क्रिकेट : संजय मांजरेकर परफेक्शनचं 'वेड' असणारा माणूस

संजय मांजरेकर Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा संजय मांजरेकर

इम्परफेक्ट हे संजय मांजरेकर यांचं आत्मचरित्र नुकतंच प्रकाशित झालं. त्यानिमित्त संजय मांजरेकर यांच्याशी केलेली बातचीत.

90च्या दशकात भारतीय क्रिकेट संघाची मिटींग मॅनेजरच्या हॉटेलमधल्या खोलीत होत असे. यात खास गोष्ट अशी होती की, वरिष्ठ खेळाडू खुर्ची आणि सोफ्यावर बसत आणि कनिष्ठ खेळाडू जमिनीवर बसत असत.

भारतीय खेळाडू मैदानात एकमेकांशी हिंदी, पंजाबी किंवा मराठीत बोलत असत. पण, काही कारणांमुळे टीम मिटींग नेहमी इंग्रजीत चालत असे.

संजय मांजरेकर सांगतात की, "कॅप्टन अजहरुद्दीनच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे हसायला येत असे. बऱ्याचदा ते अस्पष्ट बोलत. त्यांना समजून घेण्यासाठी आम्हाला त्यांच्या ओठांच्या हालचालीकडे लक्ष द्यावं लागे. एखाद्या जुन्या शॉर्ट वेव्ह ट्रांझिस्टरप्रमाणे त्यांचा आवाज यायचा. रेडिओच्या साऊंड वेव्हप्रमाणे कधी त्यांचा आवाज चढे किंवा उतरत असे."

Image copyright Getty Images

ते पुढे सांगतात, "मी अजून एक गोष्ट पाहिली होती की, वरिष्ठ खेळाडूंना गरजेपेक्षा जास्त सन्मान दिला जात असे. जेव्हा वरिष्ठ खेळाडू खोलीमध्ये येत, तेव्हा कनिष्ठ खेळाडू एकदम उभे राहत. वरिष्ठ खेळाडूंचा आबही असा होता की कपिल देवसारखा वरिष्ठ खेळाडूही नेटमध्ये बॉलिंग करणं आपल्या योग्यतेचं नसल्याचं मानत असे."

व्यक्तिगत जीवनात अजहर प्रेमळ असला तरी तो आदर्श कॅप्टन कधीच नव्हता, असं संजय मांजरेकरांचं मत आहे.

संजय सांगतात, "जेव्हा विरोधी संघाच्या बॅट्समनचा मैदानात जम बसायचा तेव्हा मध्यंतरात अजहर आम्हा प्रत्येकाला याला आऊट कसं करायचं हे विचारायचा. मग, प्रत्येक जण आपापला सल्ला द्यायचे. त्या आधारावर अजहर निर्णय घ्यायचा की, एका बाजूनं तीन ओव्हर राजू टाकेल, दुसऱ्या टोकावरून मन्नू बॉलिंग करेल. त्यानंतर कपिल पाजी आणि श्रीनाथ बॉलिंगला येतील. त्यानंतर अजहर आपल्या फिल्डिंग पोझिशनवर हा विचार करत निघून जायचा की, आता पुढची 75 मिनिटे मला काही करायचं नाही."

द्रविड आणि गांगुलीमुळे घेतला संन्यास

80 आणि 90च्या दशकांत भारतीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर आणि अनिल कुंबळे या दोन महान खेळाडूंचा उदय झाला. पण, तेव्हा अशी ही एक वेळी होती की, जेव्हा काही प्रतिभावान खेळाडू या उंचीपर्यंत पोहोचू नाही शकले. त्यातलेच संजय मांजरेकर एक होते.

Image copyright Getty Images

1996मध्ये जेव्हा अचानक त्यांनी क्रिकेटमधून संन्यास घेतला तेव्हा क्रिकेट पंडितांनी एका स्वरात सांगितलं की, त्यांचा किमान अजून तीन वर्षांचा खेळ बाकी आहे.

संजय मांजरेकरांचं करिअर जवळून पाहणारे गौतम चिंतामणी सांगतात की, "जेव्हा आपण एखाद्या खेळाडूचा विचार करतो तेव्हा त्याच्या प्रतिभा आणि क्षमतेचा विचारही करतो. मात्र, 'टीम गेम'मध्ये बाकीच्या 'बेंच स्ट्रेंथ'चाही खेळाडूच्या करिअरवर प्रभाव पडतो. 1996नंतर ज्या पद्धतीनं राहुल द्रविड आणि सौरव गांगुलीचं पदार्पण झालं, त्यामुळे संजय मांजरेकरला 'कम बॅक'करणं अवघड गेलं. निवडकर्त्यांना मॅनेज करणंही संजय मांजरेकरला जमलं नाही आणि त्यांना वेळेआधी संन्यास घेणं भाग पडलं."

