ग्राऊंड रिपोर्ट : RSSच्या 'राष्ट्रोदय'च्या माध्यमातून भाजपची 2019 ची तयारी?

दृश्य 1

मेरठला जागृती विहारहून 15 किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ते गणवेश म्हणतात घालून दहा वर्षांचा एक मुलगा आपल्या सहकाऱ्यांबरोबर बसमध्ये चढण्यासाठी तयार आहे.

मी त्याला नाव विचारण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा आवाज लाऊडस्पीकरच्या आवाजात कुठेतरी लुप्त झाला. हा मुलगा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रोदय कार्यक्रमात भाग घ्यायला आला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मते रविवारी मेरठमध्ये झालेला कार्यक्रम संख्येच्या हिशेबानं सगळ्यांत मोठा कार्यक्रम होता.

जेव्हा त्या मुलाला राष्ट्रोदय या शब्दाचा अर्थ विचारला तेव्हा त्याने निरागसपणे मान डोलावली आणि त्याला यातलं फारसं माहीत नाही असं सांगितलं.

दृश्य 2

मेरठच्या जागृती विहारच्या शेकडो एकर जागेत जमलेल्या स्वयंसेवकांमध्ये एक मध्यमवयाचा राजीव नावाचा आणखी एक मुलगा तिथं होता.

जमिनीवरून साठ फूट उंच आणि 200 X100 मंचाच्या डाव्या बाजूला संघाचं घोषणा दल (बँड पथक) सगळ्यांत समोर बसलं आहे.

राष्ट्रोदय म्हणजे काय असं विचारताच तो सांगतो की, नावातच राष्ट्राचा उदय असा त्याचा अर्थ दडलाय.

राष्ट्राच्या उदयासाठी किती लोक जमलेत असा प्रश्न विचारताच तो 3 लाख 11 हजार असं उत्तर देतो. त्याला हे कसं माहीत आहे, असं विचारल्यावर तो सांगतो की, "नोंदणी झाली आहे आणि आताच तशी घोषणाही झाली आहे."

सहावीत शिकणारा राजीव जेव्हा या प्रश्नांची उत्तरं देत असतो त्याचवेळी मुख्य व्यासपीठाच्या उजवीकडे बसलेला एक स्वयंसेवक घोषणा करतो, "पत्रकारांनी स्वयंसेवकांचे बाईट घेऊ नयेत."

हे ऐकताच तिथं बसलेले इतर स्वयंसेवक प्रश्नांची उत्तरं द्यायला नकार देतात आणि म्हणतात, "मंचाच्या घोषणांकडे लक्ष द्या."

दृश्य 3

पार्श्वभूमीवर भारतमाता आणि लिफ्टची सुविधा असलेल्या मोठ्या मंचापासून 250 मीटर अंतरावर असलेल्या समोरच्या भागात पश्चिम उत्तर प्रदेशातल्या 13 जिल्ह्यातून आलेले स्वयंसेवक रांगेत बसले आहेत.

दुसऱ्या मंचावरून आलेल्या आदेशानुसार ते योगाभ्यास करत आहेत.

सरसंघचालक म्हणजे मोहन भागवत आल्यावर या क्रिया पुन्हा करायच्या आहेत अशी आठवण करून दिली जाते.

दृश्य 4

मुख्य मंचाच्या उजव्या बाजूला तीनशे मीटर दूर पत्रकारांच्या घोळक्यात एक स्वयंसेवक आणि चॅनेलच्या एका प्रतिनिधीत भांडण होतं आणि गोंधळाची स्थिती निर्माण होते.

हे प्रकरण शांत करण्यासाठी अनेक लोक येतात. वादाचा मुद्दा काय असं विचारल्यावर पत्रकार अभिषेक शर्मा सांगतात, "अडचण अशी आहे की आम्ही काम करू शकत नाही. इथे इंटरनेट वगैरे काहीही चालत नाही. प्रसारमाध्यमांवर बंधनं घातली आहेत. इथल्या व्यवस्थेबद्दल बातम्या करू देत नाहीत."

इथे संघाचे स्वयंसेवक तर खूप आहेत, पण कार्यक्रमावर बोलायला कोणीही तयार नाही.

दृश्य 5

जवळजवळ तीन वाजता एका उघड्या जीपमध्ये संघाचे सरसंघचालक मोहन भागवत येतात.

आकाशातून ड्रोन लक्ष ठेवून आहे. जीप मुख्य मंचाजवळ थांबते. मोहन भागवत लिफ्टने वर पोहोचतात.

जैन मुनी विहर्ष सागर आणि महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्यानंतर ते माईकचा ताबा घेतात आणि स्वयंसेवकांना जवळजवळ अर्धा तास 'राष्ट्रोदय'चा अर्थ समजावून सांगतात.

मोहन भागवत आपल्या भाषणात राजकारणाबद्दल कोणतीच चर्चा करत नाहीत, पण शक्तीच्या विस्ताराबद्दल बोलतात.

