#HerChoice ‘मी लग्न केलं नाही म्हणून तुला बाबा नाहीत’

दत्तक मुलगी
प्रतिमा मथळा 'मी माझ्या मुलीला दत्तक घेतलंय. ती अशा कुटुंबात वाढतेय, जिथे आई आहे, पण वडील म्हणून कोणी नाही...'

'सिंगल' असणं हे अजिबात वेदनादायी नाही. मुलीला वाढवतानाचा हा एकेरी पालकत्वाचा प्रवास माझ्यासाठी खूप आनंददायी आहे. मला पुरुषांविषयी अजिबात तिटकारा नाही. मला त्यांच्याविषयी आदर आहे आणि निमिषालाही. पण मी लग्न का नाही केलं, याचं सोपं उत्तर माझ्याकडे नव्हतं आणि एकटी असतानाही मी दत्तक प्रक्रियेतून मुलगी दत्तक घेतली.

माझी सात वर्षांची मुलगी निमिषा इतर मुलांसारखीच आनंदी, निरागस, कुतूहल असणारी आहे. आजूबाजूच्या जगाविषयी आणि स्वत:च्या आयुष्याविषयीही तिला नेहमीच नेहमीच कुतूहल असतं. लहान असताना आजूबाजूला पाहून मला सारखं विचारायची, "आई, माझे बाबा कुठे आहेत?"

मी लग्न केलं नाही. त्यामुळे मी तिला नेहमी सांगायचे, "मी लग्न केलं नाही म्हणून तुला बाबा नाहीत." पण बहुतेक तिला माझं हे उत्तर पटलं नसावं.

माझी मुलगी अशा कुटुंबात वाढतेय, जिथे आई आहे पण वडील म्हणून कोणीच नाही. म्हणूनच आजूबाजूला बघताना तिला हा प्रश्न पडला असावा.

निमिषा पाच वर्षांची होती तेव्हा एकदा मला म्हणाली, "आई, तू म्हणतेस ना मुलगा आणि मुलगी मोठं झाल्यावर लग्न करतात आणि नंतर त्यांना मूल होतं. मग मी ज्या आईच्या पोटातून आले तिने कोणाशी तरी लग्न केलं असणारच ना. म्हणजे मला जन्म देणारी आई आपल्याला जशी ठाऊक नाही, तसंच आपल्याला माझे बाबा कोण आहेत, तेही ठाऊक नाही. पण मला बाबा आहेत."

निमिषाचं बोलणं ऐकल्यानंतर मला रडू आलं. पाच वर्षांच्या मुलीच्या मनात जे प्रश्न आले होते, त्याचं उत्तर तिनेच शोधायचा प्रयत्न केला होता.

असे हे आव्हानांचे आणि कसोटीचे क्षण.. आई म्हणून जसे अनेकदा आले तसे माणूस म्हणूनही आले.

६ महिन्यांची असताना निमिषा घरी आली. तेव्हापासून आई म्हणून आणि पालक म्हणूनही माझा अनुभव समृद्ध करणारा आहे.

#HerChoice ही मालिका आहे १२ भारतीय स्त्रियांच्या आयुष्यांवरील खऱ्याखुऱ्या कहाण्यांची. आधुनिक भारतीय स्त्रीच्या समोरील आव्हानं आणि तिच्या जगण्याचा विस्तारलेला परीघ उलगडण्याचा हा प्रयत्न आहे. या कहाण्यांच्या केंद्रस्थानी आहेत, तिच्या जगण्याचा वेध घेणारं तिचं निवड स्वातंत्र्य, आकांक्षा आणि इच्छा.

ती अजूनही मला सांगत असते, 'आई लग्न कर ना...'

मी तिला सांगते, 'असं नाही की मला लग्नच करायचं नाही... कदाचित करूही शकेन. पण मला समजून घेणारा जोडीदार मिळाला तरच. आणि अर्थातच तो तुलाही समजून घेणारा हवा.'

मी लग्न का केलं नाही?

'सिंगल' असणं हे अजिबात वेदनादायी नाही. मुलीला वाढवतानाचा हा एकेरी पालकत्वाचा प्रवास माझ्यासाठी खूप आनंददायी आहे.

मला पुरुषांविषयी अजिबात तिरस्कार नाही. मला त्यांच्याविषयी आदर आहे आणि निमिषालाही.

पण मी लग्न का नाही केलं, याचं सोपं उत्तर माझ्याकडे नव्हतं आणि एकटी असतानाही मी पालक झाले.

साधारण २० वर्षांपूर्वी आमच्या समाजात परंपरागत व्यापारालाच प्राधान्य असे. त्यामुळे आमच्या समाजात उच्चशिक्षित शिकणारी मुलं बोटावर मोजण्याइतकी सापडायची. काहींना भेटलेही. मनं जुळणं आणि कौटुंबिक मूल्यं माझ्यासाठी महत्त्वाची होती. तर समोरच्या व्यक्तीला 'दिसायला सुंदर आहे का?' यामध्ये रस होता. त्यांना मनाच्या सुंदरतेत रस नव्हता.

