#5मोठ्याबातम्या : नितेश म्हणतात राणे विधानसभेतच हवेत!

नारायण राणे यांनी नवीन पक्षाची घोषणा केली Image copyright NArayan Rane/Twitter

पाहूयात आज सकाळी वृत्तपत्र आणि वेबसाइटवर छापून आलेल्या 5 महत्वाच्या बातम्या.

1.राणे विधानसभेतच हवेत!

भाजपने राज्यसभेची उमेदवारी देऊ केली असली तरी नारायण राणे हे विधानसभेतच हवेत, असं ट्विट आमदार नितेश राणे यांनी केल्यानं राणे हे दिल्लीत जाण्यास नाखूश असल्याचं दिसतंय.

लोकसत्तानं दिलेल्या वृत्तानुसार, राज्यात मंत्रिपदावर डोळा ठेवून असलेल्या राणे यांची दिल्लीत जाण्याची अजिबात इच्छा नाही. नितेश यांनी मांडलेल्या भूमिकेमुळे राणे हे राज्यसभेवर जाणार नाहीत, असाच अर्थ काढला जात आहे.

जुलै महिन्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होणार असली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपची एकूण भूमिका लक्षात घेता संधी मिळण्याबाबत राणे साशंक आहेत.

"भाजपनं राज्यसभेची उमेदवारी देऊ केली असली तरी अद्याप आपण अंतिम निर्णय घेतलेला नाही. येत्या दोन-तीन दिवसांत भाजपला निर्णय कळविण्यात येईल," असं नारायण राणे यांनी सांगितलं आहे.

2. PNB:सोन्याच्या नाण्यांची भेट

PNB घोटाळ्यात अडकलेल्या एका अधिकाऱ्याने त्याला सोन्याची नाणी भेटीदाखल मिळाल्याची कबुली दिली आहे.

Image copyright Getty Images/Indranil Mukharjee
प्रतिमा मथळा पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील ब्रीच कँडी शाखेत हा घोटाळा झाला.

टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, CBIनं विशेष न्यायालयात सादर केलेल्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. पंजाब नॅशनल बँकेतील अधिकाऱ्याला नीरव मोदीनं गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात दोन 60 ग्रॅम वजनाची सोन्याची नाणी आणि हिऱ्यांचे दागीने भेट म्हणून दिले होते.

ब्रॅडी हाऊस शाखेतील यशवंत जोशी आणि गोकुळनाथ शेटटी या दोन अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी मोदी आणि चोकसी यांना लेटर्स ऑफ अंडरटेकींग दिले होते.

3. बारावीच्या उत्तरपत्रिका जळून खाक

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात बारावीच्या गणिताच्या पेपरच्या उत्तरपत्रिकाच आगीत जळून खाक झाल्या आहेत.

एबीपी माझानं दिलेल्या वृत्तानुसार, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. केज शहरातील गट साधन केंद्रात या उत्तरपत्रिका ठेवण्यात आल्या होत्या. या आगीत बारावीच्या आजच्या गणित पेपरच्या 1199 उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या.

Image copyright INDRANIL MUKHERJEE/GETTY IMAGES

तसंच, महाराष्ट्र टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, विविध मागण्यांसाठी ज्युनिअर कॉलेज शिक्षकांनी टाकलेल्या बहिष्कारामुळे बारावीच्या तब्बल ८० लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून आहेत.

शिक्षक संघटनांच्या काही मागण्या मान्य झाल्या असल्या तरी सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय बहिष्कार मागे घेणार नाही, अशी भूमिका संघटनेनं घेतली आहे.

यामुळे या वर्षी बारावीचा निकाल रखडण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.

4. सूर्यास्ताला सूर्याचा रंग लाल होतो - नरेंद्र मोदी

सूर्यास्त होत असतो तेव्हा सूर्याचा रंग हा लाल असतो आणि जेव्हा सूर्योदय होत असतो तेव्हा केशरी असतो, असं शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिपुराच्या ऐतिहासिक विजयावर आनंद व्यक्त केला.

Image copyright Getty Images

न्यूज18 लोकमतच्या वृत्तानुसार, निवडणुकांतील विजयानंतर दिल्ली मुख्यालयात भाजपची विजयी सभा पार पडली. यावेळी पंतप्रधान मोदींनी भाषण केलं.

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, विजयाचा आनंद आम्ही साजरा करूच पण राजकीय पक्षांनी पराभव स्वीकारला पाहिजे. काही दिवसांनंतर काँग्रेसचे नेते म्हणतील एक काळ होता तेव्हा आमचं सरकार होतं, आमचे मुख्यमंत्री होते, आमचा पंतप्रधान होता. काँग्रेसवर अशी वेळ आली की त्यांचा पक्ष आता छोटा झालाय.

5. बिबट्यांच्या नसबंदीचा विचार?

आगामी काळात बिबट्यांची संख्या वाढत गेल्यास त्यांच्या नसबंदीचा विचार करावा लागेल, असं पुणे वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) विवेक खांडेकर यांनी सांगितलं.

Image copyright SOS

सकाळनं दिलेल्या वृत्तानुसार, माणूस आणि बिबट्या यांच्यात निर्माण होणारा संघर्ष कमी करण्यासाठी बिबट्यांची शास्त्रशुद्ध गणना करण्याचा प्रस्ताव केंद्रीय वन्यजीव संस्थेसमोर मांडला आहे.

या गणनेतून आकडे समोर आले की, त्यावर काम करणं अधिक सोयीस्कर होईल. गरज भासल्यास बिबट्यांची नसबदी करायची का, याचाही विचार करता येईल. हा विषय संवेदनशील असल्यानं विचारपूर्वक मार्ग काढावा लागेल, अशीही माहिती विवेक खांडेकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)