ते सांगतात, "जगाचा एक व्यवहारिक नियम आहे. जेव्हा एखाद्या चांगल्या गोष्टीमागे शक्ती असते तेव्हाच त्या गोष्टीला मान्यता मिळतो. देवता बकऱ्याचा बळी द्या असं सांगतात. तो बकरा काही म्हणत नाही, फक्त 'मै..मै' करत आवाज करत असतो. देवसुद्धा कधी दुर्बळांचा सन्मान करत नाही."

मोहन भागवत सांगतात की जेव्हा शक्ती असते तेव्हा त्याची स्तुती करण्याची गरज नाही.

ते सांगतात, "हा कार्यक्रम प्रदर्शनासाठी नाही. आपल्याकडे किती शक्ती आहे याचा आम्ही हिशोब ठेवतो, पण शक्तीचं प्रदर्शन करत नाही. शक्ती असेल तर ती दिसतेच. आमची किती शक्ती आहे? किती लोकांना बोलावू शकतो? किती लोक शिस्तीचं पालन करतात? याचं आम्ही मोजमाप करतो आणि पुढे जातो.

रामायण आणि महाभारताच्या कथांच्या माध्यमातून स्वयंसेवकांना समजावणाऱ्या मोहन भागवतांचा तिसऱ्या एका गोष्टीवर भर होता, ती म्हणजे सामाजिक एकता.

राष्ट्रोदयाची माहिती देण्यासाठी संपूर्ण शहरात जे होर्डिंग लावले होते त्यात बहुतांश होर्डिंग्समध्ये सामाजिक एकता आणि अस्पृश्यतेच्या विरोधात संदेश दिले जात होते.

मोहन भागवत म्हणाले, "आम्ही स्वत:ला विसरून गेलो आहोत. जातीपाती मध्ये आणून आम्ही एकमेकांशी भांडत आहोत. ज्यांच्याशी आपण भांडू शकतो अशा लोकांना ओळखून आम्ही त्यांच्याशी भांडतो. आपल्यातल्या वादाचा फायदा इतर लोक घेतात. हे सगळं बंद करायचं असेल तर सगळे हिंदू आमचे भाऊ आहेत. समाजाच्या प्रत्येक भागाला आपलंसं करण्याची गरज आहे."

संघाच्या कार्यक्रमाचं वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांनी भागवत यांच्या भाषणाचं विश्लेषण केलं.

दलित आणि ग्रामीण भागावर भर

हिंदुस्तान वर्तमानपत्राचे निवासी संपादक पुष्पेंद्र शर्मा सांगतात, "पाटणा, वाराणसी, आग्रा आणि आता मेरठला झालेल्या भागवतांच्या भाषणाचा आपण विचार केला तर एक गोष्ट प्रकर्षानं लक्षात येते की, हिंदूत्वाचा मुद्दा त्यांनी अजूनही मागे पडू दिलेला नाही. पण 2019 जवळ आहे हे आपल्याला माहिती आहे. निवडणुका जवळ आहेत. हे कार्यक्रम उगाच होत नाहीत. जर भाजपपासून मतदार लांब जात असेल तर त्यांना पुन्हा आपलंसं करणं हे उद्दिष्ट आहे. त्यातही तरुण, दलित आणि ग्रामीण भागावर त्यांचं विशेष लक्ष आहे."

पुष्पेंद्र शर्मा आठवण करून देतात की पश्चिम उत्तर प्रदेशात सहारणपूरमध्ये दलित आणि सवर्णांमध्ये संघर्ष आहे. त्याचा परिणाम निवडणुकांवर झाला होता. यामुळे भाजपला नुकसान झाल्याचंही ते सांगतात.

पुष्पेंद्र शर्मा पुढे विश्लेषण करतात, "सहारणपूरच्या घटनेनंतर चंद्रशेखर रावण या नव्या शक्तीचा उदय झाला आहे. त्यात जिग्नेश मेवाणींचाही समावेश आहे. जे युवा नेतृत्व देशात पुढे येत आहे, सहारणपूर त्या नेतृत्वासाठी प्लॅटफॉर्म आहे. म्हणून दलितांना जोडून ठेवण्याचा एक प्रयत्न आहे. या कार्यक्रमासाठी दलितबहुल भागातून जेवण मागवलं होतं.

प्रत्येक गावात शाखेचं उद्दिष्ट

1998 साली संघाच्या अशाच एका कार्यक्रमाचं वार्तांकन केलेल्या ब्रिजेश चौधरींचं असंच काहीसं मत आहे.

