दादोजी कोंडदेव नेमके कोण होते - गुरू की चाकर?

दादोजी कोंडदेव Image copyright FACEBOOK

26 डिसेंबरची रात्र... पुण्यातल्या लाल महालात सगळीकडे अंधाराचं साम्राज्य पसरलं होतं. दूर कुठेतरी दोन दिवे लुकलुकत होते. त्या अंधारात या कानाची खबर त्या कानाला लागू न देता काही जणांचं पथक लाल महालात घुसलं. महाल त्यांच्या माहितीचाच होता. मध्यरात्री दोन-अडीचच्या सुमारास त्यांनी कारवाईला सुरुवात करत अवघ्या काही वेळातच 'मोहीम' फत्ते केली.

ही मोहीम शाहिस्तेखानाची शास्ता करण्याची नव्हती, तर लाल महालातून दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवण्याची होती. जेम्स लेन यांच्या वादग्रस्त पुस्तकानंतर संभाजी ब्रिगेडने आक्रमक पवित्रा घेत हा पुतळा हटवण्याची मागणी केली होती.

या विषयावरून राज्यात 2010 मध्ये वादंग माजला होता आणि अखेर पुणे महापालिकेने हा पुतळा हटवण्याचा ठराव मंजूर करत ही कारवाई रातोरात केली.

कोण होते दादोजी कोंडदेव?

दादोजी कोंडदेव कोण होते, याबाबत इतिहासकारांमध्ये दोन टोकाची मतं आहेत. पण दोन्ही पक्षांना मान्य असलेलं असं दादोजी कोंडदेव यांचं ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वही आहे.

शहाजी राजे निजामशहाकडून आदिलशाहीत गेले, तेव्हा कर्नाटकात जाताना त्यांनी पुण्याची व्यवस्था दादोजी कोंडदेव यांच्याकडे सोपवली, याबाबत दोन्ही पक्षांमध्ये एकमत आहे.

"दादोजी कोंडदेव यांचा ऐतिहासिक उल्लेख टाळणं चुकीचं आहे. ती इतिहासाशी प्रतारणा होईल. पण त्याचबरोबर त्यांना शिवाजी महाराजांचे गुरू म्हणणंही ऐतिहासिकदृष्ट्या असत्य आहे," असं इतिहास तज्ज्ञ जयसिंग पवार सांगतात.

Image copyright FACEBOOK
प्रतिमा मथळा दादोजी कोंडदेव

याबाबत पुणे विद्यापीठातील इतिहासाचे प्राध्यापक राजा दीक्षित यांना विचारलं असता ते म्हणतात की दादोजी कोंडदेव गुरू होते की नाही, याबाबत पुरावा नाही. पण शिवाजी महाराज पुण्यात आल्यानंतर इथली घडी व्यवस्थित बसवण्यासाठी त्यांना दादोजी कोंडदेव यांची मदत झाली, यात दुमत होऊ शकत नाही.

मुंबईतील SNDT महिला विद्यापीठातील इतिहास विभागाच्या प्रमुख प्राध्यापिका डॉ. वर्षा शिरगांवकर यांनी त्या काळच्या सामाजिक परिस्थितीकडे लक्ष वेधतात. "त्या वेळी कोणत्याही कार्यासाठी ब्राह्मण पंडितांची मान्यता असणं म्हणजे धर्माची मान्यता असणं, असं मानायचे. राज्यसत्तेला धर्मसत्तेची मान्यता मिळवणं हे भारतातच नाही तर जगभरात सगळीकडे होत होतं. त्यातूनच दादोजी कोंडदेव यांना हे स्थान देण्यात आलं असावं."

तत्कालीन ऐतिहासिक कागदपत्रांनुसार दादोजी कोंडदेव हे शहाजी राजेंच्या विश्वासातले आणि कर्तबगार होते, याबद्दल दोन्ही गटांमध्ये एकमत आहे.

गुरू हा उल्लेख कधी?

दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू होते, हा उल्लेख साधारणपणे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 100-125 वर्षांनी लिहिलेल्या बखरींमध्ये आढळत असल्याचं इतिहासकार सांगतात.

