श्रीदेवींच्या मृत्यूनंतर बॉलिवुडची काळी बाजू चव्हाट्यावर?

  • सुधा टिळक
  • मुक्त पत्रकार
श्रीदेवी आणि अमिताभ यांच्या एक सिनेमातील दृश्य
फोटो कॅप्शन,

श्रीदेवी आणि अमिताभ यांच्या एक सिनेमातील दृश्य

बॉलिवुडची सुपरस्टार श्रीदेवी यांच्या मृत्यूनंतर अनेक तर्कवितर्क लावले गेलेत. त्यातले काही न पटण्यासारखे होते. या दु:खद बातमीनंतर अनेक जण या क्षेत्रातल्या ताणतणावांबद्दल बोलताना दिसले. विशेषत: स्त्रिया आणि बाहेरून येणाऱ्या लोकांना जे सोसावं लागतं, त्याबद्दल सुधा टिळक लिहीत आहेत.

मुंबईत असलेले हिंदी चित्रपटसृष्टीतले लोक एकमेकांना कुटुंबातल्या सदस्यांसारखं मानतात. पण या क्षेत्रात पडत असलेल्या भेगा आता खरंतर दुर्लक्ष करता येण्यासारख्या नाही.

श्रीदेवी यांच्या धक्कादायक निधनानंतर भारतात सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रियांचा पाऊस पडला. त्यात बॉलिवुडमधील यशस्वी स्त्रियांवर असलेल्या दबावाची आणि त्यांच्या यशामागे असलेल्या अदृश्य गोष्टींची सगळ्यांत जास्त चर्चा झाली.

त्याचबरोबर अनेक स्वप्नांचं गाठोडं घेऊन मुंबई गाठाणाऱ्या अनेकांच्या हालअपेष्टाही उघड झाल्या. वय लपवणं, वाढत्या वयात तरुण दिसणं आणि काही अप्रिय घटना लपवणं यामुळे #Metoo चळवळ फक्त हॉलिवुडपुरतं मर्यादित नाही, हे पुन्हा एकदा समोर आलं.

फोटो कॅप्शन,

रजनीकांत आणि श्रीदेवी

"बॉलिवुडमध्ये पुरुषसत्ताक व्यवस्थेचा इतिहासच आहे. त्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचा जास्त प्रमाणात छळ होतो," असं एका तरुण अभिनेत्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं.

गेल्या दोन दशकांपासून गॉसिप वेबसाईट रोमांस, ब्रेकअप, दारूच्या समस्या, छळसारख्या अनेक गोष्टींबद्दल बोलत आहेत. त्यात या क्षेत्रातील अनेक स्टार्सचासुद्धा समावेश आहे.

जेव्हा श्रीदेवींचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचं समोर आलं तेव्हा सिमी गरेवाल यांनी ट्वीट करून सांगितलं की " व्हिटनी ह्युस्टन आणि श्रीदेवी यांच्या मृत्यूंमध्ये बरीच समानता आहे."

ह्युस्टन यांचा 11 फेब्रुवारी 2012 रोजी एका हॉटेलच्या खोलीत मृत्यू झाला. अटॉप्सी रिपोर्टमध्ये कोकेन आणि ह्दयरोगामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं.

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन,

दीपिका पादुकोण यांना नैराश्य आलं आहे असं त्यांनी कबूल केलं आहे.

भारतात आजवर 16 अभिनेत्री आणि नऊ अभिनेत्यांनी स्वत:चं आयुष्य संपवलं आहे. त्यामागची कारणं अनेकदा चित्रपट क्षेत्रातल्या अपेक्षा पूर्ण न करता येणे, प्रेमभंग किंवा नैराश्य अशी सांगितली जातात.

यावरून असं लक्षात येतं की तिकीटबारीवर मोठं यश, कायम आकर्षक दिसणं तसंच सोशल मीडियावरच्या काही कसोट्यांमध्ये यश मिळवण्याचं सिनेतारकांवरही मोठं दडपण आहे.

यशस्वी अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनीही अशा वातावरणात डिप्रेशन आल्याचं सार्वजनिकरीत्या कबुल केलं होतं.

एक दु:स्वप्न

रामगोपाल वर्मा यांनी श्रीदेवींना घेऊन तेलुगू भाषेत अनेक चित्रपट केले होते. बॉलिवुडची ही सुपरस्टार प्रत्यक्ष आयुष्यात किती दु:खी होती, हे त्यांनी सोशल मीडियावर जाहीरपणे सांगितलं.

"तिने आयुष्यात खूप भोगलं," ते सांगत होते. "एक बालकलाकार म्हणून या क्षेत्रात आल्यामुळे एक सामान्य व्यक्ती म्हणून मोठं व्हायला त्यांना आयुष्यात वेळच मिळाला नाही."

"बाह्य गोष्टींमुळे मिळणाऱ्या शांतीपेक्षा तिची मानसिक शांती हा मोठा काळजीचा विषय होता. त्यामुळे तिला स्वत:कडे लक्ष देणं भाग पडलं."

