दोन किलो ओझं डोक्यावरून दूर होतं तेव्हा... जगातील सर्वांत मोठा ब्रेन ट्युमर काढण्याची शस्त्रक्रिया

संतलाल यांच्या मेंदूतल्या ट्यूमरचे वजन 1 किलो 873 ग्रॅम इतके होते. Image copyright BBC/PRASHANT NANAWARE
प्रतिमा मथळा संतलाल यांच्या मेंदूतल्या ट्यूमरचे वजन 1 किलो 873 ग्रॅम इतके होते.

डोक्यावरचं भले मोठं ओझं हटणे म्हणजे नेमके काय असतं याचा तंतोतंत अनुभव सध्या संतलाल पाल घेत आहेत. उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्यातल्या संतलाल यांच्या मेंदूत तब्बल पावणे दोन किलोचा ट्युमर तयार झाला होता. हा ट्युमर मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयात शस्त्रक्रिया करुन काढण्यात आला आहे.

एवढ्या मोठ्या आकाराचा ट्युमर काढण्याची जगातली ही पहिलीच घटना आहे, असा दावा केला जात आहे. मोलमजुरी करून पोट भरणारे 30 वर्षीय संतलाल यांच्या मेंदूत गेल्या 9 महिन्यांयापासून ट्युमर वाढण्यास सुरुवात झाली.

संतलालच्या पत्नी मंजू पाल यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "यांच्या पायात 4 वर्षांपूर्वी ट्युमर तयार झाला होता. त्यावर आम्ही अलाहाबादच्या रुग्णालयात उपचार घेतले. उपचारानंतर पायातील ट्युमर हळूहळू कमी झाला. पण गेल्या 9 महिन्यांपासून त्यांच्या मेंदूमध्ये ट्युमर वाढण्यास सुरुवात झाली. त्यावर अलाहाबादमध्ये उपचार होऊ शकत नव्हते म्हणून आम्ही मुंबईची वाट धरली."

ही अवघड शस्त्रक्रिया कशी साध्य केली यासंदर्भात नायर रुग्णालयाच्या न्युरोसर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. त्रिमूर्ती नाडकर्णी यांच्याशी बीबीसी मराठीनं संवाद साधला.

ट्यूमरचं वजन 1 किलो 873 ग्रॅम

संतलाल यांच्या मेंदूतल्या ट्यूमरचे वजन 1 किलो 873 ग्रॅम इतके होते. त्यामुळे ट्युमरचा आकार इतका मोठा झाला होता की संतलाल यांच्या डोक्यावर आणखी एक डोकं तयार झालं होतं.

Image copyright BBC/PRASHANT NANAWARE
प्रतिमा मथळा या ट्युमरमुळे संतलाल यांची दृष्टी अतिशय कमी झाली आहे.

इतका मोठा ट्युमर काढणं हे एक आव्हानात्मक काम होते. पण नायर रुग्णालयाच्या न्युरोसर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. त्रिमूर्ती नाडकर्णी यांनी हे आव्हान स्वीकारलं.

"एवढ्या मोठ्या आकाराचा ट्युमर काढण्याची ही पहिलीच वेळ आहे. रुग्णाच्या जीवाला अशा शस्त्रक्रियेमध्ये धोका असतो. मात्र संतलाल यांची या त्रासातून सुटका करण्यासाठी हे आव्हान स्वीकारणे गरजेचे होते. तब्बल सात तास ही शस्त्रक्रिया सुरु होती. अकरा बाटल्या रक्त रुग्णाला पुरवावे लागले. अखेर अथक प्रयत्नानंतर हा प्रचंड मोठ्या आकाराचा ट्युमर काढण्यात आम्हाला यश आले," संतलाल यांच्यावरील शस्त्रक्रियेविषयी डॉ. त्रिमूर्ती नाडकर्णी सांगतात.

डॉ. नाडकर्णी पुढे सांगतात, "या ट्युमरमुळे संतलाल यांची दृष्टी अतिशय कमी झाली आहे. त्यांना सध्या काहीही दिसत नाही. मात्र आमची अपेक्षा आहे की आता त्यांची दृष्टी पुन्हा पूर्ववत होऊ शकेल."

'शस्त्रक्रियेमुळे मला आता हलकं वाटतं'

स्वत: संतलाल यांच्यासाठी या शस्त्रक्रियेनं मोठा दिलासा मिळाला आहे. बीबीसीशी बोलताना संतलाल म्हणाले, "या शस्त्रक्रियेमुळे मला आता हलके हलके वाटत आहे. अगोदर डोके खूप जड वाटायचे, डोके खूप दुखायचे. आता खूप बरं वाटतंय", असं ते म्हणाले.

Image copyright BBC/PRASHANT NANAWARE
प्रतिमा मथळा गेल्या 9 महिन्यांपासून ट्युमर वाढण्यास सुरुवात झाली होती.

अतिशय गरीब असलेल्या संतलाल यांना ही शस्त्रक्रिया खासगी रुग्णालयात करणं कदाचित परवडू शकलं नसतं. नायर रुग्णालय हे मुंबई महापालिकेचं रुग्णालय असल्यानं इथे नाममात्र दरात ही शस्त्रक्रिया शक्य झाली आहे, अशी माहिती मिळाली.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)