श्रीदेवींचा 54व्या वर्षी अचानक मृत्यू झाला तरी कसा?

  • भरत शर्मा
  • बीबीसी प्रतिनिधी
श्रीदेवी

फोटो स्रोत, TWITTER @SRIDEVIBKAPOOR

फोटो कॅप्शन,

श्रीदेवी

शनिवारी मध्यरात्रीनंतर जेव्हा भारत गाढ झोपेत होता, तेव्हा दुबईहून आलेल्या एका बातमीनं सगळ्यांची झोप उडवली.

ती बातमीच एवढी धक्कादायक होती की अनेकांचा त्यावर विश्वासच बसला नाही. अनेक जण तर ती अफवाच असावी असं म्हणत होते, तर इतर काही जण ती अफवाच ठरावी, अशी प्रार्थना करत होते.

पण काही वेळातच ही बातमी खरी असल्याचं समोर आलं. वयाच्या अवघ्या 54व्या वर्षी श्रीदेवी यांनी या जगाचा निरोप घेतला.

त्या दुबई इथं मोहित माहवाह या त्यांच्या भाच्याच्या लग्नाला गेल्या होत्या आणि तिथंच त्यांचं 'कार्डिअक अरेस्ट' झालं.

सडपातळ बांध्याच्या श्रीदेवींचं हृदय एकाएकी बंद पडेल असं कुणाला तरी वाटलं होतं का?

'कार्डिअॅक अरेस्ट' आहे तरी काय?

पण 'कार्डिअॅक अरेस्ट' असतं तरी काय? मानवी शरीरासाठी ते इतकं धोकादायक कसं असू शकतं आणि हार्ट फेल किंवा हृद्यविकाराच्या झटक्यापेक्षा ते वेगळं कसं असतं?

फोटो स्रोत, iStock

Heart.org या संस्थेनुसार 'कार्डिअॅक अरेस्ट' होतं आणि शरीराकडून त्याविषयी कुठलाही संकेत मिळत नाही.

याचं मुख्य कारण हृदयात होणारी इलेक्ट्रिकल गडबड आहे, जी हृद्याच्या ठोक्यांचं ताळमेळ बिघडवते.

यामुळे हृदयाच्या रक्त पंप करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो आणि त्यामुळे मेंदू किंवा इतर अवयवांपर्यंत रक्त पोहोचवण्यात अडथळे निर्माण होतात.

अशा वेळी काही क्षणांतच व्यक्ती बेशुद्ध पडते आणि हृदयाचे ठोकेही मंदावत जातात. जर योग्य वेळी योग्य उपचार मिळाले नाहीत, तर काही सेकंदांत किंवा मिनिटांमध्ये व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो.

'कार्डिअॅक अरेस्ट'मध्ये मृत्यू नक्की?

अमेरिकेत प्रॅक्टिस करत असलेले डॉक्टर सौरभ बंसल यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं, "खरं तर कार्डिअक अरेस्ट हा प्रत्येक मृत्यूचा अंतिम क्षण म्हटला जाऊ शकतो. याचा अर्थ आहे हृदयाचे ठोके बंद पडणे आणि मृत्यूचं कारणही हेच असते."

फोटो स्रोत, iStock

पण याचं कारण काय असावं?

डॉक्टर बंसल म्हणतात, "याची वेगवेगळी कारणं असू शकतात. सामान्यपणे याचं एक प्रमुख कारण हे मोठा हार्टअटॅक असू शकतं"

पण श्रीदेवींना हार्टअटॅक का आला असावा? "वयाच्या 54व्या वर्षी जीवघेणा हार्टअटॅक येण्याचा धोका कमी असतो. कदाचित आधीपासूनच त्यांना आरोग्याच्या इतर समस्याही असतील. पण त्याविषयी सध्या अधिक माहिती उपलब्ध नाही."

ब्रिटिश हार्ट फाउंडेशनुसार, हृदयातील इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये अडचणी उद्भवल्यानंतर शरीराच्या इतर भागांत रक्तपुरवठा होऊ शकत नाही आणि हीच प्रक्रिया कार्डिअॅक अरेस्टचं स्वरूप घेते.

जेव्हा हृदय रक्ताचं पंपिंग बंद करतं, तेव्हा मेंदूतील ऑक्सिजनचं प्रणाणही घटतं. अशावेळी व्यक्ती बेशुद्ध पडते आणि श्वास घेता येत नाही.

याची काही लक्षणं असतात का?

सगळ्यांत मोठी अडचण हीच आहे की, कार्डिअॅक अरेस्ट येण्याआधी त्याची काहीच लक्षणं दिसत नाही. हेच कारण आहे की, कार्डिअॅक अरेस्टमध्ये मृत्यू येण्याचा धोका कैक पटींनी वाढतो.

फोटो स्रोत, iStock

यात सर्वसाधारण कारण हे असामान्य हार्ट ऱ्हिदम असल्याचं म्हटलं जातं. ज्याला विज्ञानाच्या भाषेत 'वँट्रिकुलर फिब्रिलेशन' म्हटलं जातं. कार्डिअॅक अरेस्टची अनेक कारणं असू शकतात. पण हृदयविकाराशी निगडीत आरोग्य समस्या याविषयीची शक्यता वाढवतात :

- कोरोनरी हार्टचा आजार

- हार्ट अटॅक

- कार्डियोमायोपॅथी

- काँजेनिटल हार्टचा अजार

- हार्ट वॉल्वमधील अडथळे

- हार्ट मसल्समधील इन्फ्लेमेशन

- लाँग क्युटी सिंड्रोमसारखे डिसऑर्डर

याशिवाय इतरही काही कारणं आहेत, जे कार्डिअॅक अरेस्टला निमंत्रण देऊ शकतात :

- विजेचा झटका बसणं

- प्रमाणापेक्षा जास्त ड्रग्ज घेणं

- हॅमरेज, ज्यात रक्तस्राव होतो

- पाण्यात बुडणं

यातून वाचणं शक्य आहे का?

