱ्या महिला मजुरांनाही काम करणं अवघड होऊन बसलं आहे. याचा विचार देखील चेंचू रेड्डींनी करायला पाहिजे होता, असं गोगिनेनी बाबू सांगतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)