वडील विजय मांजरेकरांना संजय घाबरायचे

संजय मांजरेकर भारताचे महान बॅट्समन विजय मांजरेकर यांचे सुपुत्र आहेत. एकदा कोणीतरी टायगर पतौडी यांना विचारलं की, तुमच्या नजरेत तांत्रिकदृष्ट्या उत्तम असलेला भारताचा बॅट्समन सुनिल गावस्कर की सचिन तेंडुलकर? हा प्रश्न पूर्ण होण्याआधीच टायगर यांनी उत्तर दिलं, ते म्हणजे विजय मांजरेकर.

पण, तुम्हाला आश्चर्य वाटेल की, याच विजय मांजरेकर यांना त्यांचा मुलगा संजय खूप घाबरत असे. एकदा त्यांनी संजय यांना सांगितलं की, मी तुझी नेट प्रॅक्टीस पाहायला मैदानात येणार आहे. त्यादिवशी घाबरून संजय नेट प्रॅक्टीस करायला गेलेच नाहीत.

संजय मांजरेकर याविषयी सांगतात, "माझे माझ्या वडिलांसोबत कोणत्याही प्रकारचे संबंध नव्हते. मी त्यांना इतका घाबरायचो की, ते बाहेर गेले की मगच मी बिछान्यातून उठायचो. त्यांचे 'मूड स्विंग्स' व्हायचे आणि त्याला मी, माझी आई आणि माझ्या दोन बहिणी बळी पडायचो."

संजय पुढे सांगतात की, "ते फटकळ होते. एकदा त्यांना क्रिकेट कोचिंगमध्ये आपला हात आजमवायचा प्रयत्न केला तेव्हा भारताचे ओपनगर चेतन चौहाननं त्यांना विचारलं की, तुमच्या मते माझ्या बॅटींगमध्ये काय त्रुटी आहे? मांजरेकर यांनी उत्तर दिलं की, तुमच्या बॅटींगमध्ये कोणतीच त्रुटी नाही. ज्या निवडकर्त्यांनी तुम्हाला संघात घेतलं त्यांच्यात त्रुटी आहेत."

छत्री घेऊन महान खेळाडूंचे स्वागत

पण विजय मांजरेकरांना प्रसिद्ध खेळाडूंना आपल्या घरी बोलवायला फार आवडायचं. सुनील गावस्कर, भागवत चंद्रशेखर. गुंडाप्पा विश्वनाथ, इरापल्ली प्रसन्ना, इतकंच काय तर रोहन कन्हाईलासुद्धा दादरच्या घरी जेवायला बोलवत असत.

प्रतिमा मथळा विजय मांजरेकर

संजय मांजरेकर सांगतात, "त्यावेळी मी 11 वर्षांचा देखील नव्हतो. माझे वडील मला छत्री घेऊन या खेळाडूंचं स्वागत करण्यासाठी रस्त्यावर पाठवायचे जेणेकरून रस्त्यावर चालणारे लोक या प्रसिद्ध व्यक्तींना ओळखू नयेत आणि गर्दी जमू नये. पण व्हायचं उलटंच. माझी उंची इतकी लहान होती की ते छत्रीत मावायचे नाहीत आणि त्यांना लपवण्याच्या कसरतीमुळे लोकांचं लक्ष माझ्याकडे जायचं."

व्हिवियन रिचर्ड्स यांचा कनवाळूपणा

आपल्या पहिल्याच कसोटीत बाउन्सरमुळे जखमी झालेल्या मांजरेकर यांनी वेस्ट इंडिजच्या विरुद्ध त्यांच्या भूमीतच शतक ठोठावलं होतं.

संजय मांजरेकर त्यांची याबाबतची आठवण सांगतात, "त्या कसोटी सामन्यात आम्ही हरलो होतो. आम्ही आमच्या हॉटेलकडे आमच्या बसने जात होतो. पार्किंगमध्ये खुद्द व्हिवियन रिचर्ड्सन उभे होते. त्यांनी मला बोलावलं आणि म्हणाले, "वेल प्लेड मॅन कीप इट अप."

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा सर विवियन रिचर्ड्स

संजय सांगतात, "ते हेच रिचर्ड्स होते जे प्रतिस्पर्धी म्हणून दुसऱ्या टीमपासून एक विशिष्ट अंतर ठेवून वागत असत, कधी कधी ते रुक्षपणानं वागत असत."

पण 1992 साली ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात मांजरेकर अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकले नाहीत आणि 1996 साल उजाडेपर्यंत भारतीय संघातलं आपलं स्थान गमावून बसले.

