#5मोठ्याबातम्या : शेतकऱ्यांना आरक्षण द्या : शरद पवार

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार Image copyright Matthew Lewis/GETTY IMAGES
प्रतिमा मथळा राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार

पाहूयात आज सकाळी विविध वृत्तपत्रं आणि वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या 5 महत्त्वाच्या बातम्या

1. शेतकऱ्यांना आरक्षण द्या - शरद पवार

आर्थिक निकषांच्या आधारावर आरक्षण द्यायचं असेल तर शेतकरी घटक ग्राह्य धरून त्यांना आरक्षण द्या, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.

सकाळने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते होते. राज्यातील 82 टक्के शेतकऱ्यांजवळ दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असून 70 ते 72 टक्के शेतीला खात्रीचे पाणी नाही.

शेतकरी घटक ग्राह्य धरल्यास मराठासह सर्व जाती आणि धर्मांतील लोकांना आरक्षणाचा फायदा होईल. यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे आग्रह धरावा, असं पवार म्हटले.

SC, ST आणि OBC यांना घटनेत जे आरक्षण दिलं आहे त्याला, धक्का लागता काम नये. त्याव्यतिरिक्त अन्य घटकांना आर्थिक निकषांवर आरक्षण देता येईल, असंही ते म्हणाले.

2. सरकारी नोकऱ्यांना कात्री

महाराष्ट्र राज्यातील शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च नियंत्रित ठेवण्यासाठी भविष्यात सरकारी नोकऱ्यांना कात्री लावली जाणार आहे.

Image copyright MANJUNATH KIRAN/GETTY IMAGES

लोकसत्तानं दिलेल्या वृत्तानुसार, अर्थ आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी विधान परिषदेत लेखी प्रश्नांच्या उत्तरात ही माहिती दिली.

शासकीय कामकाजासाठी माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून मनुष्यबळाची मागणी कमी करण्याबाबत वित्त विभागाने सर्व विभागांना तशा सूचना दिल्या आहेत.

शासकीय सेवेत अधिक मनुष्यबळाची गरज नसल्याचं कारण सांगून ३० टक्के पदं कमी करण्यासाठी नवीन आकृतीबंध सादर करण्यास सांगण्यात आला. असं झाल्यास सुमारे पाच लाख कर्मचाऱ्यांना नोकऱ्या गमवाव्या लागतील, त्याबाबत शासनानं खुलासा करावा, अशी मागणी या विधानपरिषद सदस्यांनी केली होती.

3. अमराठी शाळांत दहावीपर्यंत मराठी सक्तीची?

राज्यातील सर्व अमराठी शाळांमध्ये दहावीपर्यंत मराठी भाषा सक्तीचा विषय करण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल, असं मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत सांगितलं.

Image copyright BALBHARATI

लोकमतनं दिलेल्या वृत्तानुसार, अमराठी शाळांत मराठी सक्तीची करावी, अशी एकमुखी भावना सभागृहात व्यक्त झाली. कर्नाटकात कन्नड भाषा दहावीपर्यंत अनिवार्य आहे. मग महाराष्ट्रात मराठी अनिवार्य का नाही, असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही शाळांत मराठी सक्तीची करण्याला संमती दर्शविली.

याला भाजप-शिवसेना सदस्यांनी पाठिंबा दिला. यावर तावडे म्हणाले की, मराठी भाषा दहावीपर्यंत अनिवार्य करावी की बारावीपर्यंत, याचा विचार सुरू आहे. सध्या आठवीपर्यंत मराठी अनिवार्य आहे.

4. सिंचन घोटाळ्यातील आरोपीची आत्महत्या

विदर्भातील गोसेखुर्द पाटबंधारे घोटाळ्यातील एक संशयित आरोपी जिगर ठक्करने मंगळवारी सायंकाळी मुंबईत स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.

महाराष्ट्र टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, घाटकोपरमध्ये राहणाऱ्या ठक्करने नरिमन पॉइंट इथं चालकास गाडी रस्त्याशेजारी उभी करण्यास सांगून डोक्यात गोळी झाडून घेतली.

विकासक असणाऱ्या ठक्करचं नाव गोसेखुर्द पाटबंधारे घोटाळ्यातील आरोपींमध्ये होतं. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं त्याच्यासह काही नातेवाईकांवर आरोपपत्र दाखल केले होते.

5. कर्जबुडव्यांवर लगेच गुन्हे नोंदवा

ऐपत असूनही कर्ज न फेडणाऱ्यांनी किती रक्कम थकविली आहे, याचा विचार न करता त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे आदेश अर्थ मंत्रालयानं बँकांना दिले आहेत.

Image copyright Getty Images/Indranil Mukharjee
प्रतिमा मथळा पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील ब्रीच कँडी शाखेत हा घोटाळा झाला.

लोकमतच्या वृत्तानुसार, पंजाब नॅशनल बँकेच्या आर्थिक घोटाळ्यानंतर अर्थमंत्रालयानं हा कडक पवित्रा घेतला आहे.

कर्जबुडव्यांवर कारवाई करण्यास अजिबात दिरंगाई होता कामा नये, असं बँकांना सांगत, अर्थ मंत्रालयाने 50 कोटींहून अधिक कर्जाच्या रकेची परतफेड न करणाऱ्यांवर, फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँकांच्या बुडीत कर्जाचा आकडा हा 30 सप्टेंबर 2017 पर्यंत 7.34 लाख कोटी रुपयांवर पोहोचला असल्याचं रिझर्व्ह बँकेने अहवालात म्हटलं आहे.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)