#HerChoice : 'मी नवऱ्याला न सांगताच स्वतःची नसबंदी केली'

महिलेवर अत्याचार करणाऱ्या पुरुषाचं काल्पनिक चित्र

मी नवऱ्याशी यापूर्वीही खोटं बोलले होते. तेव्हा मला असं केल्याचे फायदे-तोटे समजत होते. पण आताचं खोटं बोलणं म्हणजे अंधाऱ्या विहिरीत उडी मारण्यासारखं आहे, याची मला जाणीव होती.

आधीची गोष्ट वेगळी होती. मी नवऱ्याला माझ्या पगाराचा आकडा कमी सांगितला होता. कारण, त्यामुळे मला काही पैसे साठवता आले आणि नवऱ्याला दारूत पैसे उडवण्यापासून रोखताही आलं होतं.

मला हे देखील माहिती होतं की, जर खोटं बोललेलं समजलं तर भरपूर मार मिळेल आणि डोळे सुजतील. मार खाल्ल्याने पोट दुखेल आणि कमरेवर वळही उठतील.

पण बँकेत फिक्स डिपॉझिटमध्ये काही पैसे होते आणि ते त्याला कधी काढता येणार नाहीत यामुळे मात्र मला जरा बरंही वाटत होतं.

मी ज्यांच्या घरी काम करत होते त्या मॅडमनी मला पैसे साठवण्याबद्दल समजावून सांगितलं होतं. नाहीतर बँकेत खातं उघडणं आणि पैसे जमा करणं माझ्यासारख्या गावाकडच्या मुलीला अशक्यच होतं.

आजही जे करायला चालले होते ते देखील माझ्या मॅडमनीच मला सांगितलं होतं. पण यावेळी खूप घाबरून गेले होते कारण यावेळची परिस्थिती वेगळी होती. यावेळी माझं शरीरच पणाला लागलं होतं. शिवाय मी असंही ऐकलं होतं की, या ऑपरेशनमध्ये मृत्यूही होऊ शकतो.


#HerChoice ही प्रचलित समजांना छेद देणाऱ्या आधुनिक भारतातील महिलांच्या कहाण्यांवर आधारित लेखमालिका आहे. बीबीसीची खास सीरिज #HerChoiceच्या माध्यमातून अशा 12 महिलांच्या सत्य घटना आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत आहोत.


आता रोजचं जगणंसुद्धा मरणासारखं भासू लागलं होतं. मी 22व्या वर्षीच चाळीशीची वाटू लागले होते. अंगाने बारीक होते पण तरुण काही वाटत नव्हते. माझं शरीर हाडांचा सापळाच बनलं होतं. डोळ्यांखाली काळी वर्तुळं झाली होती. चेहऱ्यावरचा गोडवा हरवून गेला होता आणि त्याची जागा थकव्याने घेतली होती. चालताना कमरेतून काहीशी वाकल्यासारखी दिसायचे.

पण हे सगळं माझं बाह्यरूप होतं. माझ्या आत जे विस्कटून गेलं होतं त्याची किंकाळी माझ्या कानात मलाच ऐकू येत होती.

सुरुवातीला मला काही चुकीचं वाटलं नव्हतं. 15व्या वर्षी लग्न होऊन मी शहरात आले होते. पती काम करून घरी यायचे आणि जेवायचे. जेवणानंतर त्यांना बिछान्यावर माझी गरज असायची. केवळ गरज.

मी फक्त एक शरीर होते. शरीरातल्या भावनांशी त्यांना काही घेणंदेणं नव्हतं. यापेक्षा कोणती वेगळी अपेक्षा नव्हती. कारण आईनं सांगितलं होतं की लग्नानंतर हेच सगळं होतं.

तिथपर्यंत ठीक होतं.

मग, पहिली मुलगी झाली.

मग, पहिली मारहाण झाली.

मग, त्यानं पहिल्यांदा दारू प्यायली.

मग, त्यानं बिछान्यात माझ्यावर सगळा राग काढला.

आणि नंतर दुसरी मुलगी झाली.

मग, त्यानं कामच करणं सोडून दिलं.

मी नोकरी करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर मला तिसरी मुलगी झाली.

मला मारहाण, माझ्या कमावलेल्या पैशावर दारू पिणं आणि बिछान्यात राक्षसाप्रमाणे माझ्या शरीराचा वापर करणं चालूच राहिलं.

पण मी मात्र गप्प होते. कारण बाईसोबत हेच सगळं होतं असं आईनं मला सांगितलं होतं.

चौथ्यांदा जेव्हा मी गरोदर होते तेव्हा माझं वय अवघं 20 वर्षं होतं. अर्धमेल्या माझ्या शरीराला पुन्हा मोठं होताना जेव्हा मॅडमनी पाहिलं तेव्हा त्या रागावल्या.

त्यांनी विचारलं, "बाळाला जन्म देऊ शकशील तरी का? एवढं रक्त आहे का तुझ्या शरीरात?"

मी म्हटलं, "होऊन जाईल."

मोठ्या घरातली ही बाई माझ्या जीवनाला काय समजून घेऊ शकेल, असा विचार माझ्या मनात आला. कारण, मुलगा होईपर्यंत मला हे सगळं सहनच करावं लागणार होतं.

बँकेत पैसे जमा करण्याचा सल्ला देणं ही वेगळी गोष्ट होती. पण माझ्या घरातल्या काही गोष्टी त्यांना समजण्यासारख्या नव्हत्या, असं मला वाटतं होतं.

मनातून वाटायचं की सगळं गुपचूप होऊन जाऊ दे. कोणाला कळूही नये की मी गरोदर आहे, माझं शरीरही बदलू नये, माझ्या आयुष्याची कहाणी अशी चारचौघांत येऊ नये, असं मला वाटत होतं.

