#5मोठ्याबातम्या : मराठवाड्यात पाणीटंचाई, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रावर गारपिटीचं संकट

2016मध्ये मराठवाड्यातील लातूर जिल्ह्याला रेल्वेने पाणी पुरवण्यात आलं होतं. Image copyright EPA
प्रतिमा मथळा 2016मध्ये मराठवाड्यातील लातूर जिल्ह्याला रेल्वेने पाणी पुरवण्यात आलं होतं.

आजच्या विविध दैनिकांतील आणि वेबसाईटवरील 5 महत्त्वाच्या बातम्या पुढील प्रमाणे

1. मराठवाड्यातील 5 हजार गावांत पाणीटंचाई

मराठवाड्यातील 5,118 गावांत पाणीटंचाईचे संकट उभं ठाकलं असल्याचं वृत्त महाराष्ट्र टाइम्सने दिलं आहे.

निम्म्या मराठवाड्यात अत्यल्प पाऊस झाला असून, औरंगाबाद, नांदेड, हिंगोली आणि जालन्यातील काही भागांमध्ये कमी पाऊस झाला आहे. यामुळे एप्रिल ते जून अखेरपर्यंत मराठवाड्यातील 5,118 गावांसाठी आणि 1246 वाड्यांसाठी 67 कोटी रुपयांचा टंचाई आराखडा सादर करण्यात आला असल्याचे या वृत्तात म्हटले आहे.

दरम्यान केंद्रीय हवामान खात्याने बुधवारी राज्याच्या उत्तर भागात आणि गुरुवारी विदर्भात गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे. लोकसत्तामध्ये हे वृत्त देण्यात आलं आहे.

2. मेघालयात भाजप समर्थित सरकार

मेघालयमध्ये 21 आमदारांसह सर्वांत मोठा पक्ष बनलेल्या काँग्रेस पक्षाला धक्का देत 2 आमदार असलेल्या भाजपसह अनेक पक्षांचं युती सरकार सत्तेत येत आहे. इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिलं आहे.

Image copyright Getty Images

नॅशनल पिपल्स पार्टी (NPP), भाजप, UDP, HSPDP, PDF या पक्षांनी एकत्र येत 34 आमदारांसह सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. NPPचे नेते खासदार कोनराड संगमा यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला असून मंगळवारी सकाळी त्यांचा मुख्यमंत्री पदासाठी शपथविधी होणार आहे.

दरम्यान, काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्रिपुरामध्ये भाजपने फुटीरतावादी पक्षांशी हातमिळवणी केल्याची टीका केली आहे. हे वृत्त न्यूज 18 लोकमतने दिलं आहे.

3. मोदींना सत्तेत बसवून घोडचूक : राम जेठमलानी

देशाने नरेंद्र मोदी यांच्याकडे देशाची धुरा सोपवली पण आपण घोडचूक केल्याचे जनतेला कळून चुकलं आहे, असं ज्येष्ठ विधीज्ञ आणि खासदार राम जेठमलानी म्हणाल्याचं वृत्त महाराष्ट्र टाइम्समध्ये दिलं आहे.

"नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषणा झाली. त्यानंतर ते सत्तेवर यावेत, यासाठी अनेकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. ते यशस्वीही झाले. त्या वेळी मोदी यशस्वी व्हावेत, ही अनेकांची इच्छा होती. मात्र, आता आपण घोडचूक केली, अशी भावना नागरिकांच्या मनात आहे, असे जेठमलानी म्हणाल्याचं या वृत्ता म्हटलं आहे.

पुण्यात सिम्बॉईसिस लॉ स्कूलमध्ये विधी दिनानिमित्त आयोजित न्या. यशवंतराव चंद्रचूड स्मृती व्याख्यानमालेत त्यांनी ही टीका केली. "पुढील निवडणुकीत मोदींना सत्ता गमवावी लागणार आहे. त्यामुळे ते देशाबाहेर निघून जातील," असंही जेठमलानी म्हणाले.

4. बसप आणि सपाची युती

उत्तर प्रदेशात होत असलेल्या लोकसभेच्या दोन पोटनिवडणुकांसाठी बहुजन समाज पक्षाने समाजवादी पक्षाला पाठिंबा दिला आहे. इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिलं आहे.

11 मार्चला फुलपूर आणि गोरखपूर या दोन लोकसभा मतदार संघात पोटनिवडणुका होत आहेत.

बसपच्या नेत्या आणि माजी मुख्यमंत्री मायवती यांनी ANI वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे की, "माझ्या पक्षाचे कार्यकर्ते भाजपच्या उमेदवारांना पराभूत करण्यासाठी मतदान करतील. त्यात काहीही चुकीचं नाही ."

Image copyright TWITTER

पण मायवती यांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी महाआघाडीचा मात्र इन्कार केला आहे. अशी काही आघाडी झालीच तर ती गुप्तपणे नाही तर खुलेपणाने होईल, असं त्यांनी म्हटल्याचं या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

5. पुण्यातील चहा विक्रेत्याची कमाई महिन्याला 12 लाख

पुण्यातील एका चहा विक्रेत्याची महिन्याची कमाई 12 लाख रुपये असल्याचं वृत्त एबीपी माझानं दिलं आहे. नवनाथ येवले नावाच्या या विक्रेत्याचे पुण्यात येवले टी हाऊस नावाने तीन चहाचे स्टॉल आहेत. प्रत्येक स्टॉलवर 12 कामगार कामाला आहेत.

चहा विक्रीचा व्यवसाय वाढत असून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर आपण समाधानी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी या वृत्तात दिली आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)