#5मोठ्याबातम्या : PNB घोटाळ्याप्रकरणी 2 कर्मचारी निलंबित, नीरव मोदी देशाबाहेर पळाले?

नीरव मोदी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

नीरव मोदी

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया -

1.पंजाब नॅशनल बँक प्रकरणी दोषी कर्मचाऱ्यांचं निलंबन

"पंजाब नॅशनल बँकेने दोषी कर्मचाऱ्यांना निलंबित केलं असून बँक या प्रकरणातून पुन्हा उभारी घेईल," असं पंजाब नॅशनल बँकेनं (PNB) म्हटल्याचं वृत्त एबीपी माझानं दिलं आहे.

पंजाब नॅशनल बँकेत 11,360 कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर दिल्लीमध्ये बँकेकडून पत्रकार परिषद घेण्यात आली.

मुंबईच्या ब्रीच कॅंडी शाखेतून डेप्युटी मॅनेजर गोकुळनाथ शेट्टी आणि इतर कर्मचाऱ्यांना हाताशी धरून नीरव मोदी आणि त्यांच्या साथीदारांनी बँकेची आर्थिक फसवणूक केली आहे. यानंतर त्याच्या देशभरातील 10 ठिकाणांवर ED अर्थात अंमलबजावणी संचालनालयाकडून झाडाझडती सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान या प्रकरणामुळे विरोधकांनी मोदी सरकारला धारेवर धरलं आहे. "बँकेत पैसा ठेवावा, तर नीरव मोदीची भीती आणि पैसा घरात ठेवावा, तर नरेंद्र मोदींची भीती," अशा शब्दात महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पंतप्रधान मोदींवर केला आहे.

दरम्यान, नीरव मोदी यांनी घोटाळा उघडकीस येताच देशातून पलायन केल्याचं वृत्त 'एबीपी माझा'ने दिलं आहे. मात्र, या वृत्ताला अद्याप सरकारी यंत्रणांकडून दुजोरा मिळालेला नाही, असं लोकसत्ताने दिलं आहे.

2. मेट्रोच्या कामांमुळे मुंबई नामशेष होईल : बाँबे हायकोर्ट

मेट्रोच्या कामांमुळे भविष्यात मुंबई नामशेष होईल आणि फक्त मेट्रोच शिल्लक राहील, अशा शब्दांत मुंबई हायकोर्टानं महाराष्ट्र सरकारला आणि मेट्रो रेल प्राधिकरणाला झापलं आहे.

फोटो स्रोत, bigapple/Getty Images

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

आरे कॉलनीतील कारशेड कांजूरमार्गाला हलवण्यासंदर्भात अमृता भट्टाचारजी यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी सुरू आहे.

एबीपी माझानं दिलेल्या बातमीनुसार, मेट्रोच्या कारशेडमुळे आरे कॉलनीतील जंगलाला नुकसान होणार नसल्याचा राज्य सरकार आणि मेट्रो प्राधिकरणाचा दावाही हायकोर्टानं फोल ठरवला आहे.

"मेट्रोच्या कामासाठी ज्या प्रकारे पर्यावरणाचा समतोल न साधता वृक्षतोड सुरू आहे, त्यानुसार मुंबईत उरलीसुरली झाडंही नष्ट होतील," अशी भीती यावेळी हायकोर्टानं व्यक्त केल्याचा बातमीत उल्लेख करण्यात आला आहे.

3. '...तर नाणार प्रकल्प होणार नाही!'

स्थानिकांचा विरोध असेल तर नाणार प्रकल्प होणार नाही, असं मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन मिळाल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माध्यमांना सागितलं आहे.

महाराष्ट्र टानं दिलेल्या बातमीनुसार, राजापूरमधील प्रस्तावित नाणार प्रकल्पाबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळ उद्धव यांनी ग्रामस्थांच्या असहमती पत्रांचा गठ्ठाच मुख्यमंत्र्यांपुढे ठेवला.

व्हीडिओ कॅप्शन,

पाहा व्हीडिओ - 'प्राण गेला तरी जमीन देणार नाही!': राजापूच्या स्थानिकांचा रिफायनरीला विरोध का?

"नाणार येथील ग्रामस्थांच्या भावनांचा आदर केला जाईल, स्थानिकांचा विरोध असेल तर नाणार प्रकल्प होणार नाही," असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं उद्धव यांनी भेटीनंतर माध्यमांना सागितलं.

4. राज्यातील पोलीस एनकाऊंटर सुरूच राहतील : योगी आदित्यनाथ

आतापर्यंत 1,200 पोलीस एनकाऊंटरमध्ये 40 गुंडांना मारण्यात यश आलं असून यापुढेही असे एनकाऊंटर सुरूच राहतील, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

द इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या बातमीनुसार, राज्य विधानसभेत शून्य प्रहराच्या चर्चेवेळी बोलताना ते म्हणाले, "गुन्हेगारांविषयीची सहानुभूती लोकशाहीसाठी धोकादायक आहे. 22 कोटी लोकसंख्येच्या उत्तर प्रदेशात गुन्हेगारांना प्रोत्साहन देण्याचं काम कुणी केलं, हे सर्वांना माहिती आहे."

5. शाळा विश्वस्ताच्या पत्नीची 79 विद्यार्थ्यांना मारहाण

शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची तयारी करताना वर्गात मोठा आवाज झाला, म्हणून संतापलेल्या शाळेच्या विश्वस्ताच्या पत्नीने विद्यार्थ्यांना मारहाण केली.

लोकसत्तानं दिलेल्या बातमीनुसार, ठाण्यातल्या गौतम प्राथमिक-माध्यमिक विद्यालयातल्या 79 विद्यार्थ्यांना प्लास्टिकच्या दांड्याने मारहाण झाल्याचं पालकांकडून सांगण्यात येत आहे. त्यापैकी 18 विद्यार्थ्यांची जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.

या विद्यार्थ्यांमध्ये काहींचं हाताचं हाड मोडलं आहे तर काहींना मुकामार लागला आहे. या घटनेने संतप्त पालकांनी ठाणेनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)