#5 मोठ्याबातम्या : राजस्थानाच्या आमदारांना वाटते भुतांची भीती!

rajassembly Image copyright rajassembly.nic.in

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. राजस्थानात विधानभवनाला भुतांनी झपाटले?

राजस्थानच्या विधानसभेला भुतांनी झपाटले असल्याच तिथल्या आमदारांचं मत बनलं आहे. या 'भुतां'पासून रक्षण करावे, अशी मागणी करत आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली आहे. एवढंच नव्हे, गुरुवारी विधानमंडळाच्या प्रवेशद्वारावर भुताचा प्रभाव घालवण्यासाठी पुजारी विधी करताना पाहायला मिळाले!

'लोकमत'नं दिलेल्या वृत्तानुसार, राजस्थान विधानसभा एकूण २०० सदस्यांची आहे. परंतु गेली अनेक वर्षे एकाच वेळी २०० आमदारांची संख्या पूर्ण झालेली नाही. राजीनामा, आकस्मिक निधन किंवा खटल्यात शिक्षा झाल्याने तुरुंगात रवानगी यामुळे सभागृहात एका वेळी २00 आमदार कधीच नसतात. विधान भवनावर भुतांचा प्रभाव असल्यानेच हे होत आहे, अशी बहुतांश आमदारांची धारणा बनली आहे. आमदार हबिबूर रहमान म्हणतात की, "विधान भवनाआधी ही जागा अंत्यसंस्कारासाठी तसेच कबर बांधण्यासाठी वापरली जात असे. अशा ठिकाणी भुते भटकत असतात."

मंगळवारी भाजप आमदार कल्याणसिंह चौहान यांचा मृत्यू झाल्यानं सारेच आमदार घाबरले. या आमदारांनी यावर उपाययोजना करण्याची मागणी सुरू केली. नुकतंच आमदार कीर्ती कुमारी यांचं निधन झालं. त्याआधी बसपचे आमदार बी. एल. कुशवाह यांना तुरुंगात जावं लागलं आहे. तर, काँग्रेस आमदार महिपाल मदरेना, मलखन सिंग बिष्णोई व बाबूलाल नागर यांनाही तुरुंगात जावं लागलं. त्यामुळे आमदारांच्या मानेवर अंधश्रद्धेचं भूत आणखी घट्ट बसलं! असं या वृत्तात म्हटलं आहे.

2. केजरीवालांचं घर पोलिसांनी पिंजून काढलं

दिल्लीचे मुख्य सचिव अंशू प्रकाश यांना मारहाण केल्याप्रकरणी 'आप'च्या आमदारांना अटक केल्यानंतर पुरावे शोधण्यासाठी दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराची झडती घेतली. केजरीवाल यांच्या घरातील २० तारखेचे सीसीटीव्ही फुटेज देण्यात यावेत, असं सांगितलं होतं. पण त्यांच्याकडून कोणतंही उत्तर मिळालं नाही. त्यामुळं झडती घ्यावी लागली, असं पोलिसांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्र्यांच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतील वेळ ४० मिनिटे ४२ सेकंद मागे होती, असं तपासातून समोर आलं आहे, अशी माहितीही पोलिसांनी दिली.

Image copyright Getty Images

'महाराष्ट्र टाइम्स'मधील बातमीनुसार, अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या माहितीनुसार, केजरीवाल यांच्या घरातील सीसीटीव्ही फुटेज मागितले होते. पण त्यावर कोणतंही उत्तर मिळालं नाही. त्यामुळंच त्यांच्या घराची झडती घ्यावी लागली. याशिवाय घटनास्थळाची पाहणी करायची होती. 'केजरीवाल यांच्या घरात एकूण २१ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यातील १४ कॅमेरे कार्यान्वित आहेत. उर्वरित कॅमेरे कार्यान्वित का नाहीत, याची चौकशी केली जाईल,' असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

मुख्य सचिवांना ज्या ठिकाणी मारहाण झाली, तेथे सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. ड्रॉइंग रुमबाहेर आणि कॉरिडोरमध्ये कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यातील फुटेज तपासण्यात येतील, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.

