'इच्छामरण नाही मिळत मग... तुम्ही माझा गळा दाबा, नंतर तुम्हाला फाशी होईल'

  • अभिजीत कांबळे
  • बीबीसी मराठी
लवाटे दांपत्य

फोटो स्रोत, Prashant Nanaware/BBC

फोटो कॅप्शन,

लवाटे दांपत्य

"आम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून मरण्यासाठी परवानगी मागतोय. मरायला जर आम्हाला परवानगी मिळत नसेल तर आता मी यांना सांगितलं आहे की तुम्ही माझा गळा दाबा. मी मरून जाईल. तुम्हाला फाशी होईल आणि तुमची इच्छा पूर्ण होईल. माझीही इच्छा पूर्ण होईल, त्यांचीही इच्छा पूर्ण होईल," हा इशारा आहे मुंबईच्या गिरगावात राहणाऱ्या 78 वर्षांच्या इरावती लवाटेंचा.

इरावती लवाटे आणि त्यांचे पती नारायण लवाटे गेल्या अनेक वर्षांपासून इच्छामरणाची मागणी सरकारकडे करत आहेत. इच्छामरणाचा कायदा जर होत नसेल तर आम्हाला वैयक्तिक तरी मरणाची परवानगी द्या, अशी मागणी लवाटे दांपत्यानं राष्ट्रपतींकडे डिसेंबर 2017 मध्ये केली होती.

मात्र त्यावर काहीही उत्तर न आल्यानं आता इरावती लवाटेंनी आपल्या पतीसाठी एक पत्र तयार केलं आहे त्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की, तुम्ही माझा गळा दाबून मला मारून टाका. 31 मार्चपर्यंत लवाटे दांपत्य सरकारच्या प्रतिक्रियेची वाट पाहणार आहे.

नारायण लवाटे हे एसटी महामंडळातून पर्सोनेल ऑफिसर म्हणून 1989 साली निवृत्त झाले. आता त्यांचं वय 88 वर्षं आहे. तर इरावती लवाटे गिरगावातील आर्यन शाळेतून मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाल्या आहेत. दोघांनी ठरवून मूल होऊ दिलेलं नाही.

नारायण लवाटे सांगतात की, "इच्छामरणाचा विचार 1987 पासून माझ्या डोक्यात होता. माझी पत्नीही माझ्यासोबत इच्छामरणाला तयार होती. स्वित्झर्लंडमध्ये इच्छामरणाची सोय आहे. तिथं जाऊन इच्छामरण स्वीकारण्याचा आम्ही प्रयत्न केला. मात्र मला पासपोर्ट न मिळाल्यानं आम्ही जाऊ शकलो नाही."

फोटो स्रोत, Prashant Nanaware/BBC

"त्यानंतर आम्ही ठरवलं की आपल्याच देशात इच्छामरणाचा कायदा होण्यासाठी प्रयत्न करायचा आणि त्यासाठी आम्ही पत्रव्यवहार केला. मात्र त्याला काही प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून अखेर आम्ही राष्ट्रपतींना पत्र लिहिले."

लवाटे पुढे सांगतात. "अरुणा शानबागच्या मृत्यूनंतर आम्ही इच्छामरणासाठी तीव्रतेनं प्रयत्न केले. अरुणाची काळजी घेण्यासाठी सरकारी हॉस्पिटल आणि तिच्या सहकारी नर्सेस तरी होत्या. मात्र सर्वसामान्य वृद्धांसाठी अशी दीर्घकाळ काळजी घेणारी व्यवस्था कुठे आहे?"

दुर्धर आजार नसतानाही इच्छामरण का हवं आहे यावर इरावती लवाटेंचे म्हणणं आहे की, "आम्हाला आम्ही धडधाकट असतानाच मरण हवं आहे. जर्जर होऊन विकल अवस्थेत आम्हाला मरण नको आहे. आम्ही रोग होण्याची वाट पाहत बसायची की काय?"

व्हीडिओ कॅप्शन,

मुंबईतील वृद्ध दांपत्य इरावती आणि नारायण लवाटे यांनी इच्छामरणाची मागणी केली आहे.