गौतम चिंतामणी सांगतात, "संजय मांजरेकर तंत्रावर इतकं लक्ष देत असत की क्रिकेटच्या प्रती असलेलं त्यांचं नॅचरल इंस्टिंक्ट गमावून बसले. माझ्या मते ते द्रविडच्या आधीचे द्रविड आहेत. तंत्रावर त्यांचा इतका भर होता की इतर सगळ्या गोष्टी गौण झाल्या. संजय मांजरेकर यांनी चार शतकं केली ज्यापैकी एक द्विशतक होतं. ही सगळी शतकं त्यांनी भारताबाहेर केली होती. हीच एक विशेष गोष्ट आहे."

संजय मांजरेकर सांगतात, "मी काही चूक न करता खेळलो तर माझा किती स्कोर आहे हे माझ्यासाठी तितकंसं महत्त्वाचं नसतं. तंत्रावर माझा इतका भर असायचा की क्रीझवर असण्याचा माझा काय उद्देश आहे हेच मी विसरून जायचो. जर मी द्विशतक केलं तर त्यावर खूश होण्याऐवजी मी जे शॉट्स खेळलो नाही त्याबद्दल मी जास्त विचार करायचो."

म्रान खानचे शिष्य

संजय मांजरेकरांसाठी सगळ्यांत मोठे हिरो इमरान खान आहेत. त्यांची वागण्या-बोलण्याची ढब मांजरेकरांना आवडत असे. एवढंच नव्हे तर इम्रान खान यांनी दिलेल्या शिव्याही त्यांना आवडत असत.

एकदा एलन लँबनं पाकिस्तानचा बॉलर वकार युनूसचा बॉल मिड-ऑनच्या पलीकडे टोलवला. नेमके तिथे इम्रान खान फिल्डींग करत होते. इम्रान यांना बॉलच्यामागे धावणं आवडत नसे. त्यांनी कसाबसा बाउंड्रीकडे जाणारा बॉल अडवला आणि वकारजवळ येऊन त्याला म्हणाले, "विकी हा काय बॉल टाकलास तू?," त्यावर वकार म्हणाला की, "मी बॉल इन स्विंग करण्याचा प्रयत्न करत होतो." इम्रान त्याला ओरडून म्हणाले की, "पुढच्या वेळी असं काही करण्याआधी मला नक्की विचार."

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा इमरान खान

संजय मांजरेकर सांगतात की, "मी त्यांना 10 पैकी 10 मार्क देईन. एक तर ते दिसायला खूप चांगले आहेत. ऑक्सफर्डमध्ये शिकून आले असले तरी आपल्या सहकाऱ्यांना ते अस्सल पाकिस्तानी आणि इंग्रजीतल्या शिव्या देत असत. जेव्हा आमची टीम पाकिस्तानात गेली तेव्हा त्यांनी इंग्लंडहून तटस्थ अंपायर बोलवण्याचा आग्रह धरला. म्हणजे पाकिस्तानच्या विजयावर शंका उपस्थित व्हायला नको. जेव्हा त्यांची टीम 'स्ट्रगल' करत होती, तेव्हा ते स्वतः समोर येऊन आपल्या संघातल्या कमकुवत खेळाडूंची पाठराखण करत असत."

...जेव्हा ईडन गार्डनमध्ये सगळ्यांसमोर विनोद कांबळी रडले

संजय मांजरेकरांनी आपल्या पुस्तकात 1996मध्ये ईडन गार्डनवर झालेल्या वर्ल्डकपच्या सेमी फायनलच्या सामन्याचं मार्मिक वर्णन केलं आहे. श्रीलंकेसोबत झालेल्या या सामन्यात भारताचा पराभव झाला होता.

संजय सांगतात की, "टीममध्ये नवज्योत सिंग सिद्धू हा एकमेव होता, ज्यानं भारतानं प्रथम बॅटींग केली पाहिजे असा सल्ला दिला होता. पण, अजहरुद्दीननं त्याचं बोलणं मात्र ऐकलं नाही. आमच्यात जरा जास्तच आत्मविश्वास होता. कारण, आम्ही तेव्हा पाकिस्तानला हरवलं होतं. जोपर्यंत मी आणि तेंडुलकर क्रीजवर होतो, तोपर्यंत खेळपट्टी चांगली होती. मात्र, नंतर खेळपट्टी खराब झाल्यानं मैदानात उभं राहणंही अवघड झालं."

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा विनोद कांबळी

ते पुढे सांगतात की, "हा सामना गमावल्यानंतर 'डेसी' (विनोद कांबळीचं टोपण नाव आहे), मैदानातच रडू लागला. त्यानंतर सगळे खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये गेल्यावर सार्वजनिकरीत्या आपल्या भावना प्रकट केल्याबद्दल विनोदला अजय जडेजानं चांगलंच झापलं होतं."

