#5मोठ्याबातम्या : नीरव मोदीनंतर आता 3695 कोटींचा 'रोटोमॅक' कर्जघोटाळा?

रोटोमॅक पेन कंपनीचे प्रवर्तक विक्रम कोठारी

फोटो स्रोत, Facebook / Vikram Kothari

फोटो कॅप्शन,

रोटोमॅक पेन कंपनीचे प्रवर्तक विक्रम कोठारी

पाहूयात आज सकाळी विविध वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या 5 महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात.

1. आता रोटोमॅक कर्जघोटाळा

नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या 11,400 कोटींच्या घोटाळ्याने देश हादरला असतानाच, आणखी 3,695 कोटींचा नवा कर्जघोटाळा समोर आला आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, रोटोमॅक पेन कंपनीचे प्रवर्तक विक्रम कोठारी यांनी व्यवसायासाठी घेतलेलं कर्ज बुडवून सात बँकांना गंडा घातला आहे. 2008 ते 2013 दरम्यान त्यांनी परदेशी गिऱ्हाईकांना आणि विक्रेत्यांना फॉरेन लेटर ऑफ क्रेडीटच्या माध्यमातून पैसे दिले होते.

CBI आणि अंमलबजावणी संचालनालयने (ED) त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. कानपूर आणि अन्य ठिकाणच्या कोठारींच्या मालमत्तांवर धाड टाकण्यात आली आहे. बँक ऑफ बडोदाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

दुसरीकडे, गेल्या आठवड्यात उघडकीस आलेल्या घोटाळ्यातला मुख्य आरोपी नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेला पत्र लिहिलं आहे.

'लोकसत्ता'च्या वृत्तानुसार, नीरव मोदीने बँकेला लिहिलेल्या पत्रात, त्याने बँकेकडून फक्त 5,000 कोटींचे कर्ज घेतलं असल्याचं म्हटलं आहे. आपण घेतलेल्या कर्जाची रक्कम बँकेने वाढवून सांगितल्याचा दावाही त्याने केला आहे.

"बँकेने हे सगळं प्रकरण चव्हाट्यावर आणल्यानं माझा व्यवसाय बुडाला आहे. माझ्या मालमत्तांवर जप्ती आली त्यामुळे आता मी कर्ज फेडू शकत नाही. या प्रकरणामुळे माझी आणि माझ्या कंपनीच्या ब्रँडची बदनामी झाली आहे. बँकेनं कर्ज वसुली करण्याचे सर्व मार्ग बंद केले आहेत," असं नीरव मोदीने या पत्रात म्हटलं आहे.

2. 'भारताची वाटचाल हिंदू पाकिस्तानकडे'

महंमद अली जिनांच्या पावलांवर पाऊल ठेवत आपण भारताला 'हिंदू पाकिस्तान' बनवू पाहत आहोत, असा आरोप स्वराज अभियानचे संस्थापक योगेंद्र यादव यांनी केला आहे.

फोटो स्रोत, MANPREET ROMANA/GETTY IMAGES

फोटो कॅप्शन,

प्रातिनिधिक छायाचित्र

महाराष्ट्र टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, पुण्यात एका व्याख्यानमालेत बोलताना यादव म्हणाले, "'लाँचिंग' आणि 'लिंचिंग' हा नव्या भारताचा धर्म होत चालला आहे. एकतर आपल्या देशात काही ना काही नवं मोठ्या झोकात 'लाँच' केलं जातं, किंवा मग कुणाला तरी माथेफिरू जमाव मारून टाकतं."

"या घटना उघड्या डोळ्यांनी अनुभवताना त्यांच्याबद्दल सरकारमधील कुणालाच बोलायची इच्छा होत नाही. किमान वाईट वाटलं, असंही कुणी म्हणत नाही. त्या अखलाख, पेहलू खान, जुनैदसारख्या मुस्लिमांसाठी आपली घटना कुठं शिल्लक राहिली आहे का?" असा सवालही त्यांनी केला.

