साहित्य संमेलन विशेष : 'प्रमाणभाषेची दादागिरी मोडून काढणारं तरुणांच्या मनातलं संमेलन हवं'

साहित्य संमेलन Image copyright Dekdoyjaidee/Getty Images

91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने तरुण साहित्यिकांच्या आणि साहित्यप्रेमींच्या मनातलं संमेलन कसं असायला हवं याचा वसुंधरा काशीकर यांनी घेतलेला आढावा.

ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे एकदा साहित्य संमेलनाबद्दल फार मार्मिक बोलले होते. ते म्हणाले होते, "संमेलन म्हणजे गावात दर आठवड्यात भरणारा आठवडी बाजार! तसा विचार केला तर त्या आठवडी बाजाराचा सामानाची आणि वस्तूंची खरेदी-विक्री करण्यापलीकडे काय उपयोग असतो? पण आठवडी बाजारात लोक येतात. भाजी, धान्य, वस्तूंची खरेदी-विक्री करतात. तंबाखू हातावर चोळता चोळता, बिडी पितापिता गप्पा मारतात, बायका भाजी, आरसे फण्या घेताघेता सुखदु:ख सांगतात. मनोरंजन, सुखदुःखाची देवाणघेवाण अशा अंगाने आठवडी बाजाराकडे बघावं. साहित्य संमेलनाचही तसंच आहे."

मराठी भाषेबद्दल आस्था आणि प्रेम असणारी एक व्यक्ती म्हणून माझ्या मनातल्या साहित्य संमेलनाबद्दल मला काही लिहावंसं वाटतं. डिसेंबर 2017मध्ये मी दिल्ली येथे होणाऱ्या 'जश्न ए रेख्ता' या महोत्सवाला गेले होते. उर्दू भाषा आणि साहित्य प्रसाराचं काम हा महोत्सव करतो.

या महोत्सवात येणाऱ्या तरुण मुलांचं आणि हिंदू धर्मीयांचं प्रमाण पाहता, हा महोत्सव भारत जोडोचं काम करतो आहे, असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.

Image copyright SAHITYA SAMELAN

हा महोत्सव पाहून काही कल्पना सुचल्या. माझ्या कल्पनेतल्या साहित्य संमेलनात प्रत्येक विषयामध्ये सौंदर्याचा(aesthetics) विचार केलेला असेल. उदाहरणार्थ, ज्या परिसरात वा मैदानावर संमेलन भरतं तिथली स्वच्छता, तिथलं सौंदर्य.

आपलं संमेलन लग्न मंडपासारखं

'रेख्ता'ला मी गेले होते. त्यासाठी मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम फार सुंदर सजवलं होतं. मैदानातल्या झाडांवर सुरेख घंटा टांगल्या होत्या. जांभळा, केशरी आणि गुलाबी रंगांचे कापड लावलेले बाक बसण्यासाठी होते. पुस्तकांचे, जेवणाचे, स्टॉल्स हे गव्हाळी रंगाच्या आणि पोताच्या कापडाने सजवले होते. जेवणासाठी बसायला गडद रंगाचे शिसमचे बाक ठेवले होते. ते सौंदर्यात भर घालत होते. ठिकठिकाणी शायरांची शायरी कॅलिग्राफी स्वरूपात लावली होती. त्यांचे फोटोही होते.

आपलं संमेलन जत्रा किंवा लग्न मंडपासारखं असतं. परिसराचं सौंदर्य हा विचार मराठी साहित्य संमेलनात व्हावा, असं मला वाटतं.

साहित्य संमेलनाचा विस्तार

मला साहित्य संमेलनाचा विस्तार अपेक्षित आहे. त्यासाठी केवळ साहित्यिकच नाही तर विविध कलांमधील लोकांना साहित्य संमेलनात बोलवायला हवे.