ते सांगतात, "2014 च्या निवडणुकीत पश्चिम उत्तर प्रदेशात भाजपला विजय मिळाला होता. आता 2019 च्या निवडणुका आहेत. आपण बघू शकता की दोन लाख लोक एका जागी जमले आहेत. एका घरातून एक माणूस आला आहे असं लक्षात घेतलं तर पाच लाख कुटुंबाचे लोक इथे आले आहे. मी त्यांना विचारलं की उद्दिष्ट काय आहे. त्यांचं म्हणणं आहे की प्रत्येक गावात शाखा असली पाहिजे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की पश्चिम उत्तर प्रदेशातल्या सामाजिक संरचनेत मोठीमोठी गावं आहेत. एका गावात दहा-दहा हजार लोक आहेत. चार गावं एका बाजुला झाली तरी निकालामध्ये मोठा फरक पडू शकतो."

संघाची शक्ती कुठे जाते हे सगळ्यांनाच माहिती

कधी भारतीय क्रिकेट संघात असणारे आणि संघाच्या गणवेशात राष्ट्रोदयात भाग घ्यायला आलेल्या चेतन चौहान यांनी हा अंदाज फेटाळून लावला.

ते म्हणाले, "दुसरे लोक म्हणतात की, ही 2019ची तयारी आहे. राजकारणाशी याचा काहीही संबंध ऩाही. हे सगळ्या हिंदू समाजाला एकत्र आणण्यासाठी आहे. आमच्यात फूट पाडणाऱ्या शक्तीचा विरोध करायचा आहे."

नायजेरियातल्या दोन शाखांची जबाबदारी घेणाऱ्या एकाची जबाबदारी घेणाते आणि मुळचे मेरठमध्ये राहणारे भारत पांडे्य सांगतात की, या कार्यक्रमाचं कोणताही राजकीय उद्देश नाही. मोहन भागवत यांनी मंचावरून कोणतंही राजकीय विधान केलं नाही. कोणत्याही राजकीय पक्षाचं नाव घेतलेलं नाही.

पण पुष्पेंद्र शर्मा सांगतात, "संघ ही राजकीय संघटना नाही हे सगळ्यांना माहीत आहे. पण जेव्हा सांस्कृतिक संघटनेची शक्ती एका पक्षाला मिळते तेव्हा त्याचा अर्थ लक्षात येतो. हे सगळं जर भाजपच्या सांगण्यावरून होत असेल तर त्यांनी प्रचारात सगळ्यांना मागे टाकलं आहे हे लक्षात येतं."

दृश्य 6

मोहन भागवतांचं भाषण आणि राष्ट्रोदय कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या दोन तास आधी मेरठच्या संमिश्र लोकसंख्या असलेल्या अहमद रोडवर शुकशुकाट आहे.

दुकानं रिकामी आहेत, दुकानदार आहे पण गर्दी नाही.

त्याच भागात राहणारे आणि स्वत:ला पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते म्हणवून घेणारे हाजी मोहम्मद इशरत सांगतात, "तीन दिवसांपासून इथे भीतीचं वातावरण आहे. इतका मोठा मंच आहे, लिफ्ट आहे, काय काय होतंय काही कल्पना नाही. तिकडे पोलीस बंदोबस्त सुद्धा आहे."

व्यवसायाने शिंपी असलेले मोहम्मद उस्मान सांगतात, "भारतातल्या कोणत्याच संघटनेला भेदभावाबद्दल बोलायची परवानगी नाही. त्यांनी हिंदू-मुस्लीमांबदद्ल बोलू नये."

"संघाच्या या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पैसा कुठून आला, असा प्रश्न मोहम्मद इशरत विचारतात. तसंच ते आरोप करतात की भाजप सरकार आल्यानंतर सगळी ताकद संघाकडे आलेली आहे. ते म्हणतात की, वंदे मातरम कहोगे तो हिंदुस्तान मे रहोगे."

दृश्य 7

राष्ट्रोदय आयोजन स्थळाच्या गेट नंबर 1 पासून तीनशे मीटर दूर राष्ट्रीय मुस्लीम मंचाचा स्टॉल आहे. तिथं डझनभर कार्यकर्ते येणाऱ्या लोकांना पाणी पाजत आहे.

मंचाचे प्रांत सहसंयोजक मौलाना हमीदुल्लाह खान राजशाही सांगतात, "मला वाटतं की मुस्लिमांना संघाची साथ द्यायला हवी RSS ही राष्ट्रवादी संघटना आहे.

तिथंच उपस्थित कदीम आलम कार्यक्रमावर होणाऱ्या खर्चाच्या रकमेवर प्रश्न उपस्थित केल्यावर ते सांगतात "एक एक पैसा एकत्र करून हा कार्यक्रम होत आहे."

ते वंदेमातरमचं समर्थन करताना म्हणतात, "वंदे मातरम आमच्या संस्काराचा भाग आहे. ही नवीन घोषणा नाही."

आणि या दृश्यांवर टिप्पणी करताना ब्रजेश चौधरी सांगतात, "माझ्यामते गर्दी हे सगळ्यांत मोठं तंत्र आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)