कस्तुरबांचा ब्रिटिशांनी खून केला असं नेताजी बोस यांना का वाटायचं?

Image copyright keystone/getty Images

महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांचा आज स्मृतिदिन आहे. त्यांच्या मृत्यूनंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 22 फेब्रुवारी1944 रोजी एक निवेदन दिलं होतं.

सुभाष चंद्र बोस यांनी लिहिलेलं हे निवेदन पुढील प्रमाणे.


कस्तुरबा गांधी आता आपल्यात नाहीत. 74 वर्षांच्या असताना इंग्रजांच्या अधिपत्याखाली असलेल्या पुण्याच्या कारागृहात त्यांचा मृत्यू झाला.

कस्तुरबा यांच्या मृत्यूमुळे देशातल्या अडतीस कोटी ऐंशी लाख आणि परदेशात राहणाऱ्या देशवासीयांच्या दु:खात मी सहभागी आहे.

त्यांचा मृत्यू दु:खद परिस्थितीत झाला असला तरी गुलामगिरीत असलेल्या देशात असा मृत्यू गौरवशाली आणि सन्मानजनक आहे.

हे भारताचं वैयक्तिक नुकसान आहे. दीड वर्षांपूर्वी जेव्हा महात्मा गांधीना पुण्याच्या कारागृहात डांबलं तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर झालेला हा दुसरा मृत्यू आहे.

आधी महादेव देसाईंचा मृत्यू झाला आहे. देसाईंनी गांधींबरोबर आयुष्यभर काम केलं. ते गांधींचे खासगी सचिव होते. आता या कारावासादरम्यान हा दुसरा धक्का गांधींना सहन करावा लागला आहे.

कस्तुरबा एक हुतात्मा

कस्तुरबा म्हणजे संपूर्ण देशाला आईसारख्या होत्या. मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि या कठीणसमयी मी गांधीजींचं सांत्वन करतो.

कस्तुरबांबरोबर माझा अनेकदा संपर्क व्हायचा, याबद्दल मी स्वत:ला अतिशय भाग्यवान समजतो.

कस्तुरबा स्त्रीत्वाचा आदर्श होत्या. त्या शक्तिशाली, धैर्यवान, शांत आणि स्वावलंबी होत्या. स्वातंत्र्य संग्रामाच्या दौऱ्यादरम्यान ज्या मुलींना त्या भेटल्या त्या मुलींसाठी कस्तुरबा आदर्श होत्या.

दक्षिण आफ्रिकेत झालेल्या सत्याग्रहात त्यांनी आपल्या नवऱ्याची साथ दिली. हे सहचर्य तीस वर्ष सुरू होतं.

अनेकदा तुरुंगात गेल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला. पण अगदी 74व्या वर्षीसुद्धा त्यांना तुरुंगात जायला अजिबात भीती वाटली नाही.

महात्मा गांधींनी जेव्हा सविनय कायदेभंग चळवळ चालवली तेव्हा त्या संघर्षातसुद्धा कस्तुरबा त्यांच्याबरोबर होत्या. मुलींसाठी एक ज्वलंत उदाहरण आणि मुलांसाठी एक आवाहन म्हणून स्वातंत्र्य युद्धात त्या उतरल्या.

Image copyright Kanu Gandhi
प्रतिमा मथळा नोव्हेंबर 1938 मध्ये अबोटाबाद मध्ये महात्मा आणि कस्तुरबा गांधी.

कस्तुरबांना एखाद्या हुतात्म्यासारखा मृत्यू आला आहे. चार महिन्यांहून अधिक काळ त्या ह्दयरोगानं ग्रस्त होत्या.

आरोग्याच्या कारणावरून त्यांची तुरुंगातून सुटका करावी अशी मागणी केली होती. पण पाषाणहृदयी ब्रिटिश सरकारनं या विनंतीला मान दिला नाही.

कदाचित या परिस्थितीमुळे महात्मा गांधी माघार घेतील अशी इंग्रजांना अपेक्षा होती. ब्रिटिश लोक स्वातंत्र्य, नैतिकता आणि न्यायाबद्दल बोलतात.

पण खरंतर हे लोक या निर्घृण हत्येसाठी दोषी आहेत. या पशुंसाठी मी फक्त घृणा व्यक्त करतो. ते भारतीयांना कधीच समजून घेऊ शकले नाहीत.

हा मृत्यू हत्येपेक्षा कमी नाही

महात्मा गांधी किंवा भारताला इंग्रजांनी कितीही त्रास दिला तरी गांधी आपल्या ठाम निर्णयापासून तसूभरही ढळणार नाहीत.

महात्मा गांधींनी इंग्रजांना देश सोडायला सांगितला आणि या देशाला आणखी एका युद्धाच्या धोक्यापासून वाचवायला सांगितलं.

इंग्रजांनी त्यांना अत्यंत मग्रुरपणे उत्तर दिलं आणि त्यांना तुरुंगात डांबलं. ते आणि त्यांची महान पत्नी तुरुंगात जायला तयार होते, पण पारंतत्र्यात असलेल्या देशात तुरुंगातून बाहेर यायला तयार नव्हते.

कस्तुरबा आपल्या पतीसमोर शेवटचा श्वास घेतील हे इंग्रजांनी ठरवलंच होतं. त्यांची ही इच्छा आता पूर्ण झाली आहे. हा मृत्यू हत्येपेक्षा कमी नाही.

पण देशाविदेशात राहणाऱ्या लोकांना हा इशारा आहे की, इंग्रजांनी आपल्या नेत्यांना एकएक करून मारण्याचा निश्चयच केला आहे. जोपर्यंत इंग्रज भारतात आहेत तेव्हापर्यंत ते देशावर अत्याचार करत राहतील.

Image copyright Kanu Gandhi
प्रतिमा मथळा संजीव सेठ यांच्यानुसार कस्तुरबा गांधी यांच्या शेवटच्या दिवसातील हे छायाचित्र.

ब्रिटिशांचं साम्राज्य भारतातून नष्ट करणं हाच कस्तुरबा गांधीच्या मृत्यूचा सूड असू शकतो. पूर्व आशियामध्ये राहणाऱ्या भारतीयांनी इंग्रजांविरुद्ध युद्ध छेडलं आहे.

त्यामुळे त्यांच्या खांद्यावर एक विशेष जबाबदारी आहे. इथे राहणारे लोकसुद्धा याच उत्तरदायित्वाचा एक भाग आहेत. जेव्हापर्यंत इंग्रज देशातून पळून जाणार नाहीत, तेव्हापर्यंत हा सशस्त्र संघर्ष आम्ही सुरूच ठेवू ही पवित्र शपथ आम्ही पुन्हा घेत आहोत.

(नेताजी संपूर्ण वाङमय , पृ. 177,178, टेस्टामेंट ऑफ सुभाष बोस, पृ. 69-70 )

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)