मृत्यूनंतरच श्रीदेवीला खरी शांती मिळाली : राम गोपाल वर्मांचं चाहत्यांना पत्र

रामगोपाल वर्मा, श्रीदेवी, सिनेमा, मनोरंजन Image copyright @RGVZOOMIN/Twitter
प्रतिमा मथळा रामगोपाल वर्मा आणि श्रीदेवी

श्रीदेवींच्या निधनानंतर दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी श्रीदेवी यांच्या चाहत्यांना खुलं पत्र लिहिलं. पत्राचा मथळा आहे- 'My Love Letter to Sridevi's Fans'.

फेसबुकच्या माध्यमातून लिहिलेल्या या पत्रामागची भूमिका वर्मा यांनी स्पष्ट केली - "हे पत्र लिहावं की नाही असा मी विचार करत होतो. कारण या पत्रात काही नावं आहेत. पण मला असं वाटतं अन्य कोणापेक्षाही श्रीदेवी तिच्या चाहत्यांची अधिक होती, त्यांना सत्य माहिती असायला हवं."

रामगोपाल वर्मा यांनी या पत्रात श्रीदेवी यांच्या आयुष्याबाबतच्या काही घटनांचा उल्लेख केला आहे. ते लिहितात, "खरंतर मृत्यूमुळेच श्रीदेवीला खरी शांतता मिळाली आहे."

Image copyright AFP
प्रतिमा मथळा श्रीदेवी

श्रीदेवी खूश होती का?

रामगोपाल वर्मा लिहितात, "लाखो चाहत्यांप्रमाणे मलाही वाटायचं की, श्रीदेवीच सगळ्यात सुंदर स्त्री होती. ती आपल्या देशातली सुपरस्टार होती. वीस वर्षं अभिनेत्री म्हणून तिने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. हा कहाणीचा एक भाग होता. तिच्या निधनानं जीवन आणि मृत्यू यांच्यातील प्रकाशझोतात न आलेलं असं क्रूर, नाजूक आणि रहस्यमय प्रकरण समोर आलं आहे."

"मृत्यूनंतर ती किती सुंदर होती, किती महान अभिनेत्री होती, तिच्या निधनानं किती पोकळी जाणवणार आहे, अशा चर्चा रंगल्या आहेत. पण माझ्याकडे त्यापलीकडे सांगण्यासारखं काही तरी आहे. 'क्षणा क्षणं' आणि 'गोविंदा गोविंदा' या चित्रपटांच्या निमित्तानं तिचा सहवास मला लाभला."

"चाहत्यांच्या, सर्वसामान्य माणसांच्या मनात तारे-तारकांची जी प्रतिमा असते, त्याहून त्यांचं प्रत्यक्ष आयुष्य वेगळं असतं. श्रीदेवीचं आयुष्य हे याचं उत्तम उदाहरण आहे. चाहत्यांना वाटायचं श्रीदेवीचं आयुष्य परिपूर्ण होतं. सुंदर चेहरा, अलौलिक प्रतिभा आणि दोन मुलींसह सुखी कुटुंब. कोणालाही हवंहवंसं वाटेल असं हे चित्र. पण श्रीदेवी खरंच खूश होती का? ती सुखी होती का?"

Image copyright NArinder Nanu/AFP/Getty Images
प्रतिमा मथळा श्रीदेवी यांच्या चाहत्यांना उद्देशून दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी पत्र लिहिलं आहे.

"मी तिला ओळखतोय तेव्हापासून तिच्या आयुष्याबद्दल बरंच काही जाणतो. वडिलांचं निधन होईपर्यंत एखाद्या मुक्त पक्ष्याप्रमाणे त्यांचं आयुष्य होतं. मात्र नेहमीच अतिसावध आणि काळजी करणाऱ्या तिच्या आईमुळे श्रीदेवीचं आयुष्य कायमसाठी बंदिस्त झालं," असं रामगोपाल वर्मा यांनी लिहिलं आहे.

