#5मोठ्याबातम्या : महाराष्ट्र सरकारमध्ये आता येणार 'आनंद मंत्रालय'

आनंदी Image copyright Christopher Polk/GETTY IMAGES
प्रतिमा मथळा आनंद मंत्रालय

पाहूयात आज सकाळी विविध वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या 5 महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात.

1. महाराष्ट्र सरकारमध्ये आता 'आनंद मंत्रालय'

सर्वसामान्य जनतेला आनंदाची काळजी घेण्यासाठी महाराष्ट्र सरकार लवकरच एक नवं मंत्रालय सुरू करणार असून याची जबाबदारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे.

लोकमतनं दिलेल्या वृत्तानुसार, मध्य प्रदेशमध्ये नागरिकांना आनंदी ठेवण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात आलं आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रातही असं मंत्रालय सुरू करण्यात येणार आहे.

सध्या नवीन मंत्रालयाचं प्रारूप तयार करण्यात आले आहे.

नागरिकांना मदत आणि पुनर्वसनांतर्गतच ते राहणार असल्यानं त्याचा कार्यभारही माझ्याकडे असेल, असं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

2. मनोहर पर्रीकर पुन्हा रुग्णालयात दाखल

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लो ब्लड प्रेशर आणि डिहायड्रेशनचा त्रास जाणवू लागल्यानं रविवारी सायंकाळी त्यांना बांबोळीच्या गोवा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

Image copyright Getty Images

एबीपी माझाच्या वृत्तानुसार, त्यांच्यावर उपचार सुरू असून डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. याआधी प्रकृती खालावल्यानं पर्रीकर यांच्यावर मुंबईच्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते.

काही दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांनी 22 तारखेला स्पेशल विमानाने गोवा गाठलं आणि राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. तेव्हापासून ते दोनापावलाच्या आपल्या खासगी घरातून काम पाहात होते.

डॉक्टरांनी इन्फेक्शन होऊ नये यासाठी त्यांना बाहेर फिरण्यास मज्जाव केला होता. पण त्यांना पुन्हा एकदा त्रास होऊ लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

3. 'मोदी पॅटर्न फसला'

भाजपचा विकासाचा 'मोदी पॅटर्न' पूर्णपणे अपयशी ठरल्यानं राज्यात 'नीरव' शांतता आहे, अशी टिप्पणी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विरोधकांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत केली.

लोकसत्ताच्या वृत्तानुसार, राज्य विधिमंडळाच्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानिमित्त रणनीती ठरवण्यासाठी विरोधकांनी बैठक घेतली. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना विखे-पाटलांनी आरोप केला की भीमा कोरेगाव प्रकरण हे सरकारपुरस्कृत दंगल होती. कर्जमाफी फसल्यानं राज्यात कर्जमाफीच्या घोषणेनंतरही 2000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं ते म्हणाले.

"सत्ताधाऱ्यांची घरवापसीसाठी उलटगणती सुरू झाली आहे," अशी शेरेबाजी करत धनंजय मुंडे यांनी राज्य सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरल्याची टीका केली.

Image copyright Mantralaye

दरम्यान, दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी मार्च महिन्यात शेतकऱ्यांकडून पुन्हा ऑनलाईन अर्ज मागवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याची घोषणा केली.

"मंत्रालयातील आत्महत्या ही गंभीर बाब आहे. पण विरोधक त्यातही राजकीय संधी शोधत आहेत. इतका निराश विरोधी पक्ष पाहिला नव्हता. सत्तेपासून दूर झाल्यानं विरोधक वैफल्यग्रस्त झाले आहेत," अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली.

4. हिंदूंना संघटीत व्हावं लागेल - मोहन भागवत

हिंदूना संघटीत व्हावं लागेल. देशाची जबाबदारी आपल्यावर आहे, असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केल्याचं द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तात म्हटलं आहे.

मेरठमध्ये आयोजित राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या 25व्या स्वंयसेवक संमेलनात ते बोलत होते.

Image copyright Getty Images

"आपण हिंदू आहोत, हे गर्वाने सांगा. या देशाची जबाबदारी आपल्यावर असल्याने हिंदूंना संघटीत व्हावं लागेल. पूर्वकाळापासून हे आपलं घर राहिलं आहे. जगात आपल्याला कुठेच जायला जागा नाही. या देशाबरोबर जर काही वाईट घडलं तर त्याला आपणच जबाबदार राहू," असं भागवत म्हणाले.

"आपण संघटीत न होण्यामागचा सर्वांत अडथळा हा आहे की, आपण जातीवरून भांडतो. प्रत्येक हिंदूमध्ये बंधुत्वाचा नातं असल्याचं आपल्याला सांगावं लागेल. ज्यांचा भारत मातेवर विश्वास आहे ते हिंदू आहेत," असंही भागवत यांनी यावेळी सांगितलं.

5. राज्यातील 71% दुधात भेसळ

महाराष्ट्राच्या गोठ्यांतून विकल्या जाणाऱ्या दुधाचे 71% नमुने आणि पिशव्यांमधून विकल्या जाणाऱ्या ब्रँडेड दुधाचे 65% नमुने सदोष आढळल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

Image copyright PHILIPPE HUGUEN/GETTY IMAGES

सकाळने दिलेल्या वृत्तानुसार, Consumer Guidance Society of India ने (CGSI) केलेल्या तपासणीत एवढ्या मोठ्या प्रमाणात दुधात भेसळ असल्याचं समोर आलं आहे.

फूड स्टॅंडर्ड अँड सेफ्टी ॲथोरिटी ऑफ इंडियाने दुधातील घटक पदार्थांचं प्रमाण निश्‍चित केलं आहे, ज्यानुसार एखादं दूध माणसाला पिण्यायोग्य आहे की नाही, ठरवलं जातं.

दुधात पाणी मिसळल्यामुळे हे दूध निकषात बसत नसल्याचा दावा CGSIचे अध्यक्ष डॉ. सीताराम दीक्षित यांनी केला आहे.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)