शिवाजी महाराजांचे मुस्लीम शिलेदार माहीत आहेत का?

छत्रपती शिवाजी

महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी सगळ्यांत लोकप्रिय राजे आहेत. मुंबई विमानतळ आणि रेल्वे स्थानकाला त्यांचं नाव आहे. अरबी समुद्रात त्यांचं भव्य स्मारक करण्याची योजना आहे. त्यांच्या राजकीय विचारसरणीची सर्वजण आपापल्या पद्धतीने आठवण करत असतात.

काही लोक त्यांना 'गोब्राह्मण प्रतिपालक' (ब्राह्मण आणि गायींचे रक्षक) म्हणतात. काही जण सांगतात की लोक त्यांना 'कल्याणकारी राजा' म्हणायचे.

शिवाजी मुस्लीमविरोधी होते, असाही एक मतप्रवाह आहे.

काही वर्षांपूर्वी मिरज-सांगली भागात गणेशोत्सवाच्या वेळी एका देखाव्यावर शिवाजी अफजलखानाला मारताना दाखवलं होतं. एक हिंदू राजा एका मुसलमानाला मारत आहे, अशी प्रतिमा निर्माण करण्यात आली. ते पोस्टर संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचलं आणि नंतर जातीय हिंसाचार झाला.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा जाणता राजा नाटकातील एक दृष्य

अशा प्रकारचा प्रचार मुसलमानांना भडकवण्यासाठी होत असतो. काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी प्रतापगडाजवळची अफजलखानची कबर तोडण्याचा प्रयत्नसुद्धा केला.

शिवाजी महाराजांनी कबर उभारली होती, असं जेव्हा सांगितलं तेव्हा हा उपद्रव थांबला होता.

मुस्लिमांबद्दल धोरण काय होतं?

शिवाजी सर्व धर्मांचा सन्मान करायचे. त्यांची धोरणं, लष्करं आणि प्रशासनिक नियुक्त्यांमध्ये या धोरणाची झलक दिसून येते.

शिवाजींचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी सुफी संत शाह शरीफ यांच्या सन्मानाप्रित्यर्थ आपल्या मुलांची नावं शहाजी आणि शरीफजी ठेवली होती.

शिवाजी औरंगजेबाविरुद्ध आणि स्थानिक हिंदू राजांविरुद्धही लढले.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा जाणता राजामधील एक दृष्य

गमतीची गोष्ट अशी की औरंगजेबविरोधातल्या युद्धात औरंगजेबच्या सेनेचं नेतृत्व करण्यासाठी राजा जयसिंह होता. तो रजपूत होता आणि औरंगजेबच्या दरबारात उच्चाधिकारी होता.

शिवाजींनी आपल्या प्रशासनात मानवतेचं जे धोरण अवलंबलं होतं, ते कोणत्याही धर्मावर आधारित नव्हतं.

लष्कर आणि नौसेनेत सैनिकांच्या नियुक्तीसाठी धर्म हा निकष नव्हता आणि त्यातले एक तृतीयांश सैनिक मुस्लीम होते.

शिवाजी महाराजांच्या नौसेनेची धुरा सिद्दी संबलच्या हाती होती आणि त्यांच्या नौसेनेत सिद्दी मुस्लीम मोठ्या संख्येने होते.

जेव्हा शिवाजी आग्र्यात नजरकैदेत होते, तेव्हा तिथून पलायन करण्यासाठी ज्या दोघांनी त्यांना मदत केली होती, त्यांच्यात मदारी मेहतर नावाचे मुस्लीम होते.

त्यांच्या गुप्तहेर प्रकरणांचे सचिव मौलाना हैदर अली होते आणि त्यांच्या शस्त्रागाराची कमान इब्राहिम खानच्या हातात होती.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा जाणता राजामधील एक दृश्य

शिवाजींनी हजरत बाबा याकुत थोरवाले यांना आजन्म निवृत्ती वेतन देण्याचा आदेश दिला होता. त्याचवेळी गुजरातमध्ये असलेल्या चर्चवर हल्ला झाला, तेव्हा फादर एंब्रोज यांची मदत केली होती.

