निवडणुकीनंतर त्रिपुरात का उसळली आहे हिंसा?

त्रिपुरा, भाजप, सीपीएम
प्रतिमा मथळा निवडणूक निकालानंतर त्रिपुरात हिंसक घटनांची नोंद होते आहे.

निवडणूक निकालानंतर त्रिपुरात हिंसक घटनांची नोंद झाली आहे.

निवडणूक काळात होणाऱ्या हिंसक घटनांसाठी त्रिपुरा ओळखलं जात नाही. या राज्यातल्या फुटीरतावाद्यांचा अंतही अहिंसक ठरला. कारण फुटीरतावाद्यांनी समर्पण केल्यानंतर ते रबराची शेती करत आहेत. अशाप्रकारे त्रिपुरातल्या फुटीरतावाद्यांचा कंपू हिंसेविनाच शांत झाला.

आर्म्ड फोर्सेज स्पेशल पॉवर अॅक्ट रद्दबातल करणारं त्रिपुरा एकमेव राज्य आहे. मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात हिंसक घटनांनी थैमान घातलं आहे.

राजधानी आगरतळाच्या नजीक आणि बांगलादेश सीमेजवळच्या परिसरात हिंसक घटना अधिक तीव्र झाल्याचं वृत्त आहे.

पश्चिम त्रिपुरा प्रशासनानं 144 कलम लागू करत जमावबंदी लागू केली आहे. 13 पोलीस ठाण्यांच्या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आल्याचं पश्चिम त्रिपुराचे जिल्हाधिकारी मिलिंद रामटेक यांनी सांगितलं. आणखी दोन दिवस जमावबंदी लागू असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.

प्रतिमा मथळा त्रिपुरात उसळलेल्या हिंसेत अनेक घरांचं नुकसान झालं आहे.

निवडणूक निकालांनंतर आमच्या पक्षाच्या कार्यालयांसह नेते आणि कार्यकर्त्यांच्या घरांना लक्ष्य करण्यात येत आहे, असा आरोप डाव्या पक्षाचे कार्यकर्ते करत आहेत. अगरतळ्याचे माजी आमदार झुमू सरकार यांना नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं. ते आपल्या गावी आहेत.

दुकानांना लावली आग

स्वत:च्या सुरक्षेसाठी अनेक नातेवाईकांना घरी बोलावलं, असं झुमू सरकार यांनी बीबीसीला सांगितलं. रोज धमक्या मिळत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. पुरवण्यात आलेली सुरक्षाव्यवस्था काढून घेण्यात आली आहे. झुमू सरकार यांच्या घरापासून थोड्याच अंतरावर लंगा पाडा आहे. याठिकाणी सीपीएम समर्थकाच्या दुकानाला आग लावण्यात आली.

बातचीत सुरू असतानाच त्याठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचं आगमन झालं. त्यांनी या आगीचं कारण शॉर्ट सर्किट सांगितलं.

जवळच्या लंकमूरा पंचायत पाडा परिसरातील सुकुमार आचार्जी आणि त्यांची पत्नी शोभिता यांच्या घराची अक्षरक्ष: राखरांगोळी झाली आहे. ढिगाऱ्यातून जगण्यासाठी आवश्यक वस्तू हुडकून काढण्याचं काम ते करत होते.

सशस्त्र लोकांनी केला हल्ला

सीपीएम कार्यकर्ता असल्याचं सुकुमार यांनी सांगितलं. निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी सशस्त्र लोकांनी घरावर हल्ला केल्याचं ते सांगतात.

"आमच्या घरी येऊन तोडफोड करण्यात आली आणि त्यानंतर त्यांनी घराला आग लावली. आता इथून पळून जा अशा धमक्याही आम्हाला देण्यात येत आहेत," असं त्यांनी सांगितलं.

त्यांचे कुटुंबीय घाबरले आहेत. सुरक्षित ठिकाणी जाऊया असं पत्नी शोभिता या सुकूमार यांना सांगतात.

मी गावाची पाहणी करत असतानाच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ता म्हणून ओळख सांगणारे संजीब देब तिथं आले. तोडफोडीच्या घटना सीपीएमच्या लोकांनीच केल्या आहेत. भाजपचा त्यात काही सहभाग नाही असं ते म्हणाले.

प्रतिमा मथळा हल्ल्यांमागे सीपीएमचाच हात असल्याचं भाजप कार्यकर्ते संजीब देब यांनी सांगितलं.

"निवडणुकीत पराभवानंतर सीपीएमकडे कोणताही मुद्दा राहिलेला नाही. त्यांना आम्हाला बदनाम करायचं आहे. जवळपासच्या परिसरातली सीपीएम पक्षाची कार्यालयं तोडण्यात आली. यामागे त्यांच्याच पक्षातील माणसं आहेत," असं संजीब देब यांनी सांगितलं.

"सीपीएमच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर थांबवून मारहाण करण्यात येत आहे. त्रिपुरातलं वातावरण खराब करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हीच भीती आमच्या मनात होती," असं सुकुमार यांनी सांगितलं.

दरम्यान माजी आमदार झुमु सरकारही घर सोडून जाण्याच्या तयारीत आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)