नारायण लवाटे पुढे म्हणतात, "ज्या वृद्धांना इच्छामरण हवं त्यांना इच्छामरणाची परवानगी द्यायला हवी. वृद्ध म्हणजे एकप्रकारचं भंगार आहे. उद्या वृद्धांची संख्या 20-30 टक्क्यांवर जाईल तेव्हा गॅस चेंबरमध्ये टाकून वृद्धांना मारावं लागेल"

"हा सरकारला अल्टिमेटम आहे!"

"उद्या मी खरोखर हिचा गळा दाबला आणि मला फाशीची शिक्षा झाली तर मी माझी बाजू मांडताना सरकारला सांगेन की मी तुम्हाला पुरेसा वेळ दिला असून सुद्धा तुम्ही मला उत्तर दिलं नाही, म्हणून तुम्ही मला गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त केलं आहे असं का म्हणू नये? अल्टिमेटम देण्याची पाळी सरकारनं आणली आहे. उत्तर देण्याची तसदीही तुम्ही घेत नाही."

फोटो स्रोत, Prashant Nanaware/BBC

वृद्धापकाळात किंवा आजारपणात काळजी घेण्यासाठी कोणी असेल तर तसंही कोणी लवाटे दांपत्याला नको आहे.

"आमची काळजी घेणारा असला तरी आम्हाला ज्य़ा यातना होतील त्या तर आम्ही ट्रान्सफर नाही ना करू शकत. मुळात आम्हाला दुसऱ्यावर अवलंबूनच राहायचं नाही," असं त्यांचं म्हणण आहे.

वृद्धांसाठी मुंबईत काम करणाऱ्या सिल्व्हर इनिंग्ज या संस्थेचे शैलेश मिश्रा यांनी बीबीसी मराठीशी या प्रकरणाबाबात सांगितलं की, लवाटे दांपत्य जे पाऊल उचलण्याचा इशारा देत आहे ते चुकीचंच आहे. पण या निमित्तानं आपल्या देशात वृद्धांसाठी सक्षम अशी सपोर्ट सिस्टिम नसल्याचा मुद्दाही प्रकर्षानं पुढे आला आहे.

मरणाची भाषा चुकीची, पण विषय महत्त्वाचा

मिश्रा म्हणतात, "आम्ही या दांपत्याची भेट घेतली आणि आम्हाला जाणवलं की त्यांनी ठरवलेलं आहे की आपल्याला मरायचंच आहे. त्यासाठी जे पाऊल उचलण्याबाबत ते बोलत आहेत, ते चुकीचंच आहे. असाध्य आजारानं असलेल्या व्यक्तींबाबत इच्छामरणावर विचार होऊ शकतो, मात्र धडधाकट व्यक्तींबाबत असा विचार करणे चुकीचे आहे."

फोटो स्रोत, Prashant Nanaware/BBC

फोटो कॅप्शन,

लवाटे दांपत्यानं दिलेला निर्वाणीचा इशारा

ते पुढे म्हणतात, "आपल्या देशात कुणा वृद्ध व्यक्तीला जीव संपवावा वाटतो याचं कारण आपल्याकडे त्याची सपोर्ट सिस्टिम नाही. सामाजिक सुरक्षा, आरोग्यासाठीचं पाठबळ आपल्याकडे सहजपणे उपलब्ध नाही. त्यांची मरणाची भाषा तर चुकीची आहे, मात्र त्यांनी जो विषय उचलला आहे तो महत्त्वाचा आहे."

कायदा काय म्हणतो?

इच्छामरणासाठीचा कायदा देशात नाही. त्यामुळे कोणालाही इच्छामरण घेता येऊ शकत नाही. या प्रकरणावरुन कायदेशीर बाबी जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीने कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांच्याशी संपर्क साधला.

"लवाटे दांपत्य भावनाविवश झालं आहे. कायदा हातात घेणं बरोबर नाही, हा गुन्हा आहे. भारतीय दंड विधानानुसार एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीची हत्या करणं हा कलम 302 नुसार गुन्हा आहे. तर आत्महत्येचा प्रयत्न करणे हा भारतीय दंडविधानाच्या कलम 309 नुसार गुन्हा आहे," असं सरोदे सांगतात.

अर्थात त्यांच्या इच्छामरणाबाबत गांभीर्यानं विचार व्हायला हवा असं देखील सरोदे यांचं म्हणण आहे.

हे वाचलं आहे का?

हे पाहिलं आहे का?

व्हीडिओ कॅप्शन,

जन्मानंतर लगेचच तिला मरण्यासाठी गाडण्यात आलं होतं...

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)