शिवाजी महाराजांनी राजधानी रायगडमध्ये पूजेसाठी जगदीश्वर मंदिराची उभारणी केली होती. त्याचवेळी आपल्या महालाच्या समोर मुस्लीम भाविकांसाठी मशीद तयार केली होती.

शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याला स्पष्ट आदेश दिला होता की कोणत्याही परिस्थितीत मुस्लीम महिला आणि लहान मुलांबरोबर गैरवर्तणूक व्हायला नको. मशीद आणि दर्ग्याला पुरेशी सुरक्षा दिली होती.

जर कुणाला कुराणाची प्रत मिळाली, तर त्याला पूर्ण सन्मान द्यायला हवा आणि मुस्लिमांना परत करायला हवी, असा आदेश त्यांनी दिला होता.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा जाणता राजा नाटकातील एक दृष्य

कल्याणच्या सभेदाराच्या सुनेला शिवाजी महाराजांकडून दिल्या गेलेल्या सन्मानाची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे.

जेव्हा त्यांचे सैनिक सगळं सामान लुटून आणलं तेव्हा त्याबरोबर सुभेदाराच्या सुनेलासुद्धा घेऊन  आले होते. तेव्हा शिवाजी महाराजांनी आधी त्यांची माफी मागितली आणि आपल्या सैन्यांचं संरक्षण देत त्यांच्या महालापर्यंत सुरक्षित पोहोचवलं होतं.

अफझलखान आदिलशाहीचं प्रतिनिधित्व करत होता. शिवाजींचं आदिलशाहीशी बराच काळ वैर होतं.

शिवाजींना आपल्या तंबूत बोलावून मारण्याची योजना अफजलखानाने आखली होती. तेव्हा रुस्तमे जमाने शिवाजींना धोक्याचा इशारा दिला होता. त्यानेच शिवाजींना जवळ लोखंडी पंजा ठेवण्याचाही सल्ला दिला होता.

अफजलखानाचे एक सल्लागार कृष्णमूर्ती भास्कर कुलकर्णी हिंदू होते. त्यांनी शिवाजी महाराजांसमोर आपली तलवार उगारली होती.

इतिहासाचं धार्मिक लिखाण

ब्रिटिशांनी जेव्हा इतिहास लिहायला सुरुवात केली, तेव्हा राजांमध्ये झालेल्या संघर्षाला त्यांनी धार्मिक रूप दिलं.

'शिवाजी मुस्लीमविरोधी होते' असा समज राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी पसरवला गेला आहे. अनेक पुस्तकंसुद्धा याच दृष्टिकोनातून छापली गेली. बाबासाहेब पुरंदरेंचं 'जाणता राजा' हे नाटक महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रिय आहे. या नाटकात शिवाजी मुस्लीमविरोधी होते, असं दाखवलं आहे.

"एक समाज म्हणून आणि एक धर्म म्हणूनही शिवाजी मुस्लिमांविरुद्ध कोणत्याच प्रकारचा द्वेष करत नव्हते," असं इतिहासकार सरदेसाई 'New History of Maratha' या पुस्तकात लिहितात.

जातीय सलोखा कायम ठेवण्यासाठीचे शिवाजींचे प्रयत्न होते. जास्तीत जास्त क्षेत्रात स्वराज्य प्रस्थापित करणं हा त्यांचा प्राथमिक उद्देश होता.

शिवाजी महाराजांना मुस्लीमविरोधी दाखवणं हा सत्याचा विरोधाभास आहे.

(राम पुनियानी IITमुंबईचे माजी प्राध्यापक असून त्यांना 2007सालच्या कम्युनल हार्मनी अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलं आहे.)

हेही वाचलंत का?

हे पाहिलं आहे का?

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : अशी असेल मुंबई-पुणे दरम्यानची हायपरलूप

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)