सोशल - औरंगाबादची कचराकोंडी कशी सुटेल? बीबीसी वाचकांनी सुचवले हे 5 उपाय

कचराकोंडी Image copyright SAJJAD HUSSAIN/AFP/Getty Images

औरंगाबाद शहरातील 'कचराकोंडी' सुटता सुटत नाही. महापालिका प्रशासन कचरा प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरलं आहे. त्यामुळे औरंगाबादमध्ये दुर्गंधी आणि कचऱ्याचं साम्राज्य आहे. या कचराकोंडीचा मंगळवारी 19वा दिवस आहे.

दरम्यान, शहरांमधील कचऱ्याची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आम्ही वाचकांकडून उपाययोजना मागवल्या होत्या. पाहूया त्यांच्यातील या 5 महत्त्वाच्या प्रतिक्रिया.

१. सुधारणा स्वतःपासून करावी - सतीश लोंढे

"कचरा व्यवस्थापन करण्यासाठी कमीत कमी प्लास्टिकचा वापर करावा. घरामध्ये 2 बादल्या आवर्जून ठेवा. एका बादलीत ओला कचरा आणि दुसऱ्या बादलीत सुका कचरा, असं वर्गीकरण करा. प्रत्येक सुशिक्षित नागरिकाने किंवा सर्वच नागरिकांनी वेळात वेळ काढून आपला परिसर कमीत कमी 10 मिनिटं काढून स्वच्छ करावा. तसंच सुधारणा ही नेहमी स्वतः पासून करावी."

सतीश लोंढे पुढे सांगतात की संत गाडगेबाबाना अभिप्रेत असलेला स्वच्छ आणि सुंदर असा महाराष्ट्र घडवावा.

Image copyright Facebook

2. उपाय आहेत पण ते करायचेच नाहीत - निखील वाघ

आपल्याकडे सगळे उपाय आहेत पण आपल्याला ते करायचेच नाहीत, हीच आपली मूळ समस्या आहे, असं निखिल वाघ सांगतात.

त्यांचं म्हणणं आहे की, जवळजवळ सगळ्या महापालिकांमध्ये कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी धोरणं आखणारी अभ्यासू मंडळी आहेत. या धोरणांची प्रत्येक संबंधित घटकाने (नागरिक ते लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी इ. सगळेच) प्रामाणिक आणि कडक अंमलबजावणी केली तरी मोठा फरक पडेल.

Image copyright Facebook

3. प्राथमिक स्तरावर कचऱ्याचं वर्गीकरण व्हावं - सिद्धार्थ सिड

सिद्धार्थ सिड सांगतात, "औरंगाबादकरांचे कचरा वर्गीकरणाबद्दलचं ज्ञान नगण्य आहे आणि हेच सर्व समस्याचं मूळ आहे. नागरिकांनी प्राथमिक स्तरावर कचऱ्याचं वर्गीकरण करावं. तसं झाल्यास ओला कचरा हा बायोगॅस, वीज निर्मिती आणि सेंद्रीय खत यासाठी वापरावा आणि सुक्या कचऱ्याचं पुनर्वापरासाठी वर्गीकरण करावं. कचरा वर्गीकरण न करणाऱ्या नागरिकांवर दंड लावावा."

कचरा हा विषय राजकीय पक्षांनी कधीच गांभीर्याने घेतला नाही, असं मत चंद्रशेखर कानडे यांनी व्यक्त केलं आहे.

Image copyright Facebook

4. प्लास्टिकच्या पिशव्या बंदी आणावी - अमोल सपकाळे

सगळ्यांत अगोदर प्लास्टिकच्या पिशव्या बंद करा, नंतर कचऱ्याचं वर्गीकरण आणि कचऱ्याचा पुनर्वापर, असे तीन उपाय अमोल सपकाळे यांनी सुचवले आहेत.

"सगळ्यांत पहिले स्वच्छतेच्या नावाखाली पालिका अधिकाऱ्यांची खाबूगिरी थांबवली पाहिजे. शहर कचरामुक्त ठेवायचं असेल तर हे थांबवलंच पाहिजे. म्हणजे ज्या योजनेसाठी आलेले पैसे योग्य ठिकाणी वापरले जातील," असं रवी खरात सांगतात.

5. कचऱ्याचा खत प्रकल्प सुरू करावा - पियुष टवळे

सरकारने जागा विकत घेऊन कचऱ्यापासून खत बनवण्याचा प्रकल्प सुरू करावा, यामुळे खतासोबतच रोजगार निर्मिती देखील होईल, असा उपाय पियुष टवळे यांनी सुचवला आहे.

हे वाचलंत का?

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)