त्याने विषयांमध्ये विविधता आणि नावीन्य येईल. उदाहरणार्थ - नैराश्य या मानसिक आजारावर मराठी साहित्यात ज्या काही कथा, कादंबऱ्या, कविता असतील, त्या त्या लेखक, कवींना बोलवायचे. (उदा. अच्युत गोडबोले, मनकल्लोळ) त्यांच्याशी गप्पांचा, मुलाखतीचा अनौपचारिक कार्यक्रम करायचा.

Image copyright ReKHTA/FACEBOOK
प्रतिमा मथळा डिसेंबर 2017 मधील दिल्लीतील 'जश्न ए रेख्ता' महोत्सव.

एखाद्या आनंद नाडकर्णींसारख्या मानसोपचार तज्ज्ञाला बोलवायच, त्यांचं चर्चासत्र ठेवायचं आणि 'कासव' या नैराश्यावर भाष्य करणाऱ्या चित्रपटाचे दिग्दर्शक सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर तसेच संगीतकार यांना बोलावून त्यांचा चित्रपट, पटकथा, संगीत असा प्रवास आणि विचार समजून घ्यायचा.

बोलीभाषा हे आपलं फार मोठं वैभव आहे. बोलीभाषेचं सौंदर्य आणि ताकद दाखवायला बहिणाबाई चौधरी हे एकच नाव पुरेसं आहे. महाराष्ट्रात 47 आदिवासी जमाती आहेत. त्यांच्या स्वतंत्र बोलीभाषा आहेत. अहिराणी, कोकणी, झाडीबोली इत्यादी बोलीभाषांमधले लेखक, कवी यांना साहित्य संमेलनात बोलवायला हवं. त्या त्या भाषांचं सौंदर्य समजून घेण्यासाठी कार्यक्रम व्हावेत.

रमेश इंगळे उत्रादकर यांच्या वैदर्भीय भाषेतील 'निशाणी डावा अंगठा' या पुस्तकानं काय इतिहास घडवला तो सांगणे नलगे. साहित्य संमेलनाचा विस्तार वाढवायचा असेल तर ते लोकांपर्यत पोहोचलं पाहिजे, लोक जोडले जायला हवे असतील तर लोकांना त्यात आपली ओळख सापडायला हवी. प्रमाणभाषेची मक्तेदारी आणि दादागिरी मोडल्याशिवाय ते होणार नाही.

महाराष्ट्रात सध्या श्री. गंगाधर मुटे शेतकरी साहित्य संमेलन भरवतात. गझल संमेलन भरतं, यांना मुख्य साहित्य संमेलनात सामावून घ्यायला हवं.

ज्या शहरात संमेलन होत आहे त्या परिसरातील, आजूबाजूच्या गावांमधील शाळांना त्यात सहभागी करून घ्यायला हवे. असा प्रयोग नगरच्या संमेलनात करण्यात आला होता. अहमदनगर जिल्ह्यात 1996 साली म्हणजे बरोबर 22 वर्षांपूर्वी जे साहित्य संमेलन झालं त्यात शाळा आणि लोक मिळून 1 कोटी रुपयांची पुस्तक विक्री झाली होती.

'ज्येष्ठांनी खुर्च्या रिकाम्या कराव्यात'

वाचन संस्कृती वाढवण्यासाठी नामवंत लेखक, कवी वा अध्यक्षांमार्फत उत्तम वाचन करणारी मराठी शाळांमधली मुलं निवडून त्यांना प्रमाणपत्रं द्यावीत वा सत्कार करावेत.

संमेलनाचा खर्च कमी करण्यासाठी ज्या शहरात संमेलन होतंय त्या शहरातली 100 घरं निवडून तिथे बाहेर गावाहून येणारे कवी, लेखक, वक्ते यांची राहण्याची व्यवस्था केली तर शहरातले, गावातले सर्वसामान्य लोक साहित्याशी, संमेलनाशी जोडले जातील. लोकांना तो सन्मानही वाटेल शिवाय हॉटेलचा खर्च वाचेल.

