#5 मोठ्या बातम्या : भारतातला भ्रष्टाचार वाढलाय का?

पैसे Image copyright Getty Images

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया

1. भारतात भ्रष्टाचार वाढलाय का?

नीरव मोदी घोटाळा गाजत असताना 2017चा जागतिक भ्रष्टाचार निर्देशांक जाहीर झाला आहे. त्यात भारताने दोन स्तरांची घसरण झाली आहे. चीनच्या तुलनेत भारत सुमार ठरला असल्याचं वृत्त लोकसत्तानं दिलं आहे.

ट्रान्सपरंसी इंटरनॅशनल (TI) ने जाहीर केलेल्या जागतिक भ्रष्टाचार आकलन निर्देशांकात भारताचं स्थान 79 वरून 81वर गेलं आहे. या निर्देशांकात चीनचा 77वा तर पाकिस्तानचा 117वा क्रमांक आहे.

इतर आशियाई देशांमध्ये भूतान चांगल्या स्थानावर आहे, तर बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका यांचं स्थान बिकट आहे.

2. आता कृषी अभ्यासक्रमासाठीही CET

कृषी विद्यापीठातील सर्व अभ्यासक्रमांसाठी आता सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारने कृषी अभ्यासक्रमांनाही व्यावसायिक अभ्यासक्रम घोषित केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं वृत्त महाराष्ट्र टाइम्सने दिलं आहे.

या परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी 25 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली असून 10 मे रोजी ही परीक्षा विविध केंद्रांवर घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचा पेपर बंधनकारक असेल तर जीवशास्त्र किंवा गणित यापैकी एका विषयाची निवड करावी लागणार आहे.

3. मनोहर पर्रीकरांना रुग्णालयातून सुटी

मुंबईतील लीलावती रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर गोव्यात दाखल झाल्याची बातमी, एबीपी माझाने दिली आहे. रुग्णालयातून त्यांनी थेट राज्याची विधानसभा गाठत गोव्याचा अर्थसंकल्पही सादर केला.

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा मनोहर पर्रीकर

गेल्या आठ दिवसांपासून पर्रीकर यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना स्वादुपिंडाचा विकार जडल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.

सुटी मिळाल्यावर गुरुवारी सकाळी ते विशेष विमानाने गोव्यात दाखल झाले. गोव्याचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी अर्थसंकल्प तयार केला होता. पण गेल्या बुधवारी अचानक प्रकृती बिघडल्यामुळे ते पहिले तीन दिवस अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उपस्थित राहू शकले नाहीत.

4. रोटोमॅकच्या विक्रम कोठारींना अटक

चार दिवसांच्या चौकशीनंतर रोटोमॅक कंपनीचे अध्यक्ष विक्रम कोठारी आणि त्यांचा मुलगा राहुल कोठारी यांना 3,695 कोटींचं कर्ज बुडवल्याप्रकरणी सीबीआयनं अटक केली आहे.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार कानपूरमध्ये गेले चार दिवस त्यांची चौकशी सुरू होती. पण चौकशीत सहकार्य न केल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे.

कोठारी यांनी सात बँकांकडून 3,695 कोटींचं कर्ज घेतलं होतं, मात्र त्याची परतफेड केली नव्हती. त्यामुळे CBIने रोटोमॅक ग्लोबल प्रा. लि., विक्रम कोठारी यांच्यासह त्यांच्या पत्नी साधना आणि मुलगा राहुल यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.

5. मेट्रोच्या भुयारात कुजलेला मृतदेह सापडला

दिल्ली मेट्रोच्या एअरपोर्ट एक्सप्रेसलाईनच्या भुयारात एका कुजलेला मृतदेह सापडला आहे. पोलिसांच्या मते हा मृतदेह तिथे तीन ते चार महिन्यांपासून असावा, कारण घटनास्थळी फक्त हाडं सापडली आहेत.

हिदुस्तान टाईम्सने हे वृत्त दिलं आहे.

Image copyright CHANDAN KHANNA
प्रतिमा मथळा दिल्ली मेट्रो

अतिशय सुरक्षित मानल्या जाणाऱ्या दिल्ली मेट्रोच्या भुयारात ही व्यक्ती कशी पोहोचली, यावर अनेक तर्क लावण्यात येत आहेत.

कुणीतरी या व्यक्तीला मारून त्याला तिथेच सोडून दिलं, किंवा ही व्यक्तीच तिथे काहीतरी चोरण्यास गेली तेव्हा इमरजन्सी शाफ्टमध्ये अडकून मेली, असे संशय या वृत्तात व्यक्त करण्यात आले आहेत.

दिल्ली मेट्रोच्या एखाद्या कर्मचाऱ्याचा हात असण्याची शक्यताही या वृत्तात वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)