#5मोठ्याबातम्या : 'मनोहर पर्रीकर यांची प्रकृती स्थिर, अफवांवर विश्वास ठेवू नका'

मनोहर पर्रिकर Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा मनोहर पर्रिकर

आज सकाळी विविध वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूयात.

1. मनोहर पर्रीकर यांची प्रकृती स्थिर

प्रकृती अस्वस्थतेमुळे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

फूड पॉयझनिंगच्या त्रासानंतर पोटात दुखू लागल्याने प्रथमत: त्यांच्यावर गोव्यात उपचार सुरू होते. नंतर त्यांना मुंबईला हलवण्यात आलं. गेल्या 4 दिवसांपासून पर्रीकर हे प्रकृती अस्वस्थतेमुळे लीलावती रुग्णालयात दाखल आहेत.

एबीपी माझाच्या वृत्तानुसार, पर्रीकरांच्या प्रकृतीबाबत माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियात गैरसमज निर्माण करणाऱ्या बातम्या दिसून आल्या. त्यानंतर रुग्णालयाने एक प्रसिद्धपत्रक जाहीर करून, "मनोहर पर्रीकर यांची प्रकृती स्थिर असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका," असं आवाहन केलं आहे.

दरम्यान, मुंबईत एका कार्यक्रमानिमित्त आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यक्रम आटोपल्यानंतर लीलावती रुग्णालयात पर्रीकर यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

2. 'पुणे-मुंबई प्रवास अवघ्या 20 मिनिटांत!'

पुणे-मुंबई-नवी मुंबई हा प्रवास अवघ्या 20 मिनिटांत पूर्ण करू शकणाऱ्या 'व्हर्जिन हायपरलूप' प्रकल्पावर काम सुरू करत आहोत, असं ब्रिटनच्या व्हर्जिन ग्रूपचे अध्यक्ष रिचर्ड ब्रॅन्सन यांनी सांगितलं आहे.

देशातील प्रमुख शहरांना 2 तासांत जोडणारी आणि दरवर्षी 15 कोटी प्रवाशांना ने-आण करण्याची क्षमता असलेली ही ट्रेन सुरू करण्यास आम्ही कटीबद्ध आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Image copyright VIRGIN HYPERLOOP ONE
प्रतिमा मथळा हायपरलूप ट्रेन

लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, हायपरलूप हे अतिजलद प्रवासाचं माध्यम विकसित करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) आणि लॉस एंजेलेसच्या हायपरलूप कंपनीमध्ये सामंजस्य करार झाले आहेत.

महाराष्ट्र सरकारतर्फे आयोजित 'मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स' या गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं.

महाराष्ट्रात 70,325 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे प्रस्ताव जगभरातील उद्योजकांनी या परिषदेत दिले आहेत. रिलायन्स 60 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे, रायगड जिल्ह्यातल्या मानगाव परिसरात पोस्को 8000 कोटी रुपये गुंतवणुकीतून पोलाद कारखाना उभारणार आहे तर महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी कांदिवलीत 1700 कोटी खर्चून मनोरंजन केंद्र उभारणार आहे, अशा घोषणा 'मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स' परिषदेत करण्यात आल्याचंही या वृत्तात म्हटलं आहे.

3. कट्टरवाद्यांच्या हल्ल्यात राष्ट्रवादीच्या नेत्याचा मृत्यू

विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या मेघालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका नेत्याचा कट्टरवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला.

हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी सांयकाळी 7.30च्या सुमारास राजधानी शिलाँगपासून 245 किलोमीटर अंतरावर ही घटना घडली. इस्ट गारो हिल्स जिल्ह्यातल्या विल्यमनगर मतदारसंघातले राष्ट्रवादीचे उमेदवार जोनाथन संगमा हे निवडणूक प्रचार करून विल्यमनगरला परतत होते.

Image copyright DIPTENDU DUTTA/GETTY IMAGES

याप्रकरणी मेघालय पोलीस महासंचालक एस. बी. सिंग यांनी रविवारी रात्री सांगितलं की, "IED स्फोटाची माहिती आम्हाला मिळालेली आहे. त्यात काही लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. पोलीस दल अद्याप तिथं पोहोचू शकलेलं नसल्यानं सविस्तर माहिती अद्याप देऊ शकत नाही."

43 वर्षीय संगमा यांनी 2013 मध्ये याच मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविली होती. यंदा त्यांच्याशिवाय आठ इतर उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते, ज्यात मेघालयाच्या विद्यमान शिक्षणमंत्र्यांचाही समावेश आहे.

4. नागपुरात पत्रकाराच्या आई आणि मुलीची हत्या

नागपुरात एका पत्रकाराच्या आई आणि दीड वर्षांच्या मुलीचं अपहरण करून दोघींची हत्या करण्यात आल्याची घटना घडली.

दिव्य मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, 'नागपूर टुडे' या वेब पोर्टलचे पत्रकार रविकांत कांबळे यांची आई उषा कांबळे (56) आणि मुलगी राशी या दोघीही शनिवारी संध्याकाळपासून दिघोरी भागातल्या त्यांच्या निवासस्थानाजवळून बेपत्ता झाल्या होत्या.

रविवारी दोघींचे मृतदेह पोत्यात कोंबलेल्या अवस्थेत आढळून आले.

Image copyright SAJJAD HUSSAIN/GETTY IMAGES

भिशीच्या पैशांच्या वादातून घराजवळील किराणा दुकानदारानेच दोघींची हत्या केल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झाल्यावर दुकानदाराला अटक करण्यात आली आहे.

5. गोपनीय पासवर्ड पुरवल्यानेच घोटाळा?

अत्यंत गोपनीय पासवर्ड पुरवल्यानंच नीरव मोदी याला बनावट समझोता पत्रं मिळू शकली, अशी कबुली PNB-नीरव मोदी घोटाळ्यातले अटक आरोपी आणि पंजाब नॅशनल बँकेचे माजी उपव्यवस्थापक गोकुळनाथ शेट्टी यांनी दिली असल्याची माहिती CBIच्या सूत्रांनी दिली.

वृत्तसंस्थेच्या हवाल्यानं 'लोकसत्ता'ने याबाबत वृत्त दिलं आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा नीरव मोदी

बँकेचा गोपनीय 'लेव्हल 5' पासवर्डद्वारे 'स्विफ्ट' नावाच्या बँकेच्या सॉफ्टवेअरची मदती घेऊन 'लेटर ऑफ अंडरस्टँडिंग' म्हणजे समझोतापत्रं नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या कंपन्यांसाठी शेट्टी यांनी बेकायदेशीरपणे उपलब्ध करून दिली.

शेट्टी आणि मनोज खरात या दोघांना CBIने शनिवारी अटक केल्यानंतर त्यांनी जाबजबाबात गुन्ह्याची कबुली दिली.

"सहायक उपमहाव्यवस्थापकांच्या पातळीवर वापरला जाणाऱ्या 'लेव्हल 5' पासवर्डच्या माध्यमातून हे समझोतापत्रं आम्ही काढत गेलो. हा पासवर्ड नीरव मोदी, त्याच्या कंपनीचे कर्मचारी, संचालकांनाही दिला होता," असे शेट्टी यांनी कबुलीजबाबात सांगितल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)