सोशल : 'विदर्भाच्या विकासात नव्हे तर महाराष्ट्राचे तुकडे करण्यात रस'

सुधीर मुनगंटीवार Image copyright FACEBOOK/SUDHIR MUNGANTIWAR

भारतीय जनता पक्षाला विधानसभेत स्पष्ट बहुमत मिळाल्यावर स्वतंत्र विदर्भाचा विचार करू, असं विधान राज्याचे अर्थमंत्री आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं. त्यामुळे स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

मुनगंटीवार यांच्या या वक्तव्यावर बीबीसी मराठीच्या वाचकांना आम्ही त्यांची मतं विचारली होती. होऊ द्या चर्चा या फेसबुक चर्चेला बराच प्रतिसाद मिळाला. स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियावर रंगलेल्या चर्चेचा हा आढावा आणि काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया.

वेगळा विदर्भ हा वैदर्भीयांचा अधिकार आहे, असं गुरू बाल्की म्हणतात. त्यांनी यासंदर्भात सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

"वेगळा विदर्भ होणं हे काळाची गरज आहे. आधी विदर्भाचा विकास आणि नंतर वेगळा विदर्भ. हे धोरण लक्षात घेऊन सध्या सरकारचं काम चालू आहे. वेगळा विदर्भ नक्की होईल. त्यासाठी विदर्भाबाहेरील लोकांनी कितीही आरडा ओरडा केला तरी फरक पडणार नाही. हेच लोक विदर्भात बदली झाली तर मंत्रालयातील उंबरठे झिजवून बदली रद्द करून घेतात आणि हेच लोक विदर्भाला विरोध करतात", असं ते लिहितात.

Image copyright Facebook

संदेश बच्छाव यांच्या म्हणण्यानुसार, "महाराष्ट्र अबाधित आहे. वेगळ्या विदर्भाचा विचार करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला हवा. वेगळा विदर्भ म्हणजे महाराष्ट्राला मुंबई पासून वेगळे करण्यासारखी एक खेळी आहे. ज्याला एक मराठी माणूस कदापि शक्य होऊ देणार नाही."

Image copyright Facebook

कौस्तुभ इटकुरकर म्हणतात, "तुम्हाला विदर्भाच्या विकासात रस नाही, महाराष्ट्राचे तुकडे करण्यात आहे."

Image copyright Facebook

सचिन सराटे यांच्या मते, "विदर्भावर अन्याय झाला यात नक्कीच दुमत नाही. पण महाराष्ट्राचे तुकडे करून विकास होणार नाही."

Image copyright Facebook

गोविंद गडीयार तर ठामपणे म्हणतात, "2019ला स्वतंत्र विदर्भ होणारच."

Image copyright Facebook

धनाजी देशमुख यांच्या मते, "विदर्भाच्या लोकांनी कार्यकुशल नेत्यांना विधान भवनात पाठवावं आणि गाजर दाखवणाऱ्याला घरीच बसवावं."

Image copyright Facebook

अजय वडके म्हणतात, "येनकेन प्रकारेण भाजपाला फक्त सत्ता हवी आहे. मग त्यासाठी 2015 आधी स्वतंत्र विदर्भवाल्यांना ते गाजर दाखवले. नंतर सत्तेत आल्यापासून त्या मुद्द्याला स्पर्श केला नाही. श्रीहरी अणे कुठे गायब झाले. कुणास ठाऊक. आता 2019 साठी गरज पडली की परत गाजर बाहेर."

Image copyright Facebook

मुकेश राणे विचारतात, "वेगळा विदर्भ मागणारे महाराष्ट्राच्या पदावर कसे बसतात? लाज नाही वाटत ज्या ताटात जेवता त्यालाच छेद करताना."

Image copyright Facebook

श्यामसिंह पाटील यांचं मत थोडं वेगळं आहे. ते म्हणतात, "वेगळा विदर्भाच्या आधी गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आणि विदर्भातील सर्व आदिवासीबहुल प्रदेश एकत्र करून वेगळं आदिवासी राज्य करावं लागेल.

रामचंद्र लिहितात, "भाजपाने छोटया राज्यांचा आग्रह धरला होता. संयुक्त महाराष्ट्राचा लढा देताना 105 हुतात्म्यांनी प्राणाचे बलिदान दिले आहे आणि महाराष्ट्र राज्य खेचून आणलं आहे. तो माझा महाराष्ट्र अखंडच राहणार आहे. त्याचा नकाशा बघा किती सुंदर दिसत आहे."

Image copyright Facebook

संभाजी पाटील म्हणतात, "वेगळ्या विदर्भाची मागणी ही राजकीय आहे. सर्वसामन्यांना फक्त विकास पाहिजे. नाहीतरी चार वर्षं होत आली कोणते दिवे लावले? जर विदर्भ वेगळा हवा असेल तर नागपूर ते मुंबई एक्सप्रेस हायवे कशासाठी हवा. म्हणजेच मुंबईचं महत्त्व आहे आणि राहणार. मग उपयोग काय वेगळ्या विदर्भाचा?"

Image copyright Facebook

हर्षल कुलकर्णी म्हणतात, "पुढच्या वेळीसुद्धा यांना सेनेचा टेकू घेवूनचं सत्तेत यावं लागणार आहे. त्यामुळं मुनगंटीवार यांनी हा विषय पद्धतशीरपणे दहा वर्षं पुढे ढकलला आहे."

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)