क्रिकेटसाठीचा उत्तम मेंदू प्रभाकरकडे होता

संजय मांजरेकर आपले टीम इंडियाचे सहकारी मनोज प्रभाकर यांच्या क्रिकेट बद्दलच्या विचारांना मानत असत. मनोज जेव्हा आपल्या खेळाची सुरुवात करत तेव्हा ते जाणून बुजून डेवेन माल्कम आणि ब्रायन मॅकमिलन यांना बाऊन्सर टाकण्याचं आव्हान देत असत. याचा अर्थ असा होता की, ते बोल्ड किंवा एलबीडब्ल्यू होऊ शकत नव्हते.

संजय मांजरेकर याबद्दल सांगतात की, "पुढे जाऊन मनोज प्रभाकर यांनीही चुका केल्या, पण त्यांच्यात चांगले गुणही होते. त्यांच्यासारखा 'फायटर' मी पाहिला नाही. ते अशा काही लोकांपैकी होते जे आपल्या टीमच्या बॅटींगची आणि बॉलिंगची सुरुवात करायचे. रिव्हर्स स्विंगचं तंत्र सगळ्यांत प्रथम मनोज प्रभाकर यांनीच अवगत केलं होतं आणि त्यांनीच ते कपिल देव यांना शिकवलं होतं. पण, मनोज यांनी एका गोष्टीसाठी कपिल यांना कधीच माफ केलं नाही. 1986च्या इंग्लंड दौऱ्यावेळी जेव्हा चेतन शर्मा जखमी झाले, तेव्हा मनोज प्रभाकर संघात असूनही कपिल यांनी भारतातून मदन लाल यांना टीममध्ये सहभागी होण्यासाठी बोलावलं होतं."

प्रतिमा मथळा अजय जडेजा, मनोज प्रभाकर आणि संजय मांजरेकर

ज्या काळात संजय मांजरेकर क्रिकेट खेळायचे तेव्हा भारतीय संघात वरिष्ठ खेळाडूंची संख्या जास्त असायची. एक वेळ अशी होती की, 6 माजी कर्णघार भारतीय संघात होते. त्यामुळे बऱ्याचदा असं व्हायचं की, भारतीय संघ प्रथम बॉलिंगचा निर्णय घेत असे. कारण वरिष्ठ खेळाडू पहिल्यांदा नव्या बॉलवर खेळण्यास तयार नसत.

मांजरेकर सांगतात की, "वेस्ट इंडीजच्या दौऱ्यात पहिले स्वतःहूनच आपल्याला जखमी घोषित करणाऱ्या बॅट्समनचे किस्से गावस्कर, रवी शास्त्री आणि संदीप पाटील मला नेहमी ऐकवायचे. दिलीप सरदेसाई यांना फट्टू म्हणजेच घाबरट असं संबोधत असत."

मांजरेकर पुढे सांगतात की, "जेव्हा मुंबईच्या संघासाठी पहिल्यांदाच निवडलो गेलो होतो तेव्हा संदीप पाटील यांनी मला विचारलं होतं की तुला कोणत्या क्रमांकावर खेळायला आवडेल. मी नम्रतापूर्वक त्यांना म्हणालो की तुम्हाला आवडेल त्या क्रमांकावर मी खेळेन. त्यांनी तत्काळ मला अडवलं आणि सांगितलं की, तू जर भारतीय संघात असंच उत्तर दिलंस तर तू चित्रात कुठेच दिसणार नाहीस. नंतर मला जाणवलं की संदीप पाटील यांचा सल्ला योग्यच होता."

मांजरेकरांनी पुढे सांगितलं की, "वरिष्ठ खेळाडूंना जलद गोलंदाजीपासून वाचवण्यासाठी बऱ्याच खेळाडूंच्या क्रमवारीत बदल केले गेले. यामुळे अनेक खेळाडूंचं क्रिकेटचं आयुष्य संपुष्टात आलं. कधी-कधी संघाची गरज म्हणून खेळाडूंच्या भूमिकेत बदल केले जायचे. उदाहरणार्थ, द्रविडकडून अनेक वर्षं विकेटकीपिंग करून घेण्यात आलं. रवी शास्त्रीच्या भूमिकेत वारंवार बदल केले गेले. पण त्यांच्याकडे कौशल्याबरोबरच क्रिकेटसाठी लागणारा उत्तम मेंदूही होता. त्यामुळे ते टिकले. पण, यामुळे बहुतांश भारतीय खेळाडूंचं करिअर संपुष्टात आलं. "

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)