पण कार्डिअॅक अरेस्ट झाल्यानंतर माणूस बरा होऊ शकतो का? होयं, अनेकवेळा छातीवर इलेक्ट्रिक शॉक देऊन बंद पडलेलं हृदय सुरू करता येऊ शकतं. यासाठी डिफिब्रिलेटर नावाचं टूल वापरलं जातं.

फोटो स्रोत, iStock

मोठ्या रुग्णालयांमध्ये ते उपलब्ध असतं. यात मुख्य मशीन आणि शॉक देण्यासाठीचे बेस असतात, ज्यांना छातीवर दाबून अरेस्टपासून वाचवण्याचे प्रयत्न केले जातात.

पण कार्डिअॅक अरेस्ट झाल्यानंतर जवळपास डिफिब्रिलेटर नसेल तर काय करायचं?

याचं उत्तर आहे - CPR. याचा अर्थ आहे, कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन. यात दोन्ही हात सरळ ठेऊन रुग्णाच्या छातीवर जोराने दबाव टाकला जातो आणि तोंडावाटे श्वास देण्याचा प्रयत्न केला जातो.

हार्टअटॅकपेक्षा वेगळं कसं?

बहुतांश लोक कार्डिअॅक अरेस्ट आणि हार्टअटॅक हे एकच असल्याचं समजतात. पण हे खरं नाही. दोन्ही गोष्टींमध्ये फार फरक आहे. हार्टअटॅक तेव्हा येतो जेव्हा कोरोनरी आर्टरीमध्ये गुठळ्या तयार झाल्यानं हृदयापर्यंत रक्तपुरवठा होण्यात अडथळे येतात.

फोटो स्रोत, iStock

तर दुसरीकडे कार्डिअॅक अरेस्टमध्ये हृदय रक्तपुरवठा करणं तत्काळ थांबवतं. म्हणूनच अरेस्ट झाल्यावर व्यक्ती अचानक बेशूद्ध पडते आणि श्वासोश्वासही बंद पडतो.

याच कारण काय असू शकतं?

डॉक्टर बंसल सांगतात, "कार्डिअॅक अरेस्टचा अर्थ आहे हृदयाचे ठोके बंद पडणे आणि हार्टअटॅकचा अर्थ आहे हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा न होऊ शकणे."

फोटो स्रोत, TWITTER@SRIDEVIBKAPOOR

पुढे ते म्हणतात, "हो, हेही आहेच की रक्तपुरवठा न झाल्यानंही पुढे कार्डिअॅक अरेस्टच होईल. रक्ताची एक गुठळी कार्डिअॅक अॅरेस्टसाठीचं कारण ठरू शकते."

"हृदयाच्या आजूबाजूला असलेल्या द्रव्यांमध्ये इन्फेक्शन झाल्यामुळेही कार्डिअॅक अरेस्ट होऊ शकतं. श्रीदेवींचं कार्डिअॅक अरेस्ट का झालं यामागची कारणं दुबईतील डॉक्टर कदाचित शोधत असतील."

हार्टअटॅकमध्ये वाचणं सोपं?

हार्टअटॅकमध्ये आर्टरीचा रस्ता रोखला गेल्यानं ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा मेंदूपर्यंत पोहोचू शकत नाही. जर रस्त्यातील अडथळा तत्काळ बाजूला केला गेला नाही, तर हृदयाचं नुकसान व्हायला सुरुवात होते. हार्टअटॅकमध्ये उपचार मिळण्यात जेवढा उशीर होईल, तेवढं हृदय आणि शरीराचं नुकसान ठरलेलं असतं.

फोटो स्रोत, iStock

हार्ट अटॅक आल्यानंतर हळूहळू जाणवू लागतात. कार्डिअॅक अरेस्टप्रमाणे हार्टअटॅकमध्ये हृदयाचे ठोके बंद पडत नाहीत. त्यामुळेच कार्डिअॅक अॅरेस्टच्या तुलनेत हार्टअटॅकमध्ये रुग्णांना वाचवलं जाण्याची शक्यता जास्त असते.

खरी अडचण ही आहे की वेळीच इलाज झाला नाही, तर हार्टअटॅकच्या दरम्यान कार्डिअॅक अॅरेस्ट होऊ शकतं.

मृत्यूचं मोठं कारण

नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन (NCBI) या संस्थेनुसार दरवर्षी हृदयाशी संबंधित आजारांमुळे जगातील सुमारे 1.7 कोटी लोकांचा मृत्यू होतो. हे एकूण मृत्यूंच्या 30 टक्के इतकं प्रमाण आहे. विकसनशील देशांमध्ये HIV, मलेरिया, TB यांसारख्या आजारांमुळे होणाऱ्या एकत्रित मृत्यूंच्या दुप्पट मृत्यू हृदयाशी संबंधित आजारांमध्ये होतात.

फोटो स्रोत, NARINDER NANU/AFP/GETTY IMAGES

एका अंदाजानुसार, हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये अचानक आलेल्या कार्डिअॅक अरेस्टमुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण हे 40 ते 50 टक्के आहे. जगभरात कार्डिअॅक अरेस्टमधून वाचण्याचं प्रमाण हे एक टक्क्यापेक्षा कमी आहे आणि अमेरिकेत हे प्रमाण 5 टक्के इतकं आहे.

यावर पर्यायी उपाययोजना शोधण्यावरही जगभरात भर दिला जात आहे. भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये परिस्थिती तर आणखीनच गंभीर आहे.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)