नवीन लेखकांना संधी इथे मिळायला हवी. महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार देताना एका प्रकारात (उदा.चरित्र) तीन वेळा जर एखाद्या लेखकाला पुरस्कार मिळाला असेल तर तो लेखक त्या प्रकारासाठी परत पुस्तक पाठवू शकत नाही. तसंच साहित्य संमेलनात व्हायला पाहिजे. 30-30 वर्षांपासून तेच तेच चेहरे कविता वाचायला, परिसंवादासाठी वक्ते म्हणून असतात. ज्येष्ठ मान्यवरांनी आपल्या खुर्च्या आता नवीन लोकांसाठी रिकाम्या करायला हव्यात आणि श्रवणाचा आनंद घ्यावा.

'तंत्रज्ञानाचा कल्पकतेनं वापर'

मराठी भाषेचं आणि साहित्याचं एक अद्ययावत संकेतस्थळ असावं. याबाबत रेख्ताचं संकेतस्थळ आदर्श आहे (www.rekhta.org). त्यावर मराठी भाषेचा शब्दकोश असावा. कवींची माहिती, कविता असाव्यात. ऑनलाईन मराठी शिकण्याची सोय असावी. कवी, लेखक, मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष यांचे जुन्या भाषणांचे व्हीडिओ असावेत.

फेसबुक आणि इन्स्टाग्राम या समाज माध्यमांचा कल्पकतेने वापर करण्यात यावा. यावर सतत अपडेट्स, व्हीडिओ, कविता, लेख, अवतरणं यावेत जेणेकरून मराठी भाषेचा जगभरात प्रसार होण्यास आणि ती टिकण्यात मदत होईल. हे व्हीडिओ तयार करताना एडिटिंग, त्याचं पार्श्वसंगीत या बाजूंचाही सौंदर्याच्या अंगानं विचार करावा.

Image copyright KAREN BLEIER/GETTY IMAGES

कीर्तन करणारे कीर्तनकार, तमाशा कलावंत यांना साहित्य संमेलनात बोलवावं. त्यांचे कार्यक्रम ठेवावेत. या लोककलांना संमेलनाने प्रतिष्ठा द्यावी आणि यांचे जतन करावे.

राजकीय नेत्यांना विनाकारण संमेलनाचा भाग बनवू नये. अनेक वर्षांपासून स्वागताध्यक्ष आणि उद्घाटक म्हणून राजकीय नेते मराठी साहित्य संमेलनात दिसतात. त्याऐवजी लेखक, गायक, संगीतकार, कवी, परकीय भाषांमधले लेखक असे लोक असावेत.

रेख्ताचं परत उदाहरण दयावंसं वाटतं. रेख्ताचं उद्घाटन ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान आणि ज्येष्ठ शास्त्रीय संगीताचे गायक पंडित जसराज यांच्या हस्ते झालं होतं. एकाही राजकीय नेत्याचा सत्कार वा उल्लेख केला गेला नाही. कल्पकता दाखवली, हेतू चांगला ठेवला तर अनेक खासगी प्रायोजक मिळू शकतील ही खात्री आहे.

Image copyright Getty Images

सगळ्यात शेवटी ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे यांचं वाक्य आठवतंय. ते म्हणाले होते, "महाराष्ट्रात मराठी टिकवायची असेल तर गरिबी टिकली पाहिजे." या विधानामागचं वास्तव हे आहे की, गरिबांचीच मुलं मराठी माध्यमांच्या शाळेत जातात. इंग्रजी माध्यमाच्या विदयार्थ्यांना यात जोडून घ्यावं लागेल.

यासाठी इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांचा मेळावा घेणं, त्यांच्यातल्या उत्तम मराठी वाचणाऱ्या मुलांचा सत्कार करणं, परदेशात स्थायिक मराठी भाषिकांना बोलावणं हे उपक्रम माझ्या मनातल्या संमेलनात असतील. हा महंमदानं पर्वताकडे जाण्याचा भाग आहे.