"उत्तरकालीन बखरकारांनी शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत दादोजी कोंडदेवांचं गुरू म्हणून चित्रण करताना दादोजींना अवास्तव महत्त्व दिलं आहे. ते या (सभासद) बखरीत नाही. शिवाजी महाराजांना दादोजींबद्दल आदर असणार, पण यांचे संबंध मालक-सेवक (चाकर) आहेत, हे सभासदाच्या लक्षात आहे," असं सभासद बखरीचे संपादक दत्ता भगत नमूद करतात.

"दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू आहेत, असा कोणताही उल्लेख शिवाजी महाराजांच्या समकालीन ऐतिहासिक साधनांमध्ये आढळत नाही. हा उल्लेख उत्तर पेशवाईत आणि त्यानंतर लिहिल्या गेलेल्या बखरींमध्ये प्रामुख्याने येतो," असं जयसिंग पवार सांगतात.

त्यानंतर 'राजा शिवछत्रपती' या ग्रंथात बाबासाहेब पुरंदरे यांनी दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचे मार्गदर्शक असल्याचं म्हणत शिवाजी महाराजांनी अनेक गोष्टींबाबतचे धडे दादोजींकडून घेतले असल्याचं लिहिलं आहे. पुरंदरेच नाही, तर शेजवलकरांसारख्या इतिहासकारांसह स्वत: जयसिंग पवार यांनीही 40 वर्षांपूर्वी लिहिलेल्या एका पुस्तकात दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचं लिहिलं होतं, असं ते कबूल करतात.

त्यातूनच इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या क्रमिक पाठ्यपुस्तकातही हाच मजकूर अनेक वर्षं शिकवला गेला होता. त्याबद्दल 2003-04 पर्यंत फारशी कुणी हरकत घेतली नव्हती.

Image copyright FACEBOOK
प्रतिमा मथळा लाल महाल

याबाबत भारत इतिहास संशोधक मंडळाचे सदस्य पांडुरंग बलकवडे यांनी मात्र वेगळीच भूमिका मांडली. "बाबासाहेब पुरंदरे यांनी दादोजी हे शिवाजी महाराजांचे गुरू आहेत, अशी भूमिका कुठेच घेतलेली नाही. या भूमिकेला आत्ता विरोध करणारे जयसिंग पवार यांनीच काही वर्षांपूर्वी त्यांच्या पुस्तकांमध्ये दादोजी हे शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचं म्हटलं होतं."

बाबासाहेब पुरंदरेंशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांची प्रतिक्रिया मिळाल्यावर इथे देण्यात येईल.

वादाचं मूळ

दादोजी कोंडदेव यांचं शिवाजी महाराजांच्या आयुष्यातलं गुरुस्थान वादात सापडलं ते जेम्स लेन यांच्या 'Shivaji - The Hindu King in Islamic India' या पुस्तकाच्या निमित्ताने.

शिवाजी महाराज आणि दादोजी कोंडदेव यांच्या नात्याबद्दल जेम्स लेन यांनी जे वादग्रस्त लिखाण केलं, ते निराधार आणि ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचं होतं, असं राजा दीक्षित सांगतात. या वादाला महाराष्ट्रातल्या जातीच्या राजकारणाचीही जोड मिळाल्याचं त्यानंतर पाहायला मिळालं.

जेम्स लेन यांच्या पुस्तकातील संबंधित उल्लेखानंतर हे पुस्तक देशात प्रसिद्ध करण्यावर बंदी घालण्यात आली. त्याचबरोबर दादोजी कोंडदेव यांच्या गुरुस्थानाबद्दलही काही इतिहासकारांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं.

याबाबत बोलताना जयसिंग पवार सांगतात की, या वादानंतर मराठा संघाच्या अनेक मंडळींनी दादोजी कोंडदेव यांच्याबद्दलचं ऐतिहासिक सत्य शोधण्याची विनंती केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अनेक ऐतिहासिक साधनं पडताळल्यावर त्यांपैकी एकाही कागदपत्रात दादोजी कोंडदेवांबद्दलचा उल्लेख आढळत नाही.

