सोशल - 'शेवटी सर्व राजकीय पक्ष एकाच माळेचे मणी'

नीरव मोदी

फोटो स्रोत, Getty Images

"पैसा बँकेत ठेवावा, तर नीरव मोदीची भिती आणि पैसा घरात ठेवावा, तर नरेंद्र मोदींची भिती," अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नीरव मोदी प्रकरणावरुन पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला आहे.

पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतल्या ब्रीच कँडी शाखेत 11, 360 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचं बुधवारी स्पष्ट झालं. भारतातल्या सार्वजनिक बँकांपैकी एक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेनं या प्रकरणात अडकलेल्यांची नावं जाहीर केलेली नाहीत.

"2011पासून हा घोटाळा सुरू होता. मात्र यंदा 3 जानेवारीला हे सगळं प्रकरण बाहेर आलं. संबंधित तपास यंत्रणांना याची माहिती देण्यात आली", असं बँकेचे कार्यकारी संचालक सुनील मेहता यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, याप्रकरणी प्रसिद्ध हिरे व्यापारी नीरव मोदी यांचं नाव पुढे येत आहे. यावरूनच, विरोधकांनी सरकार आणि पंतप्रधानांना टीकेचं लक्ष्य केलं.

यावर बीबीसी मराठीनं सोशल मीडियावर वाचकांना त्याचं मत विचारलं होतं.

त्यावरून सोशल मीडियावर रंगलेल्या चर्चेचा हा आढावा.

या चर्चेत सहभागी झालेले संदेश बच्छाव लिहितात, "हो हे शत प्रतिशत खरं आहे. नरेंद्र मोदी भ्रष्टाचार संपवण्यात अपयशी ठरलेयत. हे तर काँग्रेस पेक्षा जास्त भ्रष्टाचारी निघालेत. सरकार या सर्वांना पाठिशी घालत आहेत."

फोटो स्रोत, Facebook

तर या सर्व घोटाळ्यांची सुरूवात शरद पवारांच्या काळात झाली असल्याचं रामचंद्र यांनी म्हटलं आहे.

शाहू जवंजाळ म्हणतात, ललित मोदींचा घोटाळा काँग्रेसच्या काळातला आणि सुष्मा स्वराज यांनी त्यांना व्हीसा दिला तर ती माणुसकी. होय, विकास खरंच पागल झाला आहे, असं ही त्यांनी पुढे म्हटलं आहे.

सचीन कडू यांनी घोटाळ्या करण्यात मराठी माणूस नेहमीच मागे राहतो असं म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Facebook

प्रवीण साबळे म्हणतात, "कुठे घोटाळा करायचा बाकी आहे ते सांगा, आता तिकडे जाऊन घोटाळा करू."

तर "काँग्रेसनं ज्यांना खाऊ दिलं त्यांना भाजपने परदेशी जाऊ दिलं. शेवटी सर्व राजकीय पक्ष एकाच माळेचे मणी. गुन्हेगार मोकळेच त्यांना शिक्षा नाहीच. सगळे कायदे सामान्य माणसासाठीच," असं मत अजय वाकडे यांनी व्यक्त केलं आहे.

शेतकऱ्यांच्या पैशांवर कोणी डल्ला मारला ते जाहीर करा, अशी प्रतिक्रिया विनय भिडे यांनी दिली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)