मुलगा झाला तर सगळं ठीक होईल, असा माझा विश्वास होता. पतीकडून होणारी मारहाण, त्यांची दारू आणि बिछान्यातील अन्याय हे सगळं थांबून जाईल, असं मला वाटतं होतं.

आणि यावेळी खरंच मुलगा झाला.

हॉस्पिटलमध्ये जेव्हा नर्सनं येऊन सांगितलं, तेव्हा मी रडायलाच लागले.

9 महिन्यांपासून कमकुवत शरीरात बाळ सांभाळल्यामुळे आलेला थकवा आणि 10 तासांपासून सहन केलेलं दुःखं एका क्षणातच निघून गेलं.

पण मुलगा झाल्यानं पतीची वर्तणूक बदलेलं अस मला वाटलं होत. पण तसं काहीच झालं नाही. पूर्वीचे वाईट प्रकार सुरूच राहिले.

आता माझं काय चुकलं? आता तर मी मुलालाही जन्म दिला होता.

माझ्या नवऱ्याला राक्षस बनण्याची सवयच लागून गेली होती.

माझं शरीर आता पूर्ण तुटलं होतं. पुन्हा गरोदर होईन याची भीती आता मला सतत वाटू लागली होती.

एक दिवस माझ्या मॅडमनी माझा पडलेला चेहरा पाहून मला विचारलं की, जीवनात एक गोष्ट बदलायची असेल तर कोणती गोष्ट बदलशील?

मी हसले. माझ्या मनातल्या इच्छेबद्दल मी कोणाला अजून काही विचारलं नव्हतं.

पण, ही गोष्टी मी हसण्यात घालवली नाही. यावर खूप विचार केला. एक आठवड्यानंतर मॅडमना सांगितलं की, "माझं उत्तर तयार आहे."

तोपर्यंत बहुतेक त्या विसरूनही गेल्या होत्या. मी त्यांना सांगितलं, "मला परत आई व्हायचं नाही. पण, नवऱ्याला कसं थांबवू हे कळत नाही."

मी नवऱ्याला समजावण्याचा प्रयत्न केला. चार मुलांना खायला घालायला पैसे नाहीत हे देखील सांगितलं. पण, बिछान्यापासून दूर जाणं त्याला शक्य होत नव्हतं. माझ्या कमकुवत शरीराची त्याला काही फिकीर नव्हती आणि मुलांची जबाबदारीच त्यानं न घेतल्याने त्याला कोणतच गांभीर्य नव्हतं.

तेव्हा मॅडमनी मला नसबंदीचं ऑपरेशन करून घेण्याचा सल्ला दिला. त्या म्हणाल्या, "हे तुझ्या हातात आहे. तू त्याला रात्री अडवू शकणार नाहीस. परंतु स्वतःला गरोदर होण्यापासून वाचवू शकशील."

मला याबद्दल काही माहीत नव्हतं. खूप दिवस यात गेले. मला बरेच प्रश्न पडले होते. जेव्हा मॅडमना उत्तर देणं अवघड झालं तेव्हा त्यांनी मला एका क्लिनिकचा पत्ता दिला.

त्या क्लिनिकमध्ये माझ्यासारख्या अजून महिलाही होत्या. त्यांच्याकडून कळलं की, नसबंदीचं ऑपरेशन लवकर होऊन जातं. पण, काही गडबड झाली तर जीवही जाऊ शकतो.

काही महिन्यांच्या विचारानंतर एक दिवस नवरा आणि मुलांशी खोटं बोलून एकटीच या क्लिनिकमध्ये आले तेव्हा मनात फक्त याच गोष्टीची भीती दाटून आली होती.

पण, मी थकून गेले होते. भीती होती आणि हताशही झाले होते. हे करणं धोकादायक होतं. पण, याने माझ्या जीवनातली एक गोष्ट तरी माझ्या ताब्यात येणार होती.

अखेर माझं ऑपरेशन झालं आणि मी वाचले होते.

काही दिवस कमकुवतपणा वाटत होता आणि दुखतही होतं. नंतर सगळं ठीक झालं.

या गोष्टीला आता 10 वर्षं झाली. आता मी 32 वर्षांची झाले आहे. पण नंतर कधी आई झाले नाही.

माझ्या नवऱ्याला यात काही वेगळं आहे, असं वाटलंही नाही. त्याचं जीवन नशा, मारहाण आणि बिछान्यात आरामात जात आहे. त्याला या कशाचा फरक पडत नाही.

आणि मी, मला जे वाटतं तेच आता करते आहे. लोकांच्या घरी साफसफाई, भांडी घासणे ही काम करून त्यातल्या पैशातून मुलांना मोठं करते आहे.

नवऱ्याला सोडू शकत नाही. आईनं हेच सगळं सांगितलं होतं. त्याची सवय बदलू शकत नाही. म्हणून, या सगळ्याची सवय मी स्वतःलाच लावून घेतली आहे.

त्यानं स्वतःची काळजी घेतली नसली तरी मी स्वतःची थोडी काळजी घेतली याचा मला आनंद वाटतो.

माझं ऑपरेशन माझं गुपित आहे. हा असा निर्णय होता, जो मी स्वतःसाठी घेतला होता आणि त्याचा मला अभिमानही आहे.

(उत्तर भारतात राहणाऱ्या एका महिलेच्या आयुष्यातली ही खरी कहाणी आहे. या महिलेनं बीबीसीच्या प्रतिनिधी दिव्या आर्या यांना ही कहाणी स्वतः सांगितली आहे. या महिलेच्या विनंतीवरून तिचं नाव गुप्त ठेवण्यात आलं आहे.)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)