दृष्टिकोन : कमल हसन आणि रजनीकांत एकत्र का येऊ शकणार नाहीत?

  • थंगवेल अपाची
  • संपादक, बीबीसी तामिळ
कमल हसन

फोटो स्रोत, TWITTER/KAMAL HAASAN

दाक्षिणात्य अभिनेते कमल हसन यांनी बुधवारी मदुराईमध्ये त्यांच्या नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली आणि पक्षाच्या झेंड्याचंही अनावरण केलं.

'मक्कळ नीदी मय्यम' असं कमल हसन यांच्या नव्या पक्षाचं नाव आहे. ज्याचा अर्थ आहे 'जन न्याय केंद्र'.

एका भव्य समारंभात कमल हसन यांनी जेव्हा आपल्या समर्थकांसमोर त्यांच्या पक्षाचं 'व्हिजन' मांडलं, तेव्हा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही व्यासपीठावर उपस्थित होते.

गेल्या काही दिवसांत हसन आणि केजरीवाल यांच्यातली जवळीक ही अनेकदा समोर आली आहे.

कमल आणि रजनी एकत्र येणं शक्य आहे का?

कमल हसन यांच्या राजकारणातल्या प्रवेशानंतर राजकीय विश्लेषकांना आता एक गहन प्रश्न पडला आहे.

कारण, सिनेमाच्या वाटेवरून राजकीय दुनियेत उतरण्याची घोषणा सुपरस्टार दाक्षिणात्य अभिनेते रजनीकांत यांनी देखील केली आहे.

त्यामुळे भविष्यात रजनीकांत आणि कमल हसन यांच्या राजकीय वाटा एकत्र येणार का, हा प्रश्न अनेकांना पडू लागला आहे.

कमल हसन यांचे प्रशंसक त्यांना 'उलगा नायगन' म्हणजेच 'दुनियेचा हिरो' म्हणून संबोधतात. तर, रजनीकांत यांचे चाहते त्यांना 'थलाईवा' म्हणजेच 'बॉस किंवा नेता' म्हणतात.

फोटो स्रोत, TWITTER/KAMAL HAASAN

कमल हसन आणि रजनीकांत ही जोडी राजकारणात एकत्र आली, तर तिथल्या राजकारणाचा चेहरा बदलू शकतात.

या आधीच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनामुळे तामिळनाडूच्या राजकारणात एक पोकळी निर्माण झाली आहे. तसंच, माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांच्या वाढत्या वयामुळे ते राजकारणात सक्रीय नाहीत.

अनेक वर्षांपासून तामिळनाडूच्या राजकारणाचा चेहरा ठरलेल्या या दोघांची जागा घेण्यास सध्या तरी कोणी तयार दिसत नाही.

एकत्र येणं अशक्य

मात्र, कमल हसन आणि रजनीकांत यांचं एकत्र येणं सोपं नाही. दोन्ही अभिनेते अनेक दशकांपासून सक्रीय आहेत. पण, त्यांनी सोबत एक-दोनच चित्रपट केले आहेत.

राजकारणात येण्याची दोघांची कल्पना चांगली आहे. पण, ते एकत्र येतील कसे? मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडण्यास कोण तयार होईल? कमल हसनसाठी रजनीकांत खुर्ची सोडतील? का कमल त्यांच्यासाठी खुर्ची सोडायला तयार होतील? हा सत्तेचा विषय आहे. त्यामुळे कोणी कोणासाठी खुर्चीचा दावा सोडणार नाही.

फोटो स्रोत, PTI

राजकारणाबद्दल दोघांच्या दृष्टीकोनातही बरचसं अंतर आहे. कमल हसन यांचा भर द्रविडी राजकारणावर आहे. द्रविडी विचारधारेच्या अनुषंगानेच वाटचाल करण्याचे कमल हसन यांनी निश्चित केले आहे.

रजनीकांत भाजपसोबत जाणार?

दुसरीकडे रजनीकांत यांचा दृष्टीकोन वेगळाच आहे. त्यांची निती वेगळी आहे. त्यांचा कल उजवी विचारसरणी आणि हिंदुत्वाकडे आहे. 'अध्यात्मिक राजकारण' करणार असं रजनीकांत यांनी जाहीरपणे यापूर्वीच स्पष्ट केलं आहे.

रजनीकांत यांचा हा कल उजव्या राजकारणाशी मिळता-जुळता आहे. त्यामुळे, रजनीकांत आणि भाजप यांच्यात आघाडी होऊ शकते. भाजपचेही असेच प्रयत्न चालल्याचं दिसत आहे.

रजनीकांत राजकारणात येण्याआधी भाजपनं AIADMK यांच्यासोबत जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, रजनीकांत यांच्या घोषणेनंतर भाजपनं AIADMKपासून दूर राहणंच पसंत केलं आहे.

मेहनत करावी लागेल

कमल हसन यांचे विचार आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या जास्त जवळ जाणारे आहेत. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू त्यांचे मित्र आहेत.

पण कमल हसन आणि रजनीकांत हे जयललिता आणि एम. करुणानिधी यांच्या वोट बँकांना लक्ष्य करून पुढे जातील का? हे आताच सांगणं अवघड आहे. जेव्हा दोघांच्या भूमिका समोर येतील तेव्हाच याबाबत ठोस काहीतरी सांगता येईल.

फोटो स्रोत, Getty Images

यात एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की, कमल हसन आणि रजनीकांत या दोघांनाही राजकारणात यश मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागणार आहे. कारण, सुपरस्टार असण्याची प्रतिमा राजकारणात एका ठराविक मर्यादेपर्यंतच फायदा मिळवून देते.

राजकारणात कितपत फिट?

एम.जी. रामचंद्रन यांच्या करिष्म्याची गोष्ट वेगळी होती. त्यांचं साम्राज्य जयललिता यांनी सांभाळलं. त्यानंतर चित्रपटांतून राजकारणाकडे वळण्याचा अनेकांनी निर्णय घेतला. शिवाजी गणेशन यांनी देखील राजकीय पक्षाची स्थापना केली होती. मात्र, कोणालाच फारसं यश मिळालं नाही. तसंच, कोणाचं राजकीय करिअर फारसं चाललं नाही.

यशस्वी होण्यासाठी वय हा देखील महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. कमल हसन वयाच्या साठीकडे वाटचाल करत आहेत, तर रजनीकांत यांचा प्रवास सत्तरीकडे सुरू आहे.

कमल हसन सध्या ठणठणीत आहेत. तर, गेल्या वर्षी रजनीकांत यांना आरोग्याच्या समस्येशी झगडावं लागलं होतं.

फोटो स्रोत, IMRAN QURESHI

फोटो कॅप्शन,

जयललिता आणि एम. जी. रामचंद्रन.

काही वर्षांपूर्वी रजनीकांत यांना सिंगापूरच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तसंच, राजकारणात खूप दबाव सहन करावा लागतो आणि निवडणुकीतही दबावाचा सामना करावा लागतो. या सगळ्यांत ते पक्षाला पुढे कसं नेतील हे बघावं लागणार आहे.

पक्षाचा मुख्य नेता आघाडीवरून दूर झाला तर संपूर्ण पक्षच अडचणीत सापडतो.

हे वाचलंत का?

हे पाहिलं आहे का?

व्हीडिओ कॅप्शन,

पाहा व्हीडिओ : नागालँडच्या राजकीय तळ्यातला सर्वांत मोठा मासा कोण ठरणार?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)