"तो काळ वेगळा होता. तेव्हा करचुकवेगिरीप्रकरणी पडणाऱ्या धाडी टाळण्यासाठी अभिनेते-अभिनेत्रींना काळ्या पैशातूनच मानधन (मेहनताना) दिलं जायचं. श्रीदेवीच्या वडिलांचा मित्रपरिवार आणि नातेवाईकांवर विश्वास होता. पण ते गेले अन् या सगळ्यांनी श्रीदेवीला फसवलं. तिच्या आईनं गैरसमजुतीतून कायदेशीर गुंत्यात अडकलेल्या संपत्तींमध्येच गुंतवणूक केली.

श्रीदेवीच्या आयुष्यात बोनी कपूर यांचं आगमन होईपर्यंत श्रीदेवीची आई दिवाळखोरीच्या स्थितीत गेलेली होती. बोनी स्वत:ही तेव्हा प्रचंड कर्जाच्या बोज्याखाली होते आणि आपल्या सासूला सहानुभूती शिवाय काहीही देऊ शकत नव्हते."

Image copyright Sridevi/Instagram
प्रतिमा मथळा पती बोनी कपूर यांच्यासमेवत श्रीदेवी

वर्मा लिहितात, "अमेरिकेत झालेल्या मेंदूवरील चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे श्रीदेवीची आई मनोरुग्ण बनली. याच दरम्यान श्रीदेवीची छोटी बहीण श्रीलता हिने शेजाऱ्यांच्या मुलाशी लग्न केलं. आईने मृत्यूपूर्वीच सगळी संपत्ती श्रीदेवीच्या नावावर केली होती. मात्र मृत्युपत्रावर सही करताना आईची मानसिक स्थिती ठीक नव्हती, अशी भूमिका घेत श्रीलतानं कोर्टात दावा दाखल केला. या सगळ्यामुळे लाखो चाहत्यांची हृदयाची धडकन असलेली श्रीदेवी वैयक्तिक आयुष्यात मात्र अगदीच एकटी आणि जवळजवळ कफल्लक झाली होती."

वर्मा पुढे लिहितात, "बोनीच्या आईंनी श्रीदेवीला 'घर तोडणारी स्त्री' असंच जगासमोर दाखवण्याचा प्रयत्न केला. बोनीच्या पहिल्या पत्नी मोनाच्या बाबतीत जे घडलं त्यासाठी त्यांनी श्रीदेवीला जबाबदार ठरवलं. एवढंच नव्हे तर एका पंचतारांकित हॉटेलच्या लॉबीत त्यांनी श्रीदेवीच्या पोटात बुक्काही मारला होता. या सगळ्या काळात श्रीदेवी खूश नव्हती. आयुष्यातील चढउतारांनी तिच्या मनावर खोल जखमा केल्या होत्या. त्याचे व्रण आयुष्यभर पुरले. तिला आयुष्यात कधीच शांतता लाभली नाही."

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा एका पुरस्कारसोहळ्यादरम्यान श्रीदेवी

लहान मुलीसारखी होती श्रीदेवी

"श्रीदेवीला आयुष्यात अनेक खडतर प्रसंगांना सामोरं जावं लागलं. बालकलाकार म्हणून कारकीर्दीला सुरुवात करणाऱ्या श्रीदेवी खूप वेगानं मोठी झाली. चाहत्यांसाठी श्रीदेवी एक सुंदर स्त्री होती. त्या स्वत:ला सुंदर मानायची का? होय, मात्र वाढतं वय कोणत्याही अभिनेत्रीसाठी दु:स्वप्नासारखं असतं. श्रीदेवी याला अपवाद नव्हती. अनेक वर्षं त्या कॉस्मेटिक सर्जरी करत राहिली. या शस्त्रक्रियांचा परिणाम तिच्या शरीरावर स्पष्टपणे दिसायचा."