याचा प्रतिवाद करणाऱ्या इतिहासकारांकडून उत्तर पेशवाईतल्या बखरींचा संदर्भ वारंवार दिला गेला आहे. दादोजी कोंडदेव यांनी शिवाजी महाराजांना न्यायनिवाडा करण्याचे, शस्त्रास्त्र प्रशिक्षणाचे धडे दिले, असं या बखरींमध्ये नमूद केलं आहे.

गुरू की शिक्षक?

दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते, असं ठासून सांगणाऱ्या जयसिंग पवार यांच्या मते गुरू आणि शिक्षक या दोन शब्दांमध्ये गल्लत होत आहे. दादोजी कोंडदेव यांची मदत महाराजांना नक्कीच झाली, तसंच काही गोष्टी नक्कीच ते त्यांच्याकडून शिकले असतील, असं पवार सांगतात.

"जीवित कार्याची प्रेरणा ज्याच्याकडून मिळते, त्याला गुरू म्हणावं. महाराजांच्या बाबतीत दादोजी कोंडदेव यांनी त्यांना जीवित कार्याची प्रेरणा दिली, हे न पटणारं आहे. ही प्रेरणा महाराजांना मिळालीच असली तर ती शहाजी राजांकडून किंवा जिजाऊंकडून मिळणं जास्त स्वाभाविक आहे."

याबाबत पांडुरंग बलकवडे मात्र थोडी वेगळी भूमिका मांडतात. "दादोजी शिवाजी महाराजांचे गुरू होते, असं आम्ही म्हणत नाही. ते महाराजांचे मार्गदर्शक होते, यात वाद नाही. आपल्या आयुष्यात आपण आपल्या मार्गदर्शकांनाही अनेकदा गुरुस्थानी मांडतो. दादोजींच्या बाबतीतही हेच घडलं असावं."

दादोजी कोंडदेव यांच्या निधनानंतर शिवाजी महाराजांनी लिहिलेल्या पत्रातही दादोजींचा उल्लेख आहे, असं बलकवडे सांगतात. या पत्रात म्हटलं आहे की, "आमच्या वडिलांनी आम्हाला दादोजींकडे पाठवलं. आता ते निवर्तले आणि आम्ही पोरके झालो."

यावरून महाराजांच्या मनात दादोजींबद्दल काय भावना होती, हे निश्चित कळेल, असं बलकवडे म्हणतात.

मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे निवृत्त प्राध्यापक अरविंद गणाचारी यांनीही नेमक्या याच गोष्टीवर प्रकाश टाकला. "गुरू ही संकल्पना खूप मोठी आहे. दादोजींकडून शिवाजी महाराज अनेक गोष्टी शिकले हे नक्की."

मग महाराजांचं शिक्षण कुणाकडे झालं?

या प्रश्नाचं उत्तर आपल्याला परमानंद यांनी लिहिलेल्या 'शिवभारत' या ग्रंथात मिळतं. शिवाजी महाराजांचे गुरू दादोजी कोंडदेव नाहीत, याची खात्री पटल्यानंतर जयसिंग पवारांनी या प्रश्नांचं उत्तर शोधायला सुरुवात केली.

परमानंद हे शहाजी राजांच्या पदरी असलेले पंडित होते. त्यांनी शिवाजी महाराजांच्या आज्ञेनेच 'शिवभारत' हे महाराजांचं चरित्र संस्कृतमध्ये लिहिलं. हे चरित्र पूर्ण नसलं, तरी 1661-62पर्यंतचा जीवनपट मांडतं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा सात वर्षांचे असताना शिवाजी महाराजांच्या विद्याभ्यासाची सुरुवात विद्वानांच्या मांडीवर झाली.

या चरित्रानुसार शहाजी राजांनी शिवाजी महाराज सात वर्षांचे असताना त्यांना विद्वानांच्या मांडीवर ठेवून त्यांच्या विद्याभ्यासाची सुरुवात करून दिली. वयाच्या 12व्या वर्षी शिवाजी महाराजांना पुण्यात पाठवताना त्यांच्याबरोबर उत्तम सैनिक, प्रधान, ध्वज, मुद्रा, हत्ती यांच्यासह विद्वान आचार्यांचा संच दिला.