यानिमित्ताने मी स्वतःला समजून घेत होते.

मी ग्रामीण भागात लहानाची मोठी झाले. घरात पारंपरिक मूल्य होती. काही प्रमाणात जुन्या विचारांचे संस्कार होते. इतर मुलींसारखी माझीही ओळख जोपासली गेली नाही. मताला किंमत नव्हती. लहानपणीच वाटत होतं - स्व:ओळख खूप महत्त्वाची आहे.

प्रतिमा मथळा 'आपल्या आयुष्याचे निर्णय इतर कोणी का घ्यायचे? आपणच आपले सारथी ही जाणीव खूप पक्की होती.'

एक बरं होतं की घरात शिक्षणाला विरोध नव्हता. आमच्या कम्युनिटीत बरेचजण परंपरागत व्यापार करतात. त्यामुळे उच्चशिक्षित तसे कमीच. मला बीएससीनंतर एमएससीसाठी आयआयटीमध्ये प्रवेश मिळत होता. नातेवाईक खूप विरोध करत होते. पण माझे वडील मला आयआयटीमध्ये जाण्यासाठी पाठिंबा देत होते. त्यामुळे माझ्या आयुष्यात वडिलाचं स्थान आदराचं आहे.

आपल्या आयुष्याचे निर्णय इतर कोणी का घ्यायचे? आपणच आपले सारथी ही जाणीव खूप पक्की होती. शिक्षणच काय लग्नासारखा निर्णयही स्वत:ची ओळख (self-identity) कायम ठेवून घेतला पाहिजे, अशी माझी भूमिका होती.

माझा लग्नाविषयीचा निर्णय होई तोवर माझ्या मनात पक्का विचार आकार घेत होता, "मला माझं आयुष्य कसं जगायचंय ते ठरवू द्या."

आपलं आयुष्य 'ड्राईव्ह' करताना 'नवरा' नावाचा पुरुष आयुष्यात जोडीदार म्हणून नकोय, हे कळत गेलं.

माझ्या आईवडिलांची माझ्या लग्न न करण्याविषयी तशी तक्रार होती, पण हे ही माहित होतं की आपली मुलगी पारंपरिक संसारात रमणारी नाही.

एव्हाना मी आर्थिकदृष्टा स्वावलंबी झाले होते. काही नोकऱ्या केल्यानंतर सॉफ्टवेअर कंपनीतील नोकरी स्वीकारली. पगारही चांगला होता. याच काळात कंपनीच्या CSRच्या माध्यमातून गरीब वस्तीतल्या मुलांशी संबंध आला. त्यांना शिकवण्यात मन रमू लागलं. मी त्यांच्यात भावनिकरीत्या कसे गुंतले ते कळलंही नाही.

तेव्हा एक शल्य जाणवत होतं की आपण यांच्यासाठी यापलिकडे काही करू शकत नाही.

एकेरी पालक होण्याचा निर्णय

वयाची पस्तीशी ओलांडली होती. आयुष्य आनंदी होते. समाधानी होते. हा माझा स्वभावच आहे. मला पॉझिटिव्ह जगायला आवडतं. या टप्प्यावर असताना एकदा माझे आईवडील मला म्हणाले, "तू लग्न करणार नाहीस, पण मग दत्तक प्रक्रियेतून पालक का होत नाहीस? आमची काहीही हरकत नाही."

माझ्या मनात दत्तकविषयीचा विचार येऊन गेला होता. पण माझ्यासमोर अडचण होती ती घरात येणाऱ्या बाळाचं इतरांशी कसं बाँडिंग होणार? तिला एकटं सांभाळू शकणार का? अडकले असं वाटणार तर नाही? यावर निर्णय घेण्यासाठी मी स्वत:ला दोन वर्षं दिली आणि अखेर ठरवलंच.

बाळ घरी येणार तो दिवस जवळ येत होता. पण मनात कुठेतरी साशंक होते. माझ्या आयुष्यात मित्र-मैत्रिणींचं स्थान अढळ आहे. ते माझी सपोर्ट सिस्टम आहेत.

मला वाटत होतं, 'मी सिंगल आहे तर हा निर्णय कसा घेऊ?'

तेव्हा माझी जवळची मैत्रीण गार्गी मला म्हणाली, "एरव्ही तू हो किंवा नाही हे निर्णय सहज घेतेस. मग दत्तकविषयी इतकी संभ्रमात का आहेस? कोणताही निर्णय घेतलास तर आमचा पाठिंबा आहे."

त्या दिवशी मी घरी आले आणि मला जे वाटतंय ते भराभरा लिहून काढलं. माझ्या विचारांमध्ये सुस्पष्टता होती. किंतू होता तो आपण या मुलीची जबाबदारी एकट्याने पेलू शकू की नाही याचा. मला ही जबाबदारी हवी होती.

