गुजरात : जिग्नेश मेवाणींना पोलिसांनी का घेतलं ताब्यात?

जिग्नेश मेवाणी Image copyright AFP

दलित कार्यकर्ता भानूप्रसाद वनकर यांच्या मृत्यू प्रकरणी रविवारी दलित संघटनांतर्फे बंद पुकारण्यात आला. या प्रकरणी कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याचं कारण देत गुजरात पोलिसांनी आमदार जिग्नेश मेवाणी यांना ताब्यात घेतलं आहे.

शनिवारी दलित कार्यकर्ते भानूप्रसाद वनकर यांच्या कुटुंबानं त्यांचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला होता. या मुद्द्यावर सरकारकडे काही मागण्या ठेवण्यात आल्या होत्या. परंतु सरकार आणि कुटुंबामध्ये झालेली चर्चा अयशस्वी ठरल्यानं यासंदर्भात रविवारी आमदार जिग्नेश मेवाणी यांनी 'बंद'चं आवाहन केलं होतं.

या प्रकरणी गुजरात पोलिसांनी आमदार जिग्नेश मेवाणी यांना ताब्यात घेतलं आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मेवाणी यांना ताब्यात घेतल्याचं अहमदाबाद गुन्हे शाखेनं म्हटलं आहे.

भानूप्रसाद वनकर यांनी गुरुवारी पाटण जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन केलं. त्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 36 तासांच्या उपचारानंतरही ते वाचू शकले नाही. शुक्रवारी रात्री त्यांनी शेवटचा श्वास घेतला. याच अनुषंगाने दलित संघटनानी रविवारी वडनगर आणि गांधीनगरमध्येही बंद पुकारला होता.

प्रतिमा मथळा जिग्नेश मेवाणी यांनी कुटुंबाची भेट घेतली.

भानूप्रसाद हे निवृत्त सरकारी कर्मचारी होते. त्यांची पत्नी शिक्षिका आहे. त्यांना दोन मुलं असून एक मुलगा ऑस्ट्रेलियात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे.

सरकारतर्फे यापूर्वी दलितांना जमिनींचं वाटप करण्यात आलं. पण अनेक प्रकरणांमध्ये कर न भरल्याचं कारण दाखवून त्यावरचा हक्क परत घेतला जात आहे. तसंच काही प्रकरणांमध्ये अशा जमिनींवर धनदांडग्यांनी कब्जा केला आहे.

भानूप्रसाद अशाच एका प्रकरणात सरकारशी लढा देत होते. दलितांसाठीच्या राखीव जमिनी त्यांना वाटून टाकाव्यात त्यावर इतरांनी केलेला कब्जा सोडविण्यात यावा अशा मागण्या त्यांनी केल्या होत्या.

दलित कार्यकर्ता सुबोध परमार यांच्या म्हणण्यानुसार, सरकारतर्फे अशा जमिनींचे अधिकार कागदावर देण्यात आले असले तरी वास्तवात तसं चित्र नाही.

भानूप्रसाद वनकर यांनी आपण आत्मदहन करणार असल्याचा इशारा प्रशासनाला दिला होता. असं दलित संघटनांचं म्हणणं आहे.

प्रतिमा मथळा अहमदाबाद शहरात अज्ञात व्यक्तींनी वाहन पेटवून दिलं.

आमदार जिग्नेश मेवाणी यांनीही यासंदर्भात एक निवेदन दिलं होतं. ज्यात 1,63,000 एकर जमीन दलितांना वाटप करण्यात यावी असं म्हटलं होतं. पण सरकारनं अद्याप या जमिनी दिलेल्या नाहीत. या जमिनींसाठी दलित संघटना संघर्ष करत आहे.

सुबोध परमार यांनी बीबीसीला सांगितलं की, जेव्हा भानूप्रसाद यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तेव्हा ते 96 टक्के जळालेले होते. त्यांना लाइफ सर्पोट सिस्टीमवर ठेवण्यात आलेलं होतं. त्यांच्या कुटुंबाने त्यांचा मृतदेह अद्याप ताब्यात घेतलेला नाही.

प्रतिमा मथळा भानूप्रसाद यांच्या कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.

भानूप्रसाद यांच्या कुटुंबाचं म्हणणं होतं की, 13 मागासवर्गीय आमदारांनी भानूप्रसाद यांचा मुद्दा उचलावा किंवा त्यांनी राजीमाना द्यावा. ज्या मागणीसाठी भानूप्रसाद यांनी आत्मदहन केलं, त्या सरकारने पूर्ण कराव्यात.

या प्रकरणात पाटीदार नेता हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर, जिग्नेश मेवाणी आणि काँग्रेस पक्षाचे विधासभेतील विरोधीपक्ष नेता परेश धानानी यांनी शनिवारी या कुटुंबाची भेट घेतली होती.

मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे तसेच कडक कारवाईचं आश्वासन दिलं आहे. सरकार त्यांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करत असल्याचंही ते म्हणाले.

कुटुंबातर्फे ठेवण्यात आलेल्या मागण्यांपैकी काही मागण्या स्वीकारण्यात आल्याची शनिवारी सायंकाळी सरकारने घोषणा केली होती.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)