सुनंदा पुष्कर यांच्याबद्दल या 13 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत?

सुनंदा पुष्कर

फोटो स्रोत, PRAKASH SINGH

सुनंदा पुष्कर यांच्या आत्महत्या प्रकरणाशी काँग्रेस नेते व खासदार शशि थरूर यांचा संबंध नाही, असं म्हणत दिल्लीच्या विशेष न्यायालयाने थरूर यांच्यावरील आरोप रद्दबातल केले आहेत.

हे प्रकरण गेली साडेसात वर्षांपासून सतत चर्चेत होतं. शशि थरूर यांना या प्रकरणामुळे विशेष अडचणींना तोंड द्यावं लागलं होतं.

पण सुनंदा पुष्कर कोण आहेत, याची माहिती बऱ्याच वाचकांना नाही. जाणून घ्या सुनंदा पुष्कर यांच्याविषयी...

सुनंदा पुष्कर कोण होत्या?

1. सुनंदा पुष्कर यांचा जन्म 1 जानेवारी 1962 साली झाला होता. त्या भारत प्रशासित काश्मीरमधील सोपोरमध्ये राहणाऱ्या होत्या. त्यांचे वडील पी. एन. दास भारतीय लष्करात वरिष्ठ अधिकारी होते.

2. सुनंदा यांनी श्रीनगरच्या गर्व्हनमेंट कॉलेज फॉर वुमन मधून पदवी घेतली होती. शशी थरूर यांच्याशी त्यांचं तिसरं लग्न होतं. दुसऱ्या लग्नातून त्यांना 21 वर्षांचा एक मुलगा आहे.

3. सुनंदा पुष्कर यांचं नाव पहिल्यांदा एप्रिल 2010 मध्ये इंडियन प्रीमिअर लीगच्या कोची टीमच्या खरेदी प्रकरणातल्या एका विवादामुळे समोर आलं होतं.

IPL चा वाद

4. या टीमच्या खरेदीमध्ये शशी थरूर यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. प्रकरण इतकं मोठं झालं की, थरूर यांना केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. नंतर पुन्हा त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता.

5. या वादानंतर कोची संघातून सुनंदा पुष्कर यांना त्यांची भागीदारी काढून घ्यावी लागली होती. त्याआधी त्या दुबईच्या एका कंपनीत काम करत होत्या.

सुनंदा पुष्कर

फोटो स्रोत, STRDEL

6. त्याचवेळी शशी थरूर यांनी सुनंदा यांच्याबरोबर असलेल्या नात्याची कबुली दिली होती. नंतर 2010 मध्ये ते विवाहबद्ध झाले होते.

50 कोटीची गर्लफ्रेंड

7. ऑक्टोबर 2012 मध्ये हिमाचल प्रदेशात एका निवडणूक प्रचार सभेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (तेव्हाचे गुजरातचे मुख्यमंत्री) यांनी सुनंदा यांना 50 कोटींची गर्लफ्रेंड म्हटलं होतं. या वक्तव्याची राजकीय वर्तुळात तसंच सोशल मीडियात मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती.

8. त्याच्या उत्तरात शशी थरूर यांनी ट्विटरच्या माध्यमातून मोदी यांना सल्ला दिला होता की प्रेमाची किंमत नसते. त्यानंतरही शशी थरूर आणि सुनंदा यांच्यावर भाजपच्या नेत्यांनी सतत टीका केली होती.

9. भाजपचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रीय प्रवक्ते मुख्तार अब्बास नकवी यांनी शशी थरूर यांना 'लव गुरू' अशी उपाधी दिली होती. प्रेम मंत्रालय सुरू झालं तर त्याचं मंत्रिपद थरूर यांना द्यावं असं वक्तव्य त्यांनी केलं होतं.

कलम 370

10. डिसेंबर 2013 साली सुनंदा पुष्कर यांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पाठिंबा दिला होता. तेव्हा कलम 370 चा पुर्नविचार करायला हवा असं वक्तव्य केलं होतं. कलम 370 नुसार जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा मिळाला आहे.

सर्वोच्च न्यायालय

फोटो स्रोत, Getty Images

11. एका टीव्ही चॅनलला मुलाखत देताना त्या म्हणाल्या, "संविधानातल्या 370 व्या कलमाचा पुर्नविचार होण्याची गरज आहे, कारण महिलांबरोबर भेदभाव होत आहे. काश्मीरमध्ये माझ्या मित्रमैत्रिणींनी सांगितलं की, कोणत्याही गैरकाश्मिरी व्यक्तीशी लग्न केल्यावर आम्हाला सरकारी नोकरी मिळत नाही. ज्या मुली काश्मीरच्या नसतात पण काश्मिरी कुटुंबात लग्न करतात, त्यांना सरकारी नोकरी मिळते आणि त्यांच्या मुलांना सगळे अधिकार मिळतात."

अनेक अनुत्तरित प्रश्न

12. 15 जानेवारी 2014 ला अचानक शशी थरूर आणि सुनंदा पुष्कर यांच्या नात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. शशी थरूर यांच्या ट्विटर अकाऊंटवरून पाकिस्तानच्या पत्रकार मेहेर तरार यांना केलेले काही ट्वीटस समोर आले. सुनंदा यांना त्यांच्यात काही नातं आहे, असा संशय होता.

13. त्यानंतर थरूर यांनी त्यांचं अकाऊंट हॅक झाल्याचं ट्वीट केलं. तसंच पाकिस्तानी पत्रकार मेहेर तरार यांनी कोणत्याही संबंध नसल्याचं सांगितलं होतं. वाद जेव्हा जास्त वाढला तेव्हा थरूर आणि सुनंदा यांनी "आमचं वैवाहिक जीवन उत्तम सुरू आहे आणि ते असंच सुरू रहावं अशी आमची इच्छा आहे," असं एक संयुक्त निवेदन जाहीर केलं होतं.

हे वाचलं आहे का?

हे पाहिलं आहे का?

व्हीडिओ कॅप्शन,

पाहा व्हीडिओ : नागालँडच्या राजकीय तळ्यातला सर्वांत मोठा मासा कोण ठरणार?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)