'इसी दुनिया में हम भी तो है शामील

कहें किस मुह से की दुनिया बेवफा है..'

असा दृष्टिकोन ठेवला तर मनातलं साहित्य संमेलन प्रत्यक्षात यायला वेळ लागणार नाही याची खात्री वाटते.


कसं आहे तरुण साहित्यिकांच्या मनातील संमेलन?


राजकारणी, सेलेब्रिटी व्यासपीठावर नकोत : प्रणव सखदेव

मनातल्या साहित्य संमेलनाबद्दल कथालेखक आणि अनुवादक प्रणव सखदेव सांगतात, "साहित्य संमेलनाला अध्यक्ष नसावा त्याऐवजी भारतीय साहित्यातला किंवा परदेशातला एखादा लेखक, कवी, समीक्षक पाहुणा असावा."

"कवीसंमेलन, कवीकट्टा इत्यादी गोष्टींऐवजी इतर भाषिक (भारतीय वा परदेशी) दहा कवींना निमंत्रित करून त्यांच्या कविता वाचल्या जातील. तसंच त्या मराठीत अनुवादित करून त्यांचा अंक प्रकाशित करावा. त्यात हे कवी कविता या साहित्य प्रकाराकडे कसे पाहतात, याबद्दलची निरीक्षणं असतील. तसंच मराठीतल्या निवडक कवींच्या कविता व टिपणं असतील," असं ते म्हणतात.

Image copyright Pranav Sakhadéo/FACEBOOK
प्रतिमा मथळा प्रणव सखदेव

"संमेलनात अनपौचारिक पण गंभीर गप्पांचे कार्यक्रम असतील. त्यात ज्येष्ठ आणि तरुण लेखक सहभागी होतील. त्यात वर्षभरात आपण काय केलं किंवा वाचलेलं भन्नाट पुस्तक किंवा एखादी कथा-कादंबरी वा कविता कशी सुचली, प्रत्यक्ष लेखन करताना येणार्‍या अडचणी, लेखनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन/ भूमिका अशा विषयांवर ते बोलतील," असं ते म्हणाले.

"ब्लॉग, फेसबुक यांसारख्या नव्या डिजिटल माध्यमांवर लिहिणार्‍या मंडळींनाही सहभागी करून घेतलं जाईल. तसंच प्रकाशक-संपादक-अनुवादक व विक्रेता यांच्या अडचणी, त्यांचे अनुभव, त्यांनी केलेली वेगळी कामं यांबद्दल बोलण्यासाठी त्यांना पाचारण करण्यात येईल. प्रकाशक-विक्रेते यांसाठी विपणनाच्या नव्या पद्धती व आधुनिक तंत्रज्ञान इ. बाबतच्या कार्यशाळा वा प्रशिक्षण कार्यक्रम असेल," सखदेव पुढे सांगतात.

"संमेलनात राजकारणी, सेलिब्रिटी यांना व्यासपीठावर स्थान नसेल. ते चर्चा ऐकायला किंवा त्यांना आवडणार्‍या विषयाची मांडणी करायला जरूर सहभागी होऊ शकतील. त्याऐवजी ग्रंथ प्रदर्शनात एक व्यासपीठ उभारून तिथे त्यांना त्यांनी वाचलेल्या पुस्तकांबद्दल बोलायला लावण्यात येईल. किंवा अभिवाचन करायला सांगण्यात येईल. पण सध्या तरी असं संमेलन एक फँटसीच आहे!" असं मत ते व्यक्त करतात.

