'श्रीदेवी जगासाठी चांदनी, आमच्यासाठी सर्वकाही' : बोनी कपूरचं भावनिक पत्र

Image copyright Twitter
प्रतिमा मथळा श्रीदेवी आणि बोनी कपूर

बुधवारी रात्री श्रीदेवीच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण त्यांच्या लाडक्या 'चांदनी'च्या ट्विटर अकाउंटवरून एक ट्वीट करण्यात आलं होतं. हे कसं घडलं, हा विचारभुंगा त्यांना सतावू लागला.

मात्र ते ट्वीट सविस्तर वाचल्यावर हे ट्वीट श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर यांनी केल्याचं स्पष्ट झालं.काही दिवसांपूर्वी आपल्या साथीदाराला गमावलेल्या बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्या चाहत्यांना भावनिक साद घातली. त्यांच्या पत्राचा हा अनुवाद -

एक अत्यंत जवळची मैत्रीण, पत्नी आणि माझ्या दोन तरुण मुलींची आई गमवणं, हे एक असं नुकसान आहे ज्याचं वर्णन मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही.

गेले काही दिवस आमच्यासाठी अत्यंत कठीण होते. या अवघड काळात साथ देणारे माझे कुटुंबीय, मित्रपरिवार, सहकारी, कलाकार आणि श्रीदेवी यांच्या हजारो चाहत्यांचे आभार मानतो. माझी मुलं अर्जुन आणि अंशुला या दोघांनी दिलेल्या खंबीर आधारामुळेच मी, खुशी आणि जान्हवी या धक्क्यातून सावरतो आहे. आम्ही एकत्र कुटुंब म्हणून या दु:खाला सामोरं जाण्याचा प्रयत्न करत आहोत."

Image copyright Twitter

या जगासाठी ती चांदनी होती... एक उत्कृष्ट अभिनेत्री... त्यांची श्रीदेवी... पण माझ्यासाठी ती माझं प्रेम होती, माझी मैत्रीण, आमच्या मुलींची आई... माझी पार्टनर होती. आमच्या मुलींसाठी तर ती सर्वकाही होती... त्यांचं संपूर्ण जग होती... आम्हा सगळ्यांचं आयुष्य तिच्या अवतीभवती फिरत होतं.

तुमच्या लाडक्या श्रीदेवीला निरोप देताना तुम्हा सगळ्यांना एक विनंती आहे की, आमचं दु:खं आम्हाला खासगीत व्यक्त करू द्या. ती एक अशी अभिनेत्री होती जिची जागा दुसरं कुणीही घेऊ शकत नाही. कुठलाच कलावंत पडद्याआड जात नाही, कारण तो चंदेरी पडद्यावर सदैव चमकत राहतो.

मला आता फक्त माझ्या मुलींची चिंता आहे. मला त्यांचा सांभाळ करायचा आहे आणि श्री शिवाय पुढे जाण्याचा मार्ग शोधायचा आहे. ती आमचं आयुष्य होती, आमची ताकद होती आणि आम्ही कायम हसतमुख राहण्याचं कारण होती. आम्ही तिच्यावर खूप प्रेम करत होतो.

Rest in peace, my love. आमचं जग आता आधीसारखं कधीच राहणार नाही.

- बोनी कपूर

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)