Image copyright Twitter@nfaiofficial
प्रतिमा मथळा श्रीदेवी यांच्या पहिल्यावहिल्या थुनाइवान चित्रपटातील एक दृश्य

"श्रीदेवीला आपल्या भोवती एक अदृश्य भिंत तयार केली होती. या भिंतीआड काय चाललंय, याची बाहेरच्यांनी दखल घेऊ नये, असं तिला वाटायचं. आयुष्यात ज्याबद्दल असुरक्षित आणि अस्वस्थ वाटतं, त्या गोष्टी जगाला कळू नयेत असं तिला वाटायचं. यात तिचा दोष नव्हता. लहान वयातच प्रसिद्धीचा झोत तिच्या आयुष्यात आला. त्यापासून बाजूला होण्याची तिला संधीच मिळाली नाही. मात्र तिला जे वाटत होतं ते ती करू शकत होती."

पत्रात वर्मा पुढे म्हणतात, "कॅमेऱ्यासमोर येण्यापूर्वी तिला मेकअप करावा लागत नसे. मात्र आपला खरा चेहरा कॅमेऱ्यासमोर येऊ नये, यासाठी तिला मानसिक मेकअप अर्थात तयारी करावी लागायची."

"आयुष्यातला बहुतांश कालावधी ती आईवडील, नातेवाईक, मुलांचं ऐकत वाटचाल करत राहिली. आपल्या मुलामुलींचा समाज स्वीकार करेल का, याबाबत अन्य तारे-तारकांप्रमाणे त्यांनाही चिंता वाटायची. खरंतर श्रीदेवी म्हणजे एखाद्या लहान मुलीच्या शरीरातली मोठ्या वयाची स्त्री होती."

तिच्या आत्म्याला शांती लाभो

राम गोपाल वर्मा म्हणतात की, "कोणाचंही निधन झाल्यानंतर मी RIP अर्थात 'Rest in Peace' म्हणत नाही. मात्र श्रीदेवीच्या बाबतीत मला खरंच असं म्हणावसं वाटतं आहे. कारण मृत्यूनंतरच ती खऱ्या अर्थानं शांतपणे जगू शकणार आहे."

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा श्रीदेवी आपल्या मुलीसमवेत.

"कॅमेऱ्यासमोर असतानाच ती अगदी शांत भासायची. अॅक्शन आणि कट या दोन विश्वांच्या तुलनेत तिच्या व्यक्तिमत्त्वातली शांतता प्रकर्षाने जाणवायची. कारण या काळातच वास्तविक जीवनातल्या कटू सत्यांपासून दूर जात काल्पनिक दुनियेत वावरण्याची संधी तिला मिळायची."

"आता ती शांततेत जीवन व्यतीत करू शकते, हे जाणवल्यानंतर मला बरं वाटतं आहे. ज्या गोष्टींनी तिला आयुष्यभर इतका त्रास दिला त्या सगळ्यांपासून तिची सुटका झाली आहे. स्वर्गात एक मुक्त पक्ष्याप्रमाणे विहरताना मी तुला पाहू शकतो," अशा शब्दांत वर्मा यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा श्रीदेवी यांच्या अंत्ययात्रेदरम्यानचा क्षण.

"माझा पुर्नजन्मावर विश्वास नाही. मात्र आम्हा चाहत्यांना पुढच्या जन्मातही तुला पाहायचं आहे. पुढच्या जन्मात तरी आम्हाला तुझ्या लायक ठरायचं आहे. श्रीदेवी, आम्हाला एक संधी दे. कारण आम्ही मनापासून तुझ्यावर प्रेम करतो."

"मी असंच लिहीत राहू शकतो. पण अश्रू आता पापण्यांचा बांध सोडून वाहू लागले आहेत," असा वर्मा यांनी या पत्राचा समारोप केला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)