प्रतिमा मथळा 'तो दिवस आम्हा सर्वांसाठी आनंदाचा उत्सव असल्यासारखा होता...'

मग ठरलं, माझी रक्ताची माणसं, जवळचे नातेवाईक, मित्रपरिवार असे सगळेजण आम्ही ६ महिन्यांच्या निमिषाला आणायला गेलो. तो दिवस आम्हा सर्वांसाठी आनंदाचा उत्सव असल्यासारखा होता. मी काही दिवस निमिषाला माझी सवय व्हावी, यासाठी भेटत होतेच. त्या संस्थेतून बाळ घरी नेताना पहिल्यांदाच जवळपास माझ्या मोठ्या परिवारातली पन्नास जणं जमली होती. ही माझी सपोर्ट सिस्टम माझी ताकद आहे, असं मला नेहमी वाटतं.

निमिषामुळे आयुष्य समृद्ध!

घरी आल्यावर लक्षात आलं की निमिषा रक्ताच्या नात्यातली नाही, तर मग इतरांचं तिच्याशी कसं बॉंण्डिंग होणार? पण हा प्रश्न कधीच निकालात निघाला होता. ती घरातलं लाडकं नातवंड आहे. आणि आजी-आजोबांशी तिचं वेगळंच नातं आहे.

आणखी एक कसोटीचा क्षण आला, तो देखील आम्ही पार केलाय. मी आई-वडीलांपासून वेगळं राहायचा निर्णय घेतला तो क्षण. निमिषा नर्सरी स्कूलमध्ये शिकत असताना आई-वडीलांच्या घरापासून जवळच मी घर घेतलं. मी आणि निमिषा स्वतंत्र राहतो. तिचं व्यक्तिमत्व स्वतंत्रपणे घडणवण्यासाठी ते गरजेचं होतं. तिचं आणि माझं त्यांच्याशी असलेलं नातं अधिक घट्ट झालंय. शिवाय तिचं आणि तिच्या आजी-आजोबांसोबत असलेलं नातंही बहरलं.

तिची मी जन्मदात्री आई नाही याची मला कधीच उणीव जाणवत नाही.

निमिषाचं माझ्यावर खूप प्रेम आहे. आणि माझं तिच्यावर. तिच्यासाठी मी 'सर्वात प्रेमळ आई' आहे.

निमिषा माझ्या आयुष्यात आल्याने माझं आयुष्य समृद्ध झालंय. तिलाही समृद्ध आयुष्य मिळायला हवं असे माझे प्रयत्न असतात. समाज दत्तक प्रक्रियेतून आलेल्या मुलांकडे कसा पाहतो यावरही त्यांची जडणघडण अवलंबून असते.

निमिषालाच काय, पण अनेक दत्तक प्रक्रियेतून आलेल्या मुलांना त्यांचा भूतकाळ विचारला जातो. काही लोक संवेदनशील नसतात. त्यावर कशी मात करायची हे जसं मी शिकले, तसं माझी मुलगीही शिकली आहे.

आतातर माझ्या बहिणीने एका मुलानंतर दुसरा चान्स घेण्याऐवजी दत्तक हा पर्याय निवडलाय. ही निमिषाच्या सोबतच्या नात्यातून तिला मिळालेली प्रेरणा आहे, असं मला वाटतं. दत्तक प्रक्रिया ही आनंददायी असायला हवी, त्यासाठी आता मी पूर्णांक संस्थेच्या माध्यमातून मार्गदर्शन आणि कौन्सिलिंग करते.

निमिषा शाळेत फारशी रमत नाही म्हणून मग तिच्यासाठी गेल्या वर्षापासून होम स्कूलिंग सुरु केलंय. ती शिकतेय.. आणि तिच्यासोबत पालक म्हणून मीही शिकतेय. मुलांनी लहान वयापासूनच स्व-मूल्यमापन, आणि स्वअध्ययन करावं असं मला वाटतं. त्या दिशेने निमिषाचा प्रवास सुरु आहे. मी फक्त तिला मदत करतेय. ती जेव्हा म्हणेल, तेव्हा मी तिला शाळेत टाकेन.

मला तिचीही सेल्फ आयटेंडीटी बनवायची आहे.

आज मागे वळून पाहताना जाणवतं याच सेल्फ आयडेंटीटीमुळेच मी स्वत:ला एकटं मानत नाही. मी जाणीवपूर्वक एकेरी पालकत्व निवडलं. आतातर निमिषाचं सोबत असणं हे अधिकच आनंद देणारं आहे.

(पुण्यात राहणाऱ्या संगीता बनगीनवार यांच्या मुलाखतीचं शब्दांकन बीबीसीच्या प्रतिनिधी प्राजक्ता धुळप यांनी केलं, तर निर्मिती दिव्या आर्या यांनी केली आहे.)

हे वाचलंत का?

हे पाहिलं आहे का?

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : व्हेनेझुएलात अन्नाच्या तुटवड्यामुळे नागरिकांची उपासमार?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)