राजकारणात उडी घेण्यापूर्वी कमल हसन यांनी केलेली 8 वादग्रस्त वक्तव्यं

रजनीकांत यांच्यानंतर कमल हसन हेही राजकारणात येत आहेत.
प्रतिमा मथळा रजनीकांत यांच्यानंतर कमल हसन हेही राजकारणात येत आहेत.

सुप्रसिध्द तामिळ अभिनेते कमल हसन यांनी बुधवारी त्यांच्या नव्या पक्षाची घोषणा केली आहे. 'मक्कळ नीदी मय्यम' असं त्यांच्या पक्षाचं नाव आहे. त्यांच्या पक्षाच्या नावाचा अर्थ लोकांना न्याय देणारं केंद्र असा होतो. मदुराईमध्ये झालेल्या जाहीर सभेत त्यांनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे.

राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी कमल हसन गेल्या अनेक महिन्यांपासून सामाजिक आणि राजकीय विषयांवर बोलत आणि लिहीत आहेत. त्यांची अनेक वक्तव्यं वादग्रस्त ठरली आहेत.

1.कमल हसन यांनी 'हिंदू दहशतवाद' अस्तित्वात असल्याचं 'आनंद विकटन' या साप्ताहिकात लिहिलं. यामुळे नोव्हेंबर २०१७ मोठं राजकीय वादळ निर्माण झालं होतं. त्यांनी लिहिलं होतं, "हिंदू इतर धर्मांतल्या अतिरेकी विचारांना आव्हान देऊ शकत नाहीत, कारण अतिरेकी विचार हिंदूंमध्येही पसरले आहेत. सत्यमेव जयते या उक्तीवरचा हिंदूंचा विश्वास कमी होताना दिसतोय. ते बळाच्या जोरावर म्हणणं मांडत आहेत."

2.कमल हसन यांनी धार्मिक ग्रंथ महाभारतावरही वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले की, "या देशात अजूनही असा धार्मिक ग्रंथ वाचला जातो, ज्यामध्ये खेळासाठी महिलेचा वापर होतो." या वक्तव्यानंतर कमल हसन यांना लोकांच्या रोषाला सामोरे जावं लागलं. तसंच त्यांच्या विरोधात तमिळनाडूच्या एका कोर्टात हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार नोंदवली गेली.

3.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या नोटबंदीचं कमल हसन यांनी स्वागत केलं होतं. त्यांनी ट्विटरवर लिहिलं होतं, "मिस्टर मोदी यांना सलाम, या पाउलाचं सर्व राजकीय विचारांच्या पलिकडे जाऊन कौतुक व्हायला हवं."

मात्र नंतर त्यांनी या वक्तव्यावरून यूटर्नही घेतला होता. एका वर्षानंतर ते म्हणाले, "जर पंतप्रधान मोदी त्यांच्या नोटबंदीच्या निर्णयाबद्दल माफी मागण्यास तयार असतील, तर मी त्यांना पुन्हा एकदा सलाम करतो."

4. सरकारी शिक्षकांच्या संपाच्या बाबतीत कमल हसन यांनी ट्वीट करत राजकीय नेत्यांवर निशाणा साधला होता. "काम नाही तर पैसे नाही, हा नियम फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच का? रेसॉर्टमध्ये सौदेबाजी करणाऱ्या नेत्यांबद्दल काय विचार आहे," असं ट्वीट केलं आहे.

5. तामिळ चित्रपट 'मेरसल'मधील GSTच्या संदर्भातील वादावर कमल हसन यांनी आक्षेप घेतला होता. ते म्हणाले की, "समीक्षकांचा आवाज दाबता येणार नाही. कारण हा देश तेव्हाच चमकेल जेव्हा येथील लोकांना बोलण्याचं स्वातंत्र मिळेल."

6. जल्लिकट्टू बंदीच्या प्रकरणात कमल हसन सुप्रीम कोर्टाच्या विरोधात गेले होते. जल्लिकट्टूच्या समर्थनार्थ ते म्हणाले की, "हा तामिळ परंपरेचा भाग आहे. जर प्राणीमित्रांचा (अॅनिमल अॅक्टीव्हिस्ट) जल्लिकट्टूला एवढा विरोध असेल तर बिर्याणीसुद्धा बॅन करा. इथं या बैलांची देखरेख पाळीव प्राण्यांप्रमाणे होते. मी स्वतः हा खेळ खेळला आहे. आणि मी एक तामिळ व्यक्ती आहे आणि हा खेळ मला खूप आवडतो."

7. संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावत चित्रपटाच्या वादाबद्दलही कमल हसन यांनी ट्वीट केलं होतं. ते म्हणाले की, "मला मिस दीपिकाचं डोकं सुरक्षित हवंय. यापेक्षाही जास्त त्यांच्या स्वतंत्रतेचा सन्मान करायला हवा. अनेक समुदायांनी माझ्या चित्रपटांना विरोध दर्शविला आहे. कोणत्याही चर्चेत जास्त वाद घालणं चुकीचं आहे. विचार करण्याची वेळ आली आहे. आपण खूप काही बोललो, आता भारत मातेचं ऐका."

8. कमल हसन यांच्या विश्वरूपम् या बहूचर्चित चित्रपटावर काही मुस्लीम संघटनांनी मुसलमानांच्या भावना दुखावल्याबद्दल आक्षेप घेतला होता. त्यानंतर तमिळनाडू सरकारनं या चित्रपटावर बंदी घातली होती.

सरकारच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देताना कमल हसन म्हणाले होते की, "या आरोपांमुळे मी खूप दुःखी झालो आहे. काही लहान गट आपल्या राजकिय स्वार्थासाठी माझा वापर करत आहेत. या चित्रपटाला यासाठीच बनवण्यात आलं आहे की, कोणत्याही मुस्लीम व्यक्तीला तो पाहून अभिमान वाटेल." यानंतर या चित्रपटाबद्दल मुस्लीम संघटना आणि अभिनेता कमल हसन यांच्यात झालेल्या चर्चेनंतर हा वाद मिटला आणि चित्रपट प्रदर्शित झाला.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)