होळी : मला रंग खेळायचा नाही, माझ्या मताचा आदर करा'

  • अदिती धुपकर
  • बीबीसी मराठीसाठी
होळी

फोटो स्रोत, Getty Images/DIPTENDU DUTTA

फोटो कॅप्शन,

होळी सण आहे तर बळजबरी कशाला?

No means no. पिंक चित्रपटातून दिलेला हा संदेश शारीरिक संबंध किंवा नातेसंबंधांपुरताच मर्यादित नसून सण साजरे करण्याच्या पद्धतीलाही लागू आहे. पण हे कळायला मला तशा प्रसंगातून जावं लागलं.

'बुरा ना मानो, होली है...' असं म्हणत धुळवडीच्या दिवशी गावभर धुडगूस घालणाऱ्या एका टोळक्याच्या तावडीत मी सापडले, त्या वेळी 'पिंक' प्रदर्शितही झाला नव्हता. पण 'नाही म्हणजे नाही', हे त्या वेळीही कोणीच ऐकलं नव्हतं.

मला आठवतं, मी कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षाला होते. मैत्रिणीकडून होळी खेळून घरी परतत होते. तेवढ्यात एका टोळक्याने मला एकटीला बघून फुगे, पाणी आणि इतरही काही भरलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा मारा सुरू केला!

ते फुगे अंगावर पडले तेव्हा त्या पाण्यामुळे मी भिजले, एवढंच झालं नाही. त्या फुग्यांचा फटका जोरात होता. त्यामुळे शारीरिक इजा झाली. ती भरूनही निघाली. पण त्याच बरोबर जे मानसिक आघात झेलावे लागले, ते आजही भरून निघाले नाहीत.

त्या टोळक्याला फक्त सण साजरा करायचा होता का? नाही! इतर वेळी माझ्याशी बोलायचा प्रयत्न करणाऱ्या त्यांना मी उभंही करत नव्हते. त्याचाच बदला म्हणून तर त्यांनी हा हल्ला चढवला नव्हता?

तेव्हापासून सण 'साजरा' करण्याच्या या अघोरी पद्धतीबद्दल माझ्या मनात प्रश्नांचं काहूर सुरू झालं. एवढंच नाही, माझ्या मनात या अशा पद्धतीबद्दल चीड निर्माण झाली आणि मी तेव्हापासून होळी खेळायचं बंद केलं.

असं नाही की, मला रंग खेळणं आवडत नव्हतं. पण त्या दिवशीपर्यंत रंग किंवा धुळवड कोणाबरोबर खेळायची, याचा निर्णय सर्वस्वी माझा होता. पण त्या दिवशी माझ्या निर्णयाविरुद्ध, माझ्या मनाविरुद्ध कुणीतरी परक्या लोकांनी मला भिजवलं होतं.

फोटो स्रोत, AFP

ही साधारण 12-13 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी मोटरसायकलीवरून टोळधाडीसारखे फिरणारे टोळभैरव कमी होते. आज त्यांचीही संख्या वाढली आहे.

डीजेचा गोंगाट

त्या वेळी डीजे किंवा तत्सम गोंगाटात होळी खेळली जात नव्हती. आज डीजेशिवाय साध्यासाध्या सोसायट्यांच्या पाइपांनाही पान्हा फुटत नाही. रेन डान्स वगैरे प्रकार तर त्या वेळी कोणाच्या गावीही नव्हते. आज मुंबई, ठाणे, पुणे या मोठ्या शहरांमध्येच नाही, तर औरंगाबादसारख्या मोठ्या होऊ घातलेल्या शहरांमध्येही रेन डान्सचं आयोजन होतं.

माझ्या मैत्रिणीबाबत घडलेला एक किस्सा. भारतात मल्टी-नॅशनल कंपन्यांनी व्यवसाय सुरू केल्यावर होळीच्या किंवा धुळवडीच्या दिवशी हमखास सुट्टी, हे समीकरण बंद झालं. धुळवडीच्या दिवशीही ऑफिसला जावंच लागतं.

ही मैत्रीण ऑफिसला जाण्यासाठी तयार होऊन निघाली. घराबाहेर पडली, तर सोसायटीतच धुळवड सुरू होती. तिला तयार झालेलं बघून तिच्या सोसायटीतले सगळे तिला रंगवायला धावले. तिला ऑफिसला जायचं आहे, हे ती सांगून थकली. पण तिचं 'नो मीन्स नो' कुणीच ऐकलं नाही.

फोटो स्रोत, GETTY IMAGES/MANJUNATH KIRAN

हे फक्त तिच्या बाबतीतच घडलं असं नाही. असं अनेक जणांच्या बाबतीत घडतं. परीक्षेला निघालेली किंवा अभ्यासासाठी घरी थांबलेली मुलं, जवळच काहीतरी घ्यायला म्हणून निघालेले ज्येष्ठ नागरीक एवढंच नाही, तर रस्त्यावरचे कुत्रे-मांजरी अशा मुक्या प्राण्यांनाही रंगवलं जातं.

