इराणी चहा आणि बिर्याणीचं लज्जतदार हैद्राबाद कनेक्शन

इराणी चहा

जेव्हा कोणी हैद्राबाद असा शब्द उच्चारतं तेव्हा आधी मनात येतं ते म्हणजे, 'चहा आणि बिर्याणी.'

"या गोष्टी माझ्या दिनचर्येचा अविभाज्य घटक आहेत. 3 कप चहा प्यायल्याशिवाय माझा दिवस सुरू होत नाही," असं 50 वर्षीय चर्मोद्योजक कपातून बशीत चहा घेत सांगत होते.

'रेड रोज' रेस्टॉरेंटमध्ये चहा, लुखमी, समोसा असे पारंपरिक इराणी पदार्थ मिळतात. 18 वर्षीय मोहम्मद रझाक चहाला येणाऱ्या लोकांकडे आणि काऊंटरकडे लक्ष ठेवतो.

त्याचे आजोबा सय्यद अली अकबर बोलोकी हे 1970 साली हैद्राबादमध्ये स्थलांतरित झाले आणि सिटी लाईट्स नावाचा इराणी पद्धतीचा कॅफे उघडला.

"माझे वडील सय्यद रझाक बोलोकी यांनी 28 वर्षांपूर्वी हा कॅफे सुरू केला. मी इराणी वंशाचा असलो तरी भारताच्या विशेषत: हैद्रबादच्या संस्कृतीशी माझी जास्त जवळीक आहे. आमच्या कॅफेत जसा चहा मिळतो तसा फार कमी ठिकाणी मिळतो. लोकांना आमचे पदार्थ आवडतात याचा आम्हाला अतिशय आनंद आहे," असं तो सांगतो.

इराण आणि हैद्राबादचं जुनं नातं

इराणी चहाचंच फक्त हैद्राबादशी जुनं नातं नाही. कुली कुतूब शाह घराणं 16व्या शतकात इराणहून दिल्लीला आणि तिथून दक्षिणेला आलं.

हैद्राबादवर इराण आणि इराणची संस्कृती, तिथले पदार्थ आणि भाषेचा मोठा प्रभाव आहे. निजाम इराणी लोकांना 'आगा साहब' असं संबोधत असत.

"इतिहासाचा अभ्यास केला तर लक्षात येतं की हैद्राबादचा उभारणीत इराणी लोकांचा मोठा वाटा आहे. डेक्कन (दख्खन) ही सुवर्णसंधीची भूमी आहे असा उल्लेख इतिहासात आहे. अनेक घराणे तिथे असल्याने इथल्या अर्थव्यवस्थेला हातभार लागला आहे. म्हणून इराणी लोक या भागाकडे आकर्षित झाले," असं डेक्क्न हेरिटेज ट्रस्टचे विश्वस्त मुहम्मद सफिउल्लाह सांगतात.

त्यांनी डेक्कनच्या इतिहासाचा अभ्यास केला आहे.

कुली कुतुबशाही आणि निझामच्या काळात उलेमा, इंजिनिअर यांना हैद्राबादला आमंत्रित केलं होतं.

"हैद्राबादच्या रचनेवर शिराझ आणि इस्थान या शहरांचा प्रभाव आहे. लग्नसंबंधांमुळे देखील इराण आणि हैद्राबाद यांच्यातले बंध दृढ झाले," असं ऑल इंडिया शिया माजलिस ए उलेमा वा झाकरीनचे अध्यक्ष डॉ. सय्यद निसार हुसैन हैदर आगा यांनी सांगितलं

इराणी लोकांच हैद्राबादमध्ये स्थलांतर 400 वर्षांपूर्वी सुरू झालं. अनेक इराणी कुटुंबांना हैद्राबाद त्यांना घरासारखं वाटायचं. दारविशी हे त्यातलंच एक कुटुंब आहे. जमाल दारविशी हे त्यांच्या घराण्याचे तिसऱ्या पिढीचे वंशज आहे. त्यांचे आजोबा 1919 साली इराणच्या याझ्ड भागातून मुंबईत आले.

"त्या दिवसांत अनेक झोहरास्ट्रियन कुटुंब होते. काही लोक त्यांच्या मूळ गावातून तिथे आले होते. त्यामुळे माझ्या आजोबांना वाटलं की आपलं कुटुंब तिथे सुरक्षित राहील. माझं कुटुंब 1960 साली हैद्राबादला आलं कारण तिथे इराणी लोकांचा जास्त प्रभाव होता. तिथलं धर्मनिरपेक्ष वातावरण आणि आपुलकीमुळे हैद्राबाद हे आमचं घर वाटायला लागलं," असं जमाल दारविश म्हणतात.

हाच जिव्हाळा आणि शांतता पुढे नांदेल, अशी त्यांना आशा वाटते. शिया आणि सुन्नी एकत्र नांदू शकतात अशी हैद्राबाद एकच जागा आहे, असं मुहम्मद सफीउल्लाह सांगतात.

तिसरी इराणी पिढी

तिसऱ्या आणि चौथ्या पिढीचे लोक आता स्वत:ला 'पक्का हैद्राबादी' असं म्हणत असतील तरी ते त्यांचं मूळ अजून विसरलेले नाहीत.

"आम्ही घरी पर्शियन भाषेत बोलतो. मी अगदी प्रशिक्षण घेतलं नाही पण ही भाषा ऐकतच मी लहानाचा मोठा झालो. इराणी पदार्थ आमच्या नेहमीच्या जेवणात असतातच. आमच्या घराच्या रचनेवरसुद्धा इराणी संस्कृतीचा प्रभाव आहे. आम्हांला आमच्या परंपरांचा अभिमान आहे. घरच्या पाहुण्यांना प्रेमानं आणि आपुलकीनं वागवायला आमची संस्कृती शिकवते. हेच सगळं आमच्या हैद्राबादच्या प्रेमात, खाण्यात दिसतं," असं 23 वर्षीय हैदर जोवकार सांगतात.

प्रतिमा मथळा हैदर जोवकार

हैदर हैद्राबादमधील सर्वी या हॉटेलचे मालक असून ते या घराण्याच्या तिसऱ्या पिढीचं प्रतिनिधित्व करतात. इराणमधील छेलो कबाब हा पदार्थ फक्त दोन ठिकाणी उत्तम मिळतो. सर्वी हे त्यातलं एक आहे.

"अवाश हा इराणी पदार्थ आता हलीम म्हणून ओळखला जातो. इराणी चहासुद्धा आता बदलला आहे. बिर्याणी हा अगदी हैद्राबादसाठी समानार्थी शब्द बनला आहे. त्यामुळे इराणी पदार्थात आता बदल झाले आहेत आणि आमच्यासारखेच ते हैद्राबादी झाले आहेत." असं हैदर सांगतात.

हे सांगताना, त्यांच्या सहकाऱ्याला दख्खनी उर्दूमध्ये सांगतात, "लाईट लाव रे.."

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)