बीबीसी एक्स्क्लुझिव्ह : त्रिपुरातल्या भाजपच्या यशाचं सुनील देवधर यांनी केलं विश्लेषण

सुनील देवधर
प्रतिमा मथळा ईशान्य भारतात भाजपची ताकद वाढवण्यात देवधर यांचा महत्त्वाचा वाटा आहे.

त्रिपुरात भाजपची सत्ता येणार हे स्पष्ट झालं आहे. भाजपचे त्रिपुरा राज्याचे प्रभारी सुनील देवधर यांचा या यशात सिंहाचा वाटा आहे असं म्हटलं जात आहे. भारतीय जनता पक्षाच्या विजयाची काय कारणं आहेत तसेच पुढील वाटचाल कशी असेल याबाबत बीबीसीनं सुनील देवधर यांच्याशी संवाद साधला. बीबीसी प्रतिनिधी सलमान रावी यांनी ही मुलाखत घेतली.

सर्वप्रथम मी आपलं अभिनंदन करतो. बीबीसीला आधी दिलेल्या मुलाखतीमध्ये देखील आपण म्हणाला होतात की, भाजप विजयी होणार. या आत्मविश्वासामागे काय कारण होतं?

सुनील देवधर - मला केवळ आशाच नव्हती तर विश्वास होता की, भाजप विजयी होणारच. गेल्या तीन वर्षांपासून मी लोकांशी बोलत होतो, संवाद साधत होतो. त्यावेळी मला लक्षात आलं की, इथल्या लोकांना परिवर्तन हवं आहे. इथल्या सरकारला ते कंटाळले होते. जनतेला सुशासन हवं होतं, जनतेला न्यायव्यवस्था सुरळीतपणे हवी होती. गेल्या 25 वर्षांच्या डाव्यांच्या कार्यकाळात जनतेच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. दिल्लीमध्ये NDAचं सरकार स्थापन झालं, मोदी पंतप्रधान झाले. मग येथील जनतेच्या आशा पल्लवित झाल्या. त्यामुळेच त्यांनी इथं भाजपला मतदान केलं.

Image copyright Sunil Deodhar/Facebook
प्रतिमा मथळा सुनील देवधर

25 वर्षांपासून इथं डाव्यांचं सरकार होतं. त्यांचे अनेक कार्यकर्ते होते. अशा वेळी तुम्हाला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला?

सुनील देवधर : CPMचे केडर जोपर्यंत सत्तेमध्ये येत नाहीत तोपर्यंत ते ध्येयवादी आणि विचारधारेनी प्रेरित झालेले असतात. पण जेव्हा ते सत्तेमध्ये येतात तेव्हा ते राजकीय हस्तक्षेप करतात. राजकारणाचे अपराधीकरण करतात. ते लोक स्वतःच सत्तेचे लाभार्थी बनतात. सरकारच्या निधीमधून त्यांना पैसा पुरवला जातो. त्यामुळे ते सरकारवर आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहतात. तर दुसऱ्या हाताला भाजप किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. जे सत्ता मिळण्याआधी आणि सत्ता मिळाल्यानंतरही कुणावर अवलंबून राहत नाही. जेव्हा लाभार्थी केडर आणि समर्पित स्वयंसेवक आमने-सामने येतात तेव्हा समर्पित स्वयंसेवकच जिंकतो हे आपण या निवडणुकीत पाहिलंच आहे.

असा आरोप केला जात आहे की, तुम्ही त्रिपुरात मोडतोडीचं राजकारण केलं, CPM, काँग्रेस या पक्षांतल्या लोकांना तुम्ही उमेदवारी दिली. यावर तुमचं काय स्पष्टीकरण आहे?