इतरांना त्रास का देता?

मला अजूनही न कळलेली गोष्ट म्हणजे आपली संस्कृती किंवा परंपरा जपली पाहिजे, यात काही वादच नाही. पण त्या नावाखाली दुसऱ्याला त्रास देणं, हे कितपत योग्य आहे?

त्यातही कोरड्या रंगाने रंग खेळणं, हा संस्कृतीचा भाग असेलही कदाचित. पण ऑइल पेंटने एकमेकांचे चेहेरेच नाही, तर केसही रंगवणं, डोक्यावर अंडी फोडणं, लोकांना धरून धरून चिखलात लोळवणं हा कोणत्या संस्कृतीचा भाग आहे?

होळीला भांग पिणं ही परंपरा असल्याचं सांगतात. त्यालाही एक वेळ हरकत नाही, असं म्हणता येईल. पण त्या भांगेची जागा कोल्ड ड्रिंकच्या बाटलीत भरलेल्या विदेशी किंवा देशी दारूने घेतली जाते, त्याचं काय?

ज्याला दारू प्यायची, त्याची त्याने खुशाल प्यावी. पण ती प्यायल्यानंतर रस्त्यांवर, सोसायटीच्या आवारात, वाडीत, गल्लीत, गच्चीवर धिंगाणे घालणं, मुलींची छेड काढणं, केवळ सूड उगवण्यासाठी लोकांच्या घरांमध्ये रंगाने भरलेले फुगे मारणं, या सगळ्या गोष्टी म्हणजे सण साजरा करण्याच्या पद्धती म्हणायच्या का?

मुक्या प्राण्यांना का त्रास?

मुक्या प्राण्यांची अवस्था तर आपल्यापेक्षा वाईट म्हणावी लागेल. आपण निदान ओरडू शकतो, विरोध करू शकतो किंवा तक्रार तरी करू शकतो. रस्त्यावरच्या या प्राण्यांना तर तीसुद्धा सोय नसते.

फोटो स्रोत, GETTY IMAGES/SANJAY KANOJIA

पकडून पकडून त्यांना रंग लावले जातात. बरं, हे रंग रासायनिक असतात. हे मुके प्राणी ते रंग चाटतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या आरोग्याच्या अनेक तक्रारींचा सामना करावा लागतो.

या प्राण्यांना माणसांपेक्षा जास्त ऐकायला येतं. त्यामुळे डीजे किंवा गोंगाट असेल, तर पक्ष्यांसारखेच हे प्राणीही भेदरतात. सैरावैरा पळतात आणि अशातच कितीतरी पाळलेले प्राणी हरवल्याचीही उदाहरणं आहेत.

ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या

डीजेचा त्रास फक्त प्राण्यांनाच होत नाही, तो माझ्यासारख्या माणसांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि लहान बाळांनाही होतो. सोसायटीच्या आवारात, गल्लीच्या टोकाशी किंवा एखाद्या चौकात दणक्यात वाजणाऱ्या या डीजेमुळे अनेकांना श्रवण यंत्रणेच्या समस्या किंवा हृदयाचे ठोके वाढणं, रक्तदाब वाढणं अशा समस्यांना तोंड द्यावं लागतं.

मी मगाशी उल्लेख केला रेन डान्सचा! आपलं राज्य दुष्काळी राज्य किंवा कमी पावसाचं राज्य म्हणून ओळखलं जातं. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र वगैरे प्रदेशांमध्ये पाण्याची वानवा असते. दोन वर्षांपूर्वी तर लातूरसारख्या शहराला आणि गावाला मालगाड्यांमधून पाणी भरून पुरवठा करावा लागला होता.

फोटो स्रोत, AFP

पण या सगळ्याशी जणू आपला संबंधच नाही, अशा आविर्भावात मुंबई-पुणे या पट्ट्यातले लोक रेन डान्स आयोजित करतात. काही मोठ्या सोसायट्यांमध्ये किंवा काँप्लेक्समध्ये तर या रेन डान्ससाठी खास टँकरही मागवले जातात. एकीकडे हा पाण्याचा अपव्यय आणि दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठी मैलोन् मैल पायपीट करणाऱ्या लहान लहान मुली... या चित्रातला विरोधाभास कोणालाच कसा दिसत नाही?

रंग खेळणं वाईट आहे, असं मला अजिबातच म्हणायचं नाही. पण कुणाच्याही इच्छेविरोधात त्याला रंग फासणं, त्याच्या पर्सनल स्पेसवर हल्ला चढवणं, याला माझा आक्षेप आहे.

मराठीत एक म्हण आहे, 'अती तिथे माती'! रंगांच्या या खेळामध्ये अनेक विकृत गोष्टी घुसवण्यात आल्या आहेत. या गोष्टींमुळे रंगांच्या या सुंदर खेळाचा बेरंग होतो आणि नेमकं त्यालाच आहे माझं 'नो मीन्स नो'!

तुम्ही हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)