3. गुजरात नगरपालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची मुसंडी

गुजरातमध्ये नुकत्याच झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये भाजपने सर्वाधिक 44 ठिकाणी विजय मिळविला असला तरी त्यांच्या हातून 16 नगरपालिका निसटल्या आहेत.

फोटो स्रोत, SAM PANTHAKY/GETTY IMAGES

सकाळने दिलेल्या वृत्तानुसार, या निवडणुकांमध्ये काँग्रेसनं गतवेळच्या तुलनेत दुपटीहून अधिक नगरपालिकांमध्ये विजय मिळविला आहे. काँग्रेसला गेल्या निवडणुकीत केवळ 12 ठिकाणी विजय मिळाला होता. यंदा मात्र काँग्रेसने 27 पालिकांमध्ये सत्ता मिळविली आहे. गेल्या वेळी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरीही झाली होती.

एकूण 75 पालिकांसाठी झालेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससह अपक्षांनी चार जागांवर यश मिळविलं आहे. 2013 मध्ये गुजरातमध्ये झालेल्या 75 नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपनं 59 जागांवर विजय मिळविला होता.

4. अभिनेत्रीसमोर हस्तमैथुन करणाऱ्याला अटक

अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांच्यासमोर एका व्यक्तीनं हस्तमैथुन केल्याचा प्रकार मुंबईत घडला. सोशल मीडियावरून त्यांचे पती आणि अभिनेते सुमीत राघवन यांनी याबद्दल माहिती दिली.

एबीपी माझानं दिलेल्या वृत्तानुसार, चिन्मयी सुमीत मुंबईतील विलेपार्ले पूर्व भागातील पार्ले टिळक शाळेजवळ होत्या. त्यावेळी एका व्यक्तीनं त्यांच्याकडे पाहून हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली. तो व्यक्ती एक मोठ्या लक्झरी गाडीत होता आणि चिन्मयी यांनी त्याच्या श्रीमुखात भडकवण्याआधी तो पसार झाला, असं सुमीत राघवन यांनी ट्वीट करून सांगितलं.

सुमीत राघवन यांनी केलेल्या तक्रारीत त्या गाडीच्या नंबरचे शेवटचे चार आकडे नमूद केल्यानंतर पोलिसांनी तत्परतेने आरोपीला शोधून बेड्या ठोकल्या.

सुमीत राघवन यांनी पोलिसांचे आभार मानले म्हटलं - "देव न करो, मात्र दुर्दैवाने अशी वेळ कोणावर आलीच तर सहन करू नका. आवाज उठवा. पोलिसांत तक्रार दाखल करा."

5. NEET परीक्षेसाठी पोशाखाचं बंधन

मेडिकल प्रवेशांसाठी घेण्यात येत असलेल्या नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्टसाठी (NEET) बसणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोशाखाचं बंधन घालण्यात आले आहे.

महाराष्ट्र टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, येत्या ६ मे रोजी होणाऱ्या या परीक्षेत विद्यार्थ्यांना फिक्या रंगाचा, अर्ध्या बाह्यांचा शर्ट घालणं बंधनकारक आहे. तसंच त्यावर मोठी बटणं किंवा बॅजेस लावता येणार नाहीत.

फोटो स्रोत, MANPREET ROMANA/GETTY IMAGES

फोटो कॅप्शन,

प्रातिनिधिक छायाचित्र

त्याचप्रमाणं, जोडे न वापरता केवळ चप्पल घालूनच परीक्षेला येण्याचं बंधन घालण्यात आले आहे. जीन्स, शर्ट असे कपडे चालणार असले तरी कुर्ता, पायजाम्यावर मात्र बंदी घालण्यात आली आहे.

विद्यार्थिनींना कोणत्याही प्रकारचे दागिने घालून परीक्षेला बसता येणार नाही. हिजाब तसेच बुरखा घालण्यास परवानगी देण्यात आली असली तरी पारंपरिक पोशाख घालणाऱ्या विद्यार्थ्यांची केंद्रावर कसून तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना वेळेच्या बऱ्याच आधी परीक्षा केंद्रावर पोहोचावं लागणार आहे.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)