पाहा व्हीडिओ : नागालँडमध्ये महिला निवडणुकीला उभी आहे, याची पुरुषांना भीती वाटते! - रोज डुकरू

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : महिलांनी धैर्य दाखवलं पाहिजे, कारण चागंलं भवितव्य त्यांची वाट पाहत आहे (व्हीडिओ शूट आणि एडिट - शरद बढे)

नागालॅंडमधून आजपर्यंत एकही महिला आमदार म्हणून निवडून आलेली नाही. यावेळी इथं 5 महिला निवडणूक लढवत आहेत. यांतीलच अपक्ष उमेदवार आहेत रेखा रोज डुकरू. नागालॅंडची राजकीय परिस्थिती बदलण्याबद्दल त्या आशावादी आहेत. बीबीसी मराठीशी त्यांनी संवाद साधला.

"भारताच्या इतर राज्यांत महिला राजकारणात पुढं आहेत. काही राज्यांत महिला मुख्यमंत्री आहेत तर काही पक्षांच्या अध्यक्ष महिला आहेत. पण जेव्हा मी नागालॅंडकडे पाहते तेव्हा मला दुःख होतं. 1964 साली राज्यात पहिल्यांदा निवडणूक झाली होती, पण आज 2018 आहे. तरीही इथून एकही माहिला उमेदवार निवडून आलेली नाही," असं त्या म्हणाल्या.

त्या सांगतात की महिला मोठा बदल घडवून आणू शकतात. "महिला कामाबद्दल कष्टाळू असतात आणि प्रामाणिक असतात."

"मी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने महिला खूश आहेत. पण मला प्रोत्सहित करायला त्या घाबरतात. कारण शेवटी त्यांना त्यांच्या पतीचंच ऐकावं लागलणार आहे," असं त्या सांगतात.

Image copyright Getty Images

"आजही मला पुरुषांच्या विरोधाचा सामना करावा लागत आहे, कारण त्यांना असं वाटतं की महिलांनी राजकारणात येऊ नये. आम्हा लढू शकत नाही, असं त्यांना वाटतं," असं त्या म्हणतात.

"पुरुषांनी आणि समाजानं महिलांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. कारण मी पुरुषांच्या विरोधात लढण्यासाठी राजकारणात आलेले नाही. पुरुष आणि महिलांनी एकत्र येऊन समाज बदलला पाहिजे," असं त्या म्हणाल्या.

"अनेक महिलांना माहीत असतं की चुकीचं होत आहे, पण त्यांच्यात लढण्याचं धाडस नाही. मला त्यांना सांगायचं आहे की महिलांनी धैर्य दाखवलं पाहिजे, कारण चांगलं भवितव्य त्यांची वाट पाहत आहे," असा आशावाद त्या व्यक्त करतात.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)