जयसिंग पवार सांगतात की, पुणे प्रांतात आल्यावर शिवाजी महाराजांना या विद्वानांनी कोणकोणत्या विषयांचे धडे दिले, याचीही यादी या 'शिवभारत'मध्ये आहे. त्या विषयांमध्ये वेदविद्येपासून धनुर्विद्या, द्वंद्वयुद्ध आणि अगदी विषपरीक्षा यांचाही समावेश होता.

शिवाजी महाराजांना मिळालेलं शिक्षण कुणा एका व्यक्तीकडून मिळालं नसून त्यात अनेकांचा सहभाग होता, असं परमानंदाच्या या ग्रंथावरून सूचित होतं.

दादोजी कोंडदेव आणि राजकारण

दादोजी कोंडदेव यांच्यावरून राजकारण तापायला सुरुवात झाली, तीदेखील जेम्स लेन यांच्या पुस्तकातल्या वादग्रस्त मजकुरावरूनच! त्या आधी रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरू होते का, यावरूनही वाद झाला होता.

जेम्स लेन प्रकरणानंतर ही जागा दादोजी कोंडदेव यांनी घेतली. या प्रकरणी पुण्यातल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत तोडफोड करण्यात आली होती. यात आरोपी असलेल्या संभाजी ब्रिगेडच्या सर्व कार्यकर्त्यांची 2017 साली निर्दोष मुक्तता झाली.

दादोजी कोंडदेव यांच्या नावाने दिला जाणारा राज्य शासनाचा पुरस्कार रद्द केला जावा, क्रमिक पाठ्यपुस्तकांमधून दादोजी कोंडदेव यांचा उल्लेख मागे घेतला जावा, अशी मागणी मराठा संघटनांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केली.

प्रतिमा मथळा महाराष्ट्र शासनाच्या क्रमिक पाठ्यपुस्तकांमधून दादोजींचा उल्लेख मागे घेतला जावा, अशी मागणी मराठा संघटनांनी केली.

या मागणीला शिवसेना, त्या वेळी नव्याने सुरू झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजप यांनी विरोध केला होता.

दादोजींसाठी समिती

या प्रकरणी सरकारने समितीही नेमली. या समितीच्या अहवालाचा आधार घेत क्रमिक पाठ्यपुस्तकांमधून दादोजी कोंडदेव यांचा उल्लेख काढून टाकण्यात आला. तसंच दादोजी कोंडदेव यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कारही रद्द करण्यात आला.

त्यानंतर हा वाद तापला तो 2010मध्ये... लाल महालातल्या दादोजी कोंडदेव यांच्या पुतळ्यावरून! हा पुतळा हटवण्यात यावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने केली. ही मागणी पुणे महापालिकेतही ठेवण्यात आली.

नेमक्या याच बाबीवर पांडुरंग बलकवडे यांनी आक्षेप नोंदवला. "दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते, हे स्वीकारलं तरीही ते महाराजांच्या विरोधात नव्हते, ही गोष्टही तेवढीच खरी आहे. मग त्यांचा पुतळा जबरदस्तीने हटवणं किती बरोबर होतं," हा प्रश्न बलकवडे उपस्थित करतात.

हा पुतळा हटवण्याचं आश्वासन पुणे महापालिकेचे तत्कालीन महापौर मोहनसिंग राजपाल (राष्ट्रवादी) यांनी दिलं. याबाबतचा ठराव पुणे महापालिकेत मांडला तेव्हा सेना, भाजप आणि मनसे या तीनही पक्षांनी विरोध केला. पण राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी बहुमताने हा ठराव मंजूर केला.

त्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वारंवार बाबासाहेब पुरंदरे यांच्या विरोधात भूमिका घेतली. बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर झालेला राज्य सरकारचा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार त्यांना देऊ नये, अशी भूमिकाही त्यांनी घेतली होती.

त्या वेळी फडणवीस सरकारला अत्यंत कडेकोट सुरक्षेत हा पुरस्कार वितरण समारंभ पार पडला होता. पुण्यात अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाने दादोजींच्या प्रतिमेचं पुणे महापालिकेसमोर पूजन केलं आणि वाद नव्याने सुरू झाला आहे.

तुम्ही हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)