सोशल : 'शेतकऱ्यांना हमीभाव द्या, आरक्षणाची गरज नाही'

शरद पवार Image copyright Getty Images

आर्थिक निकषांच्या आधारावर आरक्षण द्यायचं असेल तर शेतकरी घटक ग्राह्य धरून त्यांना आरक्षण द्या, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यातील 82 टक्के शेतकऱ्यांजवळ दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असून 70 ते 72 टक्के शेतीला खात्रीचे पाणी नाही.

शेतकरी घटक ग्राह्य धरल्यास मराठासह सर्व जाती आणि धर्मांतील लोकांना आरक्षणाचा फायदा होईल. यासाठी राज्य सरकारनं केंद्राकडे आग्रह धरावा, असं पवारांनी म्हटलं आहे.

त्या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीनं वाचकांना प्रश्न विचारला होता की, शरद पवारांनी म्हटल्याप्रमाणे शेतकऱ्यांनाही आरक्षण देण्यात यावं का? यावर वाचकांच्या अनेक प्रतिक्रिया आल्या. त्यातल्याच या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया.

श्रीधर हळदणकर लिहितात, "७० वर्षें झाली तरी आपण सगळे आरक्षणावरच बोलतो. का? तुम्ही स्वतः कृषी मंत्री होतात. तुमच्याकडे एवढी पॉवर होती, तरी का नाही झालं हे साध्य तुमच्या कडून. मी कुठल्याही सरकारच समर्थन करत नाही. तुमच्या हातात सत्ता असताना तुम्ही हे 100% करू शकत होतात."

Image copyright Facebook

तर निवडणूक जवळ आल्यानं शेतकरी कार्ड खेळलं जात असल्याची प्रतिक्रिया प्रकाश पोतदार यांनी दिली आहे.

Image copyright Facebook

"आणि मग असंघटित शेतमजूरांचं काय? त्यांना कोणी वाली आहे की नाही?" असा प्रश्न विचारला आहे भरत माने यांनी.

Image copyright Facebook

श्रद्धानंद कदम यांनी रोखठोक मत व्यक्त केलं आहे. ते म्हणतात, "आरक्षण या शब्हात काही राहिलं नाही. सगळे खेळ राजकारणी करतात. हा शब्द वापरल्याशिवाय राजकारणी जेवण करत नसतील."

Image copyright Facebook

संजय राजपूत यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्यांनी दोन सवाल उपस्थित केले आहेत.

संविधानात वर्गाधारीत आरक्षणाची तरतूद आहे का? तंसच जातीधारीत संघर्ष तीव्र असतांना पवारांना आता वर्गाधारीत संघर्ष उभा करायचा आहे का? असे सवाल त्यांनी विचारले आहेत.

Image copyright Facebook

सागर यादवही म्हणतात की आरक्षणासाठी इतर घटकांचाही विचार करावा लागेल. ते लिहितात, "कमी वेतन असणारा माणूस पण शिक्षण, घर, गाडी यासाठी कर्ज घेतो. त्याला कधी सूट दिल्याचं आठवत नाही."

Image copyright Facebook

"पवार साहेबांना या गोष्टी सत्ता गेल्यावरच का सुचतात? इतक्या वर्षांनी बरा शेतकरी आठवतोय? सत्तेत असताना शेतकरी का आठवला नाही?" असं मयूर पाटील यांनी लिहिलं आहे.

Image copyright Facebook

"शेतकऱ्यांना हमीभाव द्या, आरक्षणाची गरज नाही," असं लिहिलं आहे महेशकुमार तांबे यांनी.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)