सुनील देवधर : आम्ही कुणाला तोडलं नाही. ते स्वतः त्यांच्या पक्षापासून दूर झाले आणि आमच्या पक्षात आले. त्यांना भाजपमध्ये आशा वाटली. जर त्यांना भाजपमध्ये यावंसं वाटत असेल तर आम्ही त्यांना दरवाजे बंद करणार का? पण एक गोष्ट तुम्हाला मान्य करावी लागेल की गेल्या वर्षभरातला या नेत्यांचा ट्रॅक रेकॉर्ड तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की त्यांची वागणूक आता सुधारली आहे.

...म्हणजे तुम्ही त्यांचं शुद्धीकरण केलं का?

सुनील देवधर: हो बिल्कुल. गेल्या वर्षभरातली त्यांची वागणूक पाहिली तर आपल्या असं लक्षात येईल त्यांची वागणूक भारतीय जनता पक्षाशी अनुकूल आहे. ते भाजपच्या रंगात आता पूर्णपणे मिसळले आहेत. त्यांनी भाजपचे संस्कार आत्मसात केले आहेत.

निवडणुकीपूर्वी भाजपने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केला नाही. त्रिपुराचे मावळते मुख्यमंत्री माणिक सरकार यांची प्रतिमा ही एका गरीब मुख्यमंत्र्याची आहे. असं म्हटलं जातं त्यांची पत्नी ऑटो रिक्षाने प्रवास करते. तेव्हा अशा वेळी तुम्ही त्यांच्या तोडीचा कोणता नेता मुख्यमंत्री म्हणून देणार आहात?

सुनील देवधर : सर्वप्रथम तुम्ही माणिक सरकार यांच्याबद्दल जे मुद्दे उपस्थित केले त्याबद्दलचं माझं मत मी व्यक्त करतो. जर एखाद्या व्यक्तीचा बॅंक बॅलन्स कमी आहे, पत्नी रिक्षाने प्रवास करत असेल म्हणून ती व्यक्ती प्रामाणिक आहे हे सिद्ध होत नाही. तसंच ते त्यांच्या कामात निष्णात आहेत हे देखील सिद्ध होत नाही. माणिक सरकारच्या काळात विविध मंत्रालयांत भ्रष्टाचार बोकाळला होता. तो त्यांना थांबवता आला नाही. भ्रष्टाचार थांबवणं तसंच पूर्णपणे कार्यक्षमता पणाला लावून काम करणं या दोन्ही स्तरावर ते अपयशी ठरले. त्यामुळे त्यांना जनतेनी यावेळी नाकारलं.

आमच्या पक्षात अनेक अनुभवी आणि ताज्या दमाचे नेते आहेत. भारतीय जनता पक्षाची एक समिती या ठिकाणी येईल. इथल्या आमदारांशी चर्चा करेल आणि त्यानंतर भाजपचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील त्याच नावावर शिक्कामोर्तब होईल.

त्रिपुराच्या यशाचं श्रेय नेमकं कुणाला देता येईल? गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही ईशान्य भारतात मेहनत घेत आहात, स्थानिक भाषांवर तुमचं प्रभुत्व आहे तेव्हा या यशामध्ये तुमचा सिंहाचा वाटा आहे असं म्हणता येईल का?

सुनील देवधर: 37 लाख त्रिपुरावासीयांना या यशाचं श्रेय द्यावं लागेल. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचे हे श्रेय आहे. भारतीय जनता पक्षाने मतदारांची यादी तयार केली होती. यादीच्या प्रत्येक पानासाठी एक प्रमुख निवडण्यात आला होता. तशा 37 हजार पृष्ठप्रमुखांपासून ते राष्ट्रीय अध्यक्ष यांचा या विजयात सिंहाचा वाटा आहे. केंद्र सरकारच्या मंत्र्यांनी त्रिपुरात प्रवास केला आणि इथल्या लोकांना विश्वास दिला की आम्ही तुमचा विकास करू. त्यामुळेच इथं भाजपला विजय मिळाला. हे श्रेय त्या मंत्र्यांचं देखील आहे.

सलमान: बीबीसीशी बोलल्याबद्दल धन्यवाद. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)