तालुका पातळीवर छोटी संमेलनं व्हायला हवीत : शिल्पा कांबळे

लेखिका शिल्पा कांबळे सांगतात, "प्रोग्रेसिव्ह विचार देण्याची ताकद साहित्यामध्ये आणि साहित्यसंमेलनात हवी. संत नामदेव त्या काळात पंजाबमध्ये गेले. संत फार लांबून चालत येत आणि एकमेकांना भेटत. हे साहित्य संमेलनच होतं असं मला वाटतं. वर्षातून एकदा एकच मोठं साहित्य संमेलन होण्यापेक्षा शाळा, कॉलेजमध्ये हे संमेलन व्हायला हवे."

Image copyright SHILPA KAMBLE/FACEBOOK
प्रतिमा मथळा शिल्पा कांबळे

"तालुका पातळीवर छोटी संमेलनं व्हायला हवीत आणि ती सातत्यानं व्हायला हवीत. माझ्या मनातल्या संमेलनात अध्यक्षाच्या निवड प्रक्रियेत प्रतिनिधित्वाचा विस्तार असेल. सध्याच्या संमेलनापेक्षा कॉलेजची मुलं त्याचं गॅदरिंग अधिक चांगलं करतात असं मला प्रामाणिकपणे वाटतं. माझ्या कल्पनेतल्या संमेलनात अनौपचारिक संवादाचा भाग खूप महत्त्वाचा असेल. वाचकांना दृष्टी आणि साहित्यकांना व्हिजन या संमेलनात मिळेल," असं त्या म्हणाल्या.

लेखकाला लिहिण्यासाठी दृष्टी, विषय किंवा ऊर्जा मिळावी : हृषीकेश गुप्ते

कादंबरीकार ह्रषीकेश गुप्ते म्हणतात, "मला लिहायला उपयोग होईल असं काही साहित्य संमेलनातून मिळत नाही. माझ्या मनातल्या साहित्यसंमेलनात ज्यांचं साहित्य आवडतं त्या लोकांसोबत अखंड अशा गप्पा करणं, कल्पनांवर चर्चा करणं हा भाग प्रामुख्याने असेल. या एकत्र येण्यातून, निव्वळ गप्पांमधून सृजनाचा आनंद मिळेल. लेखक आपल्या बोलण्यातून, चर्चांमधून प्रसवण्याचा आनंद घेऊ शकतील आणि वाचक वा श्रोत्यांना निर्मिती अनुभवण्याचा आनंद मिळेल. माझ्या मनातल्या साहित्य संमेलनात लेखकाला लिहिण्यासाठी दृष्टी, विषय किंवा ऊर्जा मिळेल."

अनुदानाचं जिल्हावार वाटप व्हावं : कृष्णा खोत

"बडोदयाच्या संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पन्नास लाखांच्या अनुदानाची घोषणा केली आहे. प्रत्येक जिल्ह्याला एक लाख रुपये देऊन प्रत्येक जिल्ह्यात साहित्य संमेलन भरवावं," असं मत कादंबरीकार कृष्णात खोत व्यक्त करतात.

"माझ्या मनातल्या साहित्य संमेलनात शेतकरी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते यांना बोलावून साहित्य संमेलनाचा विस्तार करण्याची कल्पना आहे. मध्यंतरी चंदगडला झालेल्या संमेलनात पंधरा हजार विद्यार्थी आले होते. औरंगाबादला झालेल्या शिक्षक संमेलनात दीड हजार शिक्षक राज्यभरातून आले होते. म्हणजे लोकांमध्ये भूक आहे ती भूक भागवण्याचं काम या साहित्य संमेलनातून होईल," असं ते म्हणाले.

अध्यक्ष नकोच : मनस्विनी लता रवींद्र

साहित्य अकादमी विजेत्या लेखिका मनस्विनी लता रवींद्र आगामी साहित्य संमेलनांकडून असलेल्या अपेक्षा व्यक्त करताना म्हणतात, "माझ्या मनातल्या साहित्य संमेलनात अध्यक्षाला स्थान नाही म्हणजे त्या अनुषंगानं येणारं राजकारण संपेल."

हे वाचलंत का ?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)