"भविष्याची अनिश्चितितता, तिच्या खासगी आयुष्यातील अनेक घटना तिच्या मनावरचे आघात या सगळ्यांमुळे बॉलिवुडची ही सुपरस्टार कधीच शांत किंवा संतुलित अवस्थेत नव्हती," असंही वर्मा यांनी एका फेसबुक पोस्टमध्ये सांगितलंय.

फोटो स्रोत, Hype PR

फोटो कॅप्शन,

बॉलिवुड ही भारताची ड्रीम फॅक्टरी आहे.

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

बॉलिवुडमधल्या काम करण्याच्या पद्धतीशी श्रीदेवींनी कसं जुळवून घ्यावं लागलं, हे त्यांनी गेल्या वर्षी ज्येष्ठ पत्रकार वीर सांघवी यांना एका मुलाखतीत सांगितलं होतं. श्रीदेवी यांनी सांगितलं होतं की दक्षिण भारतातील चित्रपट क्षेत्रात त्या सकाळी सहा वाजता काम करायला सुरुवात करायच्या. पण मुंबईला आल्यावर त्यांना अनेक कलाकारांची वाट बघावी लागायची. अनेक जण दुपारी यायचे. या सगळ्या प्रकारामुळे त्या अस्वस्थ होत असत.

हिंदी आणि इंग्रजी सिनेमांसाठी प्रसारमाध्यमांच्या वृत्तीबद्दलही श्रीदेवी अस्वस्थ रहायच्या. कुठल्याही फिल्मचं प्रमोशन त्यांच्यासाठी कसं एखाद्या दु:स्वप्नाप्रमाणे असायचं, याची आठवणही त्या काढतात. इंडस्ट्रीतल्या फोटोबाजी आणि पॅपराझीही त्यांना प्रचंड अस्वस्थ करायची.

बॉलिवुडची मीडिया त्यांना Thunder thighs म्हणायची. त्या पाच भारतीय भाषा बोलू शकायच्या पण त्यांच्या कच्च्या इंग्रजीवरून त्यांना इंडस्ट्रीतल्या चकमकीत मासिकांनी लक्ष्य केलं होतं.

आणि सतत तरुण दिसण्याचा दबावामुळे वारंवार केलेल्या कॉस्मेटिक सर्जरी त्यांच्या मृत्यूचं कारण ठरली, असेही तर्कवितर्क लावले गेले.

घराणेशाही आणि #Metoo

बॉलिवुड कसं दूषित होत चाललंय, मोठ्यामोठ्या स्टुडिओंमध्ये शक्तीचा दुरुपयोग कसा होतोय, हे गेल्या दोन दशकांत या क्षेत्रातल्या अनेक तरुण कलाकारांनी वारंवार सांगितलंय.

"मला कुत्र्यासारखी वागणूक मिळाली आहे," असं दोनदा राष्ट्रीय पुरस्कार जिंकणाऱ्या कंगणा राणावत म्हणाल्या. लहान गावांतून येणाऱ्या महत्त्वाकांक्षी लोकांची बॉलिवुड कशी पिळवणूक करतं, आणि कसा या सर्व गोष्टींचा तिच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे, याबद्दलही ती खुलेपणाने बोलली आहे.

आज बॉलिवुडमधले मोठे चित्रपट निर्माते आणि स्टुडिओ मालक-चालकांची जमातच वेगळी आहे. ते यशस्वी, श्रीमंत आणि शक्तिशाली आहेत आणि कोणत्या न कोणत्या बड्या निर्मात्यांची आणि अभिनेत्याची मुलं आहेत.

या स्टारकिड्सची दुसरी आणि तिसरी पिढी शहरात वाढली आहे, परदेशातल्या शाळांमध्ये शिकली आहे. आज त्यांना बॉलिवुडमध्ये Bombay yuppies म्हटलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

कंगणा राणावत यांना कुत्र्यासारखी वागणूक देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

आणि या क्षेत्रात येण्याचा प्रयत्न करणाऱ्या Outsiders ना आता या संस्कृतीचा सर्वांत मोठा धोका असल्याचं राणावत सांगतात. आता त्यांचाच छळ होण्याची सर्वाधिक शक्यता आहे कारण त्यांना कोणतंही संरक्षण नाही, असं त्या सांगतात.

तिच्या उघड वक्तव्यांमुळे इंडस्ट्रीतल्या तारे-तारकांनी, मोठे स्टुडिओच्या निर्मात्यांनी तिचा चांगलाच समाचार घेतला, आणि या गोष्टीवर वाद झाले.

आज outsiders च्या कॅटेगरीत मोडणारे शाहरुख खान, अनुष्का शर्मा, रणवीर सिंग, दीपिका पादुकोण यांना पारंपरिक चित्रपट निर्मात्यांचा जास्त पाठिंबा आहे.

अशा महत्त्वाच्या विषयांना बॉलिवुडमध्ये आणि सार्वजनिक मंचावर फाटा दिला जातो. पण श्रीदेवींच्या अशा अचानक जाण्याने निदान या वादाला पुन्हा तोंड फोडण्याची वेळ आली आहे, की खरंच बॉलिवुडमध्ये सौंदर्य हे फक्त बाह्य असतं का?

तुम्ही हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)