3. आदिवासी तरूणाच्या हत्येवरुन केरळमध्ये असंतोष

केरलमधील कडूकुम्न्ना येथील 27 वर्षीय आदिवासी तरूण ए मधू याला चोरीच्या आरोपावरुन काही लोकांनी गुरुवारी जंगलात पकडले. तेथेच त्याला मारहाण झाली. त्यात, या युवकाला गंभीर स्वरूपाची इजा झाली. त्याचा हॉस्पिटलला नेण्यापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेचे केरळमध्ये जोरदार पडसाद उमटले.

'इंडियन एक्सप्रेस'नं दिलेल्या बातमीनुसार, तीन दिवसांपूर्वी या तरुणानं खाण्याचं काही सामान आणि तांदूळ चोरण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप करत मधूला लोकांनी दोरीने बांधले. त्याला लाथा-बुक्क्यांनी मारले. काहींनी त्यावेळी सेल्फीही काढले.

पोलिसांनी या प्रकरणात 15 लोकांवर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोस्टमार्टम रिपोर्टनंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मधू हा मानसिक रुग्ण होता. तो जंगलात राहत होता. त्याचा कुटुंबातील इतर व्यक्तींशी संपर्क नव्हता.

4. पीएनबी घोटाळ्यावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया

पंजाब नॅशनल बँकेतील ११,४०० कोटींचा घोटाळा उघड झाल्यानंतर एका आठवड्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. जनतेचा पैसा लुटणाऱ्यांना सरकार माफ करणार नाही. सरकार आर्थिक विषयांशी संबंधीत अनियमिततेविरोधात मोठी कारवाई करत असून भविष्यातही करत राहणार आहे, असे पंतप्रधानांनी शुक्रवारी सांगितले. ET ग्लोबल बिजनेस समिटमध्ये ते बोलत होते. पीएनबी घोटाळ्याचा त्यांनी प्रत्यक्ष उल्लेख केलेला नसला तरी याच मुद्यावर ते बोलल्याचे स्पष्ट होते.

Image copyright AFP

'लोकसत्ता'च्या बातमीत, पंतप्रधानांनी नाव न घेता रिझर्व्ह बँकेलाही गर्भीत संदेश दिल्याचे म्हटले आहे. मोदी म्हणाले, विविध आर्थिक संस्था आणि संघटनांमध्ये नियम आणि नैतिकता तपासण्याची जबाबदारी ज्यांच्यावर सोपवण्यात आली आहे, त्यांनी पूर्ण निष्ठेने आपली जबाबदारी पार पाडायला हवी. यापूर्वी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी देखील निरीक्षण संस्था आणि लेखापालांच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित केले होते.

5. मृत बाळ प्रयोगशाळेला दान

नऊ महिने पोटात वाढवलेल्या पोटच्या गोळ्याचा जन्मत:च मृत्यू झाल्यानंतर त्या चिमुकलीचा मृतदेह प्रयोगशाळेला दान करण्याचा निर्णय सोलापुरातल्या एका दाम्पत्यानं घेतला. अनुश्री आणि प्रसाद मोहिते असं या दाम्पत्याचं नाव आहे.

'न्यूज 18 लोकमत'नं दिलेल्या बातमीनुसार, सोलापुरातील युनिक हॉस्पिटलमध्ये अनुश्री यांच्या बाळाच्या हृदयाची वाढ न झाल्यानं ते पोटातच दगावले. अनुश्री आणि प्रसादला आठव्या महिन्यात त्यांच्या बाळाच्या हृदयाचा विकास झालेला नाही, बाळ जन्माला आल्यानंतर जास्त दिवस जगणार नाही, याची कल्पना डॉक्टरांनी आधीच दिली होती.

तिच्या देहावर संशोधन करून भविष्यकाळात इतर बाळांना 'तिचा'नक्कीच उपयोग होईल, अशी भावना आई अनुश्री आणि वडील प्रसाद